आदिवासींच्या शोषित वेदनेचा हुंकार…
” तांडा “
प्रा.डॉ.मधुचंद्र भुसारे यांचा “तांडा” हा दुसरा कविता संग्रह मेघा पब्लिशिंग हाउस,अमरावती प्रकाशनने १५ नोव्हेंबर २०१६ ला प्रकाशित केलेला आहे. हा कविता संग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. हा कविता संग्रह प्रकाशित झाला तेव्हा भारताने स्वातंत्र्याची ७० वर्ष ओलांडली होती. या ७० वर्षाच्या काळात अनेक परिवर्तने घडून आली आहेत मात्र, आदिवासी समाजाच्या परिस्थितीत पाहिजे तो बदल अजूनही घडून आलेला नाही. खरं तर आदिवासी हा देशाचा मूळ मालक… पण आजही या देशाच्या मूळ रहिवाशाच्या वाट्याला अनेक वेदनांचे काटे टोचत आहेत. कवी स्वतः या परिस्थितीत वाढला आहे. त्याने स्वतः आदिवासींच्या व्यथा अनुभवल्या आहेत. साहजिकच तांडा या कविता संग्रहाच्या माध्यमातून त्या वेदना भळभळून वाहतांना दिसतात. म्हणूनच हा कविता संग्रह म्हणजे आदिवासी लोकांच्या वेदनेचा हुंकार आहे असे मला वाटते…
आदिवासी हा मूळातच भोळा भाबडा, प्रामाणिक तसेच सोशिक आहे. त्यामुळेच त्याच्या वाट्याला दारिद्रय, फसवणूक, शोषण अशी अनेक दुःख आली आहेत. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आजही अनेक आदिवासींना उरात भळभळत्या जखमा घेवून स्थलांतर करावे लागते. उन्हाळ्यात तर रोजीरोटीसाठी बाहेर पडल्याने अनेक वाड्या , वस्त्या, पाडे ओस पडतात, घरी राहतात फक्त म्हातारी माणसं… त्यातील काही मरणाच्या दारात असलेली.. तर कधी काहींच्या वाट्याला असेही दुःख येते, देशी भागात बाहेर कामाला गेल्याने बापाचा मृत्यू होतो तेव्हा मुलगा घरी नसतो. एव्हढेच काय तर, बापाच्या दहाव्याचा खर्च करता यावा म्हणून पुन्हा मजुरीसाठी बाहेर पडावे लागते. हे पाहून कवीला अतीव दुःख होते. “गावाच्या वेशीवर जाऊन बघ” या कवितेत कवी म्हणतात,
” आता कुणीतरी लावा मलम ओल्या जखमांवर
कधी जायच्या थांबतील टोळ्या मजुरीसाठी बागेवर
पेटली म्हाताऱ्याच्या सरणाची होळी
बापाच्या दहाव्यासाठी
पुन्हा चालली डीपिंगसाठी टोळी
या आमच्या जीवनाला सांगा
काय देऊ आम्ही नाव?”
संघर्षाच्या या जीवनाला कोणतं नाव देवू? असा रोख ठोक सवाल कवी विचारतात..
तर अनेक आदिवासींचा संसार हा तूटपुंज्या पैशातून चालतो. तीस, चाळीस वर्षांपूर्वी तर एक एक रुपयासाठीही कसरत करावी लागत असे. मध गोळा करणे, मोह फुलं गोळा करणे या बरोबरच काटेरी कर्डईच्या मोहऱ्या काढणे अशी कामंही केली जायची. त्यातच करडई खोडणे हे काम फारच त्रासदायक. कर्डईचे काटे टोचले तर अंगाची नुसती आग होते. तरीही पूर्वी अनेक आदिवासी स्त्रिया भर उन्हात हे काम करत असत. त्यातूनच किमान गरजा पूर्ण केल्या जायच्या. “आजीचा संसार” या कवितेत कवीने हा संघर्ष मांडला आहे.
