[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

‘आदिवासी बालमनाच्या भावविश्वाचे निर्मळ दर्शन घडविणारा आनंदाचा झरा:लाहानपण इचतूय मी’

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

आदिवासी बालमनाच्या भावविश्वाचे निर्मळ दर्शन घडविणारा आनंदाचा झरा:लाहानपण इचतूय मी’

आदिवासी साहित्यामध्ये ललित लेखन आजपर्यंत फारसे झालेले दिसत नाही. आदिवासी भाग हा दारिद्र्याने प्रचंड गांजलेला आहे. आदिवासी भागातील लहान मुले अथवा मुली निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला हव्या त्या वस्तूचे साजेसे खेळणे बनवून त्यात आनंद शोधतात व लहानपण साखरेच्या कणाप्रमाणे गोड बनवू पाहतात अशा अनेक बालपणीच्या आठवणी ‘लाहानपण इचतूय मी’
या प्रा.सौ. गंगा गवळी-पवार यांच्या नुकत्याच दि.०७ एप्रिल २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या ललितगद्य लेख संग्रहामध्ये प्रामुख्याने वाचायला व अनुभवायला मिळतात. या ललित लेख संग्रहाला महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा.श्री. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत तसेच ‘पाड्यावरचा टिल्या’ या कादंबरीचे सुप्रसिद्ध लेखक मित्र तुकाराम चौधरी यांची दर्जेदार प्रस्तावना लाभली आहे. लेखिकेने हा ललित लेख संग्रह ‘जिच्या सहवासात संपूर्ण बालपण गेले, जिच्या मायेचा हात सदैव माझ्या पाठीवर फिरला, जिच्या आठवणी आजही माझ्यासोबत आहेत, अशा माझ्या प्रेमळ भागाआईच्या स्मृतीस अर्पण केला आहे.‘लाहानपण इचतूय मी’
या ललित लेख संग्रहामध्ये पारिजातकाची फुला, अंगणातली रातशाळा, गवऱ्या,साळची मदली सुट्टी, खेळ वासनांचा, लहानपण इचतूय मी, जाता, चाफा व उडणारी म्हतारी असे एकूण ०९ ललित लेख समाविष्ट आहेत. अस्सल आदिवासी कोकणा बोलीभाषेतून सर्वही ललित लेख लिहिले असून आदिवासींच्या कोकणा बोलीभाषेला मराठी साहित्यविश्वात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य यानिमित्ताने प्रा.सौ. गंगा गवळी-पवार यांच्या ‘लहानपण इचतूय मी’ आणि ‘धुनीवरल्या गोठी’ या दोन पुस्तकांनी केलेले आहे. एका बाजूने अनेक बोलीभाषा लुप्त होत असताना आदिवासी कोकणा बोलीत साहित्य लेखन करण्याचा घेतलेला धाडसी निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे, यात तीळ मात्र शंका नाही. व्यक्त होण्यासाठी साहित्यिकाला प्रमाण भाषेची गरज असतेच असे नाही तर आपल्या बोलीभाषेतूनही मनातील भावविश्व व भावभावना अत्यंत दर्जेदारपणे रेखाटता येऊ शकतात हे प्रा.सौ.गंगा गवळी-पवार यांच्या दोन साहित्यकृतींच्या लेखनातून सिद्ध करून दाखवून दिले आहे. बालपण म्हणजे एक निर्मळ, स्वच्छ, न विसरता येणाऱ्या अनेक आठवणींचा झराच असतो. आपल्या दारिद्र्याचा, गरीबीचा कोणताही बाऊ न करता मिळेल त्या वस्तूत मिळेल त्या परिस्थितीत आनंद शोधणारे आदिवासी भागातील बालपण एका अर्थाने जगण्याला नवा अर्थ निर्माण करून देते व जीवनात आनंद कसा शोधावा? याचे मूर्तीमंत आदर्श उदाहरण आपल्यासमोर उभे करते. आदिवासींचे तसेच लेखिकेचे निसर्गावर, निसर्गातील प्रत्येक घटकांवर अत्यंत प्रेम असून इथला निसर्गच आणि परिस्थिती बालविश्वाला हव्या त्या गोष्टी, हवी ती खेळणी बनवून खेळायला शिकवतो त्यातून मिळणाऱ्या आनंदापुढे भौतिक सुख कुठेही लागत नाही. भौतिक सुखांची वाणवा असूनही आदिवासी भागात बालमनाला रिझवणाऱ्या, आनंद देणाऱ्या अनेक खेळाच्या कलाकृती उपलब्ध आहेत हेही विसरून चालणार नाही. म्हणूनच कदाचित आदिवासी माणसांना भौतिक सुखांपेक्षा निसर्गच अधिक जवळचा वाटतो. लेखिकेने बालवयात निसर्गासह अनेक छोट्या मोठ्या गोष्टीतून मिळविलेला निखळ आनंद आपल्या उगवत्या आणि प्रवाही शब्दशैलीच्याद्वारे मूर्तिमंत केला आहे. प्रत्येक ललित लेख वाचकाला आपल्या बालपणीच्या भावविश्वात घेऊन जातो आणि कित्येक वेळ त्यात गुंतवून ठेवतो हेच या ललित लेख संग्रहाच्या यशाचे गमक म्हणावे लागेल.
