नाशिक जिल्ह्यातील एकमुखी दत्तात्रय प्रभूंची सर्वात मोठ्या यात्रेचा प्रारंभ
दत्ताचे शिंगवे येथे सोमवार पासून प्रारंभ नियोजनाची बैठक संपन्न
नाशिक जिल्हयातील पूर्व भागातील पहिली यात्रा म्हणजे चांदवड तालुक्यातील श्री क्षेत्र दत्ताचे शिंगवे येथे तिन दिवस चालणारी यात्रा. चांदवड – चाळीसगाव महामार्ग जवळील व मनमाड शहराजवळून जवळच असणाऱ्या एका सुंदर टेकडीवर दत्तात्रय भगवान यांचे स्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे आणि विशेषता महानुभव पंथाचे महत्वाचे स्थान असल्यामुळे दर्शनाची मोठी गर्दी राज्यभरातून होत असते. यात्रा नियोजनाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीस चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलिस दलातील अशोक पवार, सांगळे, जाधव तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, दत्त मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सोसायटीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवाला सोमवार दिनांक 25 डिसेंबर 2023 पासून सुरुवात होणार आहे या दिवशी रात्री दत्तमूर्तीस जन्मस्नान , गंधअक्षदा , नविन वस्त्र समर्पण हार, विडावसर, उपहार व महाआरती होईल. महापूजा आमदार डॉ.राहुल आहेर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी दुपारी तीन वाजता त्रिमूर्तीची मिरवणूक म्हणजे पालखी सोहळा संपन्न होईल.
यावेळी पालखी पूजन तहसीलदार मंदार कुलकर्णी, बाजार समितीचे माजी सभापती डॉ आत्माराम कुंभार्डे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रमबाबा मार्कंड , चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तिसरा दिवस म्हणजे गाव जत्रा या दिवशी राज्यभरातून नामांकित पैलवानांचा सहभाग असणाऱ्या कुस्त्यांच्या भव्य दंगलीने यात्रा महोत्सवाची सांगता होईल. यात्रा यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. या यात्रेत नाशिक जिल्ह्याबरोबरच आजूबाजूच्या अनेक ठिकाणी भाविक येत असतात यात्रेत मोठ्या प्रमाणात खेळणा व मूळ खेळण्यावर मिठाईच्या दुकानांची रेलचेल असते. महाराष्ट्रातील नामांकित मोठ्या तंबूच्या लोकनाट्य तमाशा या भागात फक्त या यात्रेत बघावयास मिळतो हे या यात्रेचे एक आकर्षण आहे . या पूर्वी पुणेकर, खेडकर ,बोरगावकर ,काळू -बाळू यासारख्या अनेक नामांकित कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून येथे हजारो रसिकांची मने जिंकली आहे व ती परंपरा आजतागात तशीच सुरू आहे.

