मायबोलीवर नितांत प्रेम करणारा.. कवी देवदत्त चौधरी
काट्याकुट्याच्या आणि डोंगरदरीतील अतिशय मागास अशा आदिवासी समाजात अलीकडच्या काळात अनेक नामवंत कवी उदयास येत आहेत, त्यातील मला एका नावाचा आज प्रकर्षाने उल्लेख करावासा वाटतो, ते म्हणजे कवी देवदत्त चौधरी अतिशय साधे भोळे आणि सतत चेहऱ्यावर हास्य असणारे एक निरागस अस व्यक्तिमत्व..
त्यांचा जन्म पेठ तालुक्यातील म्हसगण या गावी अतिशय गरीब कुटुंबात झाला वडील शेतकरी असल्यामुळे घरात अठराविश्व दारिद्र्य..कवी देवदत्त चौधरी यांचे प्राथमिक शिक्षण (इयत्ता पहिली ते सातवी) म्हसगण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाले, तर आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण पेठ येथील दादासाहेब बिडकर ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले लहानपणापासून वाचन आणि लेखनाची आवड असणाऱ्या कवी देवदत्त यांना उच्च शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती. पण कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांनी बारावीनंतर आपल्याकडूनही कुटुंबाला काही हातभार मिळावा म्हणून डी एड करुन त्यांनी शिक्षकीपेशाची निवड केली. परंतु लेखनाची अत्यंत आवड आणि समाजावर नितांत प्रेम असणाऱ्या कवी देवदत्त यांनी नोकरीनंतर आपले लेखन चालू ठेवले पुढे नोकरी करत असतांना त्यांनी एम ए पूर्ण केले त्या बरोबर आपले लेखनकार्यही चालू ठेवले.. त्यांचे आता पर्यंत प्रकाशित झालेले साहित्य
१) ‘तहान’ कविता संग्रह
२) ‘झडप’ कवितासंग्रह
३) नाशिक जिल्ह्यातील आदिवासींचे लोक साहित्य
४) ‘पळसचोंड’ कादंबरी
त्यात ‘पळसचोंड’ही कादंबरी नांदेड विद्यापीठ’ मुंबई विद्यापीठ’ इथे एम ए च्या अभ्यासक्रमात सामाविष्ट आहे. कवी देवदत्त चौधरी यांना आज पर्यंत ७० पुरस्कार मिळाले आहेत त्यापैकी ४० पुरस्कार हे राज्यस्तरीय आहेत. तसेच त्यांनी ८० पेक्षा जास्त शॉर्ट फिल्म ची फिल्मची निर्मिती केली असून प्रत्येक फिल्ममध्ये त्यांनी महत्वाची भूमीका साकारली आहे,त्यांच्या कविता जितक्या वास्तववादी मानवी जीवनाच्या काळीजदेठाला हात घालणाऱ्या आहेत,तितक्याच त्या उच्च दर्जाच्या आणि सक्षम वास्तववादी आहेत. तसेच त्यांच्या शार्टफिल्म या सगळ्या (शॉर्ट फिल्म कवी देवदत्त चौधरी) ह्या यूट्यूब चैनल वर उपलब्ध आहेत.आपल्या बोलीभाषेतून कविता व शॅार्टफिल्मच्या माध्यमातून ते समाजातील अनिष्ट प्रथांवर ताशेरे ओढतात, त्यामुळे कधीकधी त्यांना टिकेलाही सामोरे जावे लागते,तरीही ते आपल्या मतावर मात्र ठाम असतात.
मायबोलीवर नितांत प्रेम करणाऱ्या कवी देवदत्त यांच्या कविता वाचतांना अजूनही ग्रामीण आदिवासी समाजात किती मागसलेपण आहे याची पदोपदी जाणिव होते.
बोकड्याचे आहळ्यावर फार जण पीजेल,
गऱ्याचा भात लावाय बोकड्या मग भुजेल.
मंजरीवर भात लावाय तं
तोंड फिरवून नेतय
अन वाटं जर घातलं तं
उडापडे जातय.
तारकटून लावेल त्या आखा भात कुजेल.
गऱ्याचा भात लावाय बोकड्या मग भुजेल.
‘आहळा’या कवितेतून कवी पावसाळ्यातील भात लावणीच्या हंगामातील वास्तव चित्र अगदी परखडपणे मांडतांत, ग्रामीण वाडीपाड्यात एकदा का पावसाला सुरवात झाली की भात लावणीची एकच झुंबड उडते,गावातील प्रत्येक शेतकऱ्याला आपली भात लावणी लवकर व्हावी असे वाटत असते,अशा वेळी मजूरी वाढवूनही मजूर मिळत नाही, मग नाईलाजास्तव मजुरांच्या मागणीनुसार शेतकऱ्याला पाच सहा हजार रुपयांचा बोकड विकत घ्यावा लागतो तेव्हा मात्र मटणाच्या वाट्यासाठी मजुरांची एकच झुंबड उडते, दुसऱ्या दिवशी जेव्हा हे मजूर भात लावणी साठी शेतात येतात त्यातील बरेच मजूर रात्रीच्या दारूने झिंगलेले असतात.मग हातातील भाताचे रोप कोणतीही तमा न बाळगता,गाळात वेडवाकड कोंबून ते मोकळे होतात,त्यातही मधेच पावसाने दडी मारली तर कोवळी बाळरोप करपून जातात,तर कधी करपा रोगाने होरपळून जातात,यात कवीने कर्जबाजारी झालेल्या ग्रामीण शेतकऱ्याची हतबलता आपल्या काव्यातून व्यक्त केली आहे.