(१)
‘लहानपण इचतूय मी’ या ललित लेख संग्रहातील पहिल्या ‘पारिजातकाची फूलां’ या ललित लेखामध्ये पारिजातक हा जणू प्रियकरासारखा अवतरला आहे. या पारिजातकाने लेखिकेवर संपूर्ण लेखभर मोहिनी घातली आहे असेच वाटते. पारिजातक आणि त्याची फुले वेचण्यासाठी सकाळी साखर झोपेतून उठून लेखिका न चुकता रोजच जाते. पारिजातकांच्या फुलांवर लेखिका अक्षरशः भाळली आहे. पारिजातकाचे आणि फुलांचे वर्णन करताना लेखिका म्हणते, ‘निसता त्येच्याखल पाहला, तरी येरच कोणालही भुलवन पाडतील अशी पारिजातकाची ही फुला…! होडेकसे दोड्यातून उमलून फुलाय लागल्येवर, त्येच्ये सुवासिक घमघमाटानी चंबूतचे समंदे परिसरालच मोहवून टाकत ह्या फुला… (पृष्ठ क्र.१६) पारिजातक आणि फुलांचे कमीत कमी शब्दात सुंदर वर्णन केले आहे. एकंदरीत लेखिकेला फुलांविषयी बालपणापासूनच प्रचंड आवड आहे. फुलांचा रंग, सुगंध, झाड, पाने, फुलांचा आकार याविषयी लेखिका संपूर्ण लेखात पारिजातकाच्या फुलांचे भरभरून रसभरीत वर्णन करते. पारिजातकाचे फुलझाड स्वर्गातून पृथ्वीतलावर कसे आले? या मागची पौराणिक, सुरस कथा देखील लेखिका कथन करते. आदिवासी भागातील जंगलात आढळणारी पारिजातकांबरोबरच विविध फूलझाडांचा परिचय लेखिका वाचकाला करून देताना म्हणते, ‘त्येयेळस आमचे घरापुडले आंगणात, तसाच घराचे पाठीमागले वाड्यात रातराणी, अबोली, गुलाब, मोगरा, जास्वंदी, टगर, चिनी गुलाब, कर्दळी, गंदगोळी, टीवरा अशी कित्येक फूलझाडा होती….. समंदीच फुला येगयेगळे रंगाची तशीच येगयेगळे सुवासाची होती… ह्ये समंदेच फुलझाडांची फुला मालं आवडत’. (पृ.क्र.१८) फुलांवर व त्याच्या सुगंधावर जीवापाड प्रेम करणारी लेखिका फुलांच्या सुगंधाप्रमाणेच आपल्या बोलीभाषेचा सुगंध संपूर्ण ललित लेख संग्रहातून वाटत राहते. फुलांसारखीच नाजूक शब्दकळा त्यांच्या प्रत्येक ललित लेखातून उमटली असल्याचे सहजपणे जाणवते. पारिजातकाची फुले वेचण्याची आवड नसून वेड आहे, हे लेखिकेच्या लेखनावरून सिद्ध होते. पारिजातकाची फुले वेचण्यासाठी पारेजातकाच्या झाडाजवळ शेणाने सारवून जागा स्वच्छ करणे, झाडून काढणे, ओटा तयार करणे ही सगळी कामे फक्त पारिजातकाची फुले वेचण्यासाठी लेखिका अत्यंत जीव ओतून, मन लावून करते. प्रत्येक मैत्रिणी आपापल्या वाटून दिलेल्या जागेतील फुले वेचतात त्यात कोणत्याही