चांदवडला आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता
खरेदी -विक्री संघाचीही निवडणूक जाहीर झाल्याने इच्छुकांच्या इच्छा – आकांक्षांना फुटणार धुमारे .
एकीकडे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू असतानाच आता पुन्हा एकदा सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या चांदवड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय क्षेत्रातील पदासाठी इच्छा आकांक्षा असणाऱ्यांना पुन्हा एकदा संघाच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात पदार्पण करण्यासाठी तसेच काहींचे तालुक्यातील राजकारणाचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.
संघाच्या निवडणुकीतही रंग येणार असून नाही मार्केट तर संघ बरा , असे काही इच्छुक मार्केट साठी उमेदवारी न मिळाल्यास संघाकडे आपला मोर्चा वळवू शकतात . मात्र संघाची आर्थिक परिस्थिती पाहता निवडणूक होणे कितपत योग्य आहे हा ही महत्त्वाचा विषय आहे .मात्र संघ बिनविरोध होतो की निवडणूक होते हे ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे . संघासाठी दिनांक 14 / 5 / 2023 रोजी मतदान होत आहे तर 15 / 5 /2023 रोजी मतमोजणी होणार आहे. चांदवड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती सविता शेळके , सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चांदवड यांची नेमणूक झाली असून संघासाठी सहकार कायद्यातील तरतुदी व संस्थेच्या उपविधीनुसार संचालक मंडळाची रचना राहणार आहे .
संघासाठी नामनिर्देशन पत्र दिनांक 6/4/2023 ते दिनांक 13/ 4 /2023 सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक कार्यालयात घेता येतील व दाखल करता येतील . अर्ज प्राप्त होतील त्याप्रमाणे रोज संध्याकाळी चार वाजता निवडणूक कार्यालयात नामनिर्देशन पत्रांच्या यादीचे प्रकाशन करण्यात येईल . नामनिर्देशनपत्रांची छाननी दिनांक 17 /4 /2023 रोजी सकाळी अकरा वाजता होईल तसेच उमेदवारी वैद्य नामनिर्देशन पत्रांची सूची दिनांक 18 /4/ 2023 रोजी संस्थेच्या निवडणूक कार्यालय व संस्थेच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यासाठी दिनांक 18 /4 /2023 ते 2/5/2023 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत माघार घेता येईल .तसेच उमेदवारांना निशाणीचे वाटप व अंतिम यादीचे प्रकाशन दिनांक 3/5 /2023 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येईल . दिनांक 14/ 5/ 2023 रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होईल . दिनांक 15/ 5/ 2023 रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी घेण्यात येईल. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येईल.