” हातात काठी घेवून
आजी रानोमाळ तुडवत
कर्डईच्या काट्या पायात
टोचून घेत
मोहऱ्या खोडायची…
खोडलेल्या मोहऱ्या विकून
पाच दहा रुपये यायचे
तेव्हाच घरातल्या
पोरासोरांच्या पोटात
दोन घास पडायचे….
फाटका संसार चालवण्यासाठी
आजी रोजच झटायची अन्
काटे अंगात टोचून घ्यायची.”
” तांडा” या शीर्षक कवितेत कवी म्हणतात,
“गादड्या गोदडया पोत्यात भरून
चाललाय तांडा देशावर
कष्टाचं नाव लिहिलंय
त्यातल्या प्रत्येकाच्या कपाळावर… तर कवितेच्या शेवटी लिहितात,
” कर्ज फेडण्यासाठी रात्रंदिवस
ऊन पाणी झेलत राहतात
परतफेड करण्यासाठी पुन्हा पुन्हा असेच
गाठोडयांचे तांडे निघतात…”
रोजी रोटी साठीचा हा संघर्ष या कवितेतून व्यक्त होतो. तर आज भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतकी वर्ष होवूनही आदिवासींच्या वेदना फारश्या कमी झाल्या नाहीत हे ते “राख रांगोळी” या कवितेतून मांडतात,
” स्वातंत्र्याचा उजेड पडला
पण आमची काळरात्रच आहे
सुजलाम सुफलाम स्वप्नच राहिलं
अजूनही जीवनात कडक उन्हाळाच आहे..”
तर
“उरलाय फक्त” या कवितेत कवी रोखठोक प्रश्न विचारतो,
आमच्या पूर्वजांची
हाडं काडं,कवट्या
वस्त्रे भांडी कुंडी
सगळं काही ठेवलं
म्युझियम मध्ये
पण जिवंतपणी जगणाऱ्या
आदिवासींच काय..?
अशा अनेक कवितेतून कवी भिडस्तपणे सवाल विचारतात.. तसेच अनेक आदिवासी स्त्रियांवर तिच्या अगतिकतेचा फायदा घेवून अत्याचार झालेत. कवी तिचे दुःख मांडतात “भूक” या कवितेतून,
“तिची उपासमार होत असलेली पाहून
त्यांनी तिला खाण्यासाठी
काहीतरी देतो म्हणून
घरात बोलावलं
तिच्या देहाकडं
चोरटी नजर टाकत
त्यानी हळूच दार ढकलले..”
कवीने “तांडा” या कविता संग्रहात आदिवासी शेतकरी, मजूर, स्त्रिया यांच्या दारिद्र्य, फसवणूक, दुःख, अत्याचार यांच्या वेदना मांडल्या… कारण कवीने या वेदना जवळून पहिल्या आहेत. मात्र ह्या वेदना स्वतः शोषित वर्ग समाजापुढे मांडत नाही. जीवनात जे भोग आलेत ते भोगायचे, त्याबद्द्ल दुःख मांडायचे नाही म्हणून सर्व सहन केलं जातंय. मात्र या शोषितांच्या मुक श्वासात एक वेदनेचा हुंकार आहे. म्हणून हा हुंकार कवीला स्वस्थ बसू देत नाही त्यातूनच हा “तांडा” कविता संग्रह त्यांच्या लेखणीतून अवतरला आहे….
प्रा. डॉ. मधुचंद्र भुसारे यांच्यासारखा भिडस्त कवी आपल्या लेखणीतून शोषितांच्या वेदना समाजापुढे मांडण्यासाठी लढतो आहे.. यापुढेही सरांनी असेच भिडस्त,दर्जेदार लिखाण करावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते…!!
गंगा गवळी-पवार
नाशिक
( क. म. शिक्षिका, लेखिका, कवयित्री, निवेदिका)