कोणाचे तरी सभेलं बाबालं आमचे नियेल.
भाषण आयकाचा सोडून बाबा बियर पियाल जायेल.
पहाटीच उठून आईनी
भाकरी करुन दियेल.
हारबऱ्याच्या खारट्या
मिरची वाटून दियेल.
बाबाच्या समद्या भाकरी दुसरेच माजरांनी खायेल.
कोणाचे तरी सभेलं बाबालं आमचे नियेल.
तर कवी आपल्या ‘सभा’ या काव्यातून आजचे राजकीय नेते आपली पोळी भाजून घेण्यासाठी अशिक्षीत ग्रामीण नागरिकांना भावनिक आव्हान करुन त्यांचा कसा वापर करुन घेतात,आणि त्याला आपला ग्रामीण आदिवासी समाज कसा बळी पडतो,याचे वास्तव चित्रण करतात,व्यसनाच्या आहारी गेलेला बाबा आपला कामधंदा सोडून सभेच्या नावाखाली गुत्यावर जातो आणि आपलं सर्वस्व गमावून बसतो,आज ग्रामीण भागातील बहुतांशी तरूणवर्ग याच दिशेनं वाटचाल करतांना दिसतोय..कवी आपल्या कवितेतून समाजाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतात की पक्षीय झेंडे घेऊन नाचण्यापेक्षा आपल्या रोजगाराकडे आणि कुटुंबाकडे लक्ष द्या.तरच तुमची उन्नती होईल.
एक कळशी भरायला जेव्हा आईला दुपार भरत असते
तेव्हा सायब आम्हाला पाण्याची किंमत कळत असते.
एखाद कातळ झिरपतांना
डोंगरात जेव्हा सापडतं.
एक हंडा भरायला
आईला तेव्हा उजाडतं.
हंडा डोक्यावर ठेऊन आई डोंगर जेव्हा चढत असते
तेव्हा सायब आम्हाला पाण्याची किंमत कळत असते.
‘पाण्याची किंमत’ या काव्यातून कवी ग्रामीण वाडीपाड्यातील माय भगिनींना घोटभर पाण्यासाठी दिवसरात्र किती वणवण करावी लागते, मायभगिनींची ही येथोचीत कैफीयत सरकार समोर मांडतांना दिसतात,तसं पाहीले तर सह्याद्रीच्या दरीखोरीत पावळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या उन्हाळ्यात कोरड्या शुष्क पडतात,धरणं आहेत पण.. ते पाणी आम्हा गरिबांच्या नशिबी नाही,थोडक्यात ‘धरण उशाला कोरड घशाला’ अशी अवस्था निर्माण होते,उन्हाळ्यात घशाचा शोष भागवण्यासाठी ग्रामीण भागातील माणसांप्रमाणे अगदी पाळीव प्राण्यांनाही उन्हातान्हात भटकंती करावी लागते,हाच जाब कवी आपल्या कवितेतून प्रशासनाला विचारीत आहे.
मानपान देईन डी जे मी करीन कर्जाचं पैसं तेंडरवर फेडीन
पण पोशाचा लगन हायफाय करीन..
झंपरा आणीन फडक्या मी आणीन
नववारी आणीन दहावारी आणीन
शालू मी आणीन पैठण्या आणीन
शंभरवाल्या साड्या पक्या मी आणीन
जवडी येतील तवड्यानलं कपडी मी वाटीन
पण पोशाचा लगन हायफाय करीन..
कवी देवदत्त आपल्या’मानपान’ या कवितेतून लग्न सोहळ्यात कर्जबाजारी होऊन निरर्थक खर्च करणाऱ्या मुला मुलींच्या आई-वडिलांना एक आव्हान करतात,तसे पाहीले तर ग्रामीण भागात जणूकाही हा एक पायांडाच पडला आहे,मुलांच्या लग्नकार्यात नातेवाईक व आप्तेष्ठांना पानमान द्यावा,म्हणून आई वडील आपल्या अंगावर कर्जाचा डोंगर उभा करुन घेतात,कवीच्या मते कर्जबाजारी होऊन मुला मुलींची लग्न करण्यापेक्षा पालकांनी त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे, त्यांना एक सजग नागरिक बनवावे.
एकंदरीत कवी देवदत्त चौधरी यांच्या मायबोलीतील कविता या ग्रामीण जीवनाच ज्वलंत आणि जीवंत दर्शन घडवतात,त्यांच्या काव्यात कुठेही काल्पनिकता किंवा शाब्दीक आक्रस्ताळेपणा वाचतांना जाणवत नाही,उलट समाजविकासाला अडथळे निर्माण करणाऱ्या व्यवस्थेवरती आपल्या अलवार शब्द सुमनांनी घाव घालतांना दिसत आहेत.कवी देवदत्त चौधरी यांना पुढील काव्य लेखनासाठी व शॅार्टफिल्मसाठी माझ्या खूपखूप शुभेच्छा..!
कवी काळूदास कनोजे
साहित्यिक निसर्ग व आदिवासी संस्कृती अभ्यासक