प्रकारचा नियम व नियमांची चौकट कोणीही तोडत नाही अशा बालकांच्या भावविश्वातील नियमबद्ध व प्रामाणिकपणाचा प्रत्यय लेखात येतो. फुले वेचणाऱ्या मुली व त्यांना न रागावता वरवरचा लाडिक दम भरून कोणत्याही पारिजातकाच्या झाडाची फांदी न तोडता फुले वेचण्याची वाहिनीने घातलेली अट ही आदिवासी जीवनमूल्याची व झाडांवर आदिवासी माणसांचे जीवापाड असलेल्या प्रेमाची आठवण करून देते. माणसांना जसे अवयव असतात तसे झाडांनाही अवयव असतात. त्या अवयवांना नुकसान न पोहोचवता, त्यांचे मनही न दुखवण्याइतकी काळजी घेणारे, भूतदया व वृक्षप्रेमी असणाऱ्या आदिवासी मनाचा प्रत्यय देखील साहजिकच येतो. अंगणात खेळायला आलेल्या मैत्रिणींना दिलेली चिमण्यांची उपमा अतिशय समर्पक आहे. दव भरल्या पहाटेच्या वेळेला पारिजातकाच्या झाडाजवळ जाऊन हातांच्या ओंजळीत फुले भरून त्याचा मन भरून सुगंध घ्यायला देखील लेखिकेला आवडते. लेखिकेने पहाटे उठून पारिजातकाची फुले वेचायला जाऊ नये यासाठी तिला घाबरविण्यासाठी अनेक भुताखेतांच्या गोष्टी घरच्या माणसांकडून सांगितल्या जायच्या. पारिजातकाच्या फुलांच्या सुवासाने भुते येतात, झाडाजवळ अंधारात भुते बसलेली असतात अशा अनेक गोष्टी तिला घाबरविण्यासाठी सांगितल्या जातात परंतु फुलांच्या प्रेमात पडल्याने व फुलांच्या ओढीने भूतांची भीती तिला कधीच वाटली नाही, उलट फुलांच्या ओढीने तिची भीती दूरवर पळून जाते. गळून पडणाऱ्या पारिजातकाच्या फुलांचे वर्णन लेखिकेने अत्यंत सुंदररित्या केले आहे. ‘पाहाटचे गार वाऱ्याचे झुळके सरशी येक येक फुल झाडावरून आपोआप वगळून पड… फुल वगळून भुईवर पडायच्या आदि ती गरकं घेत घेतच वगळून पडत. जाहा ती वगळून खाली पडत, ताहा कदी कदी दवात ती भिजून निगत.. काही फुला वगळत ताहा झाडाचे पानांवरच आडकून पडत… झाडाचे पानांवर इसावेल त्या फुला हातानी हाळूच उचलाय भारी वाट. फुला गळून खाली पडत ताहा ती भुईवर सडाच घालत तं..’ (पृष्ठ क्र.२६) पारिजातकाचे फूल वेचणे, फुले वेचण्याचे वेड लागणे, त्या झाडाकडे सतत पहात राहणे, त्या झाडाची निगा राखणे, इतर झाडांपेक्षा पारिजातकाच्या झाडात काहीतरी वेगळेपण दिसणे अशा रितीने पारिजातकावर फुले वेचण्याच्या अंगाने जडलेले प्रेम, पारिजातकाच्या फुले वेचण्याच्या वेड्या प्रेमाची आगळीवेगळी कहानी म्हणावी लागेल. कवी आकाश साळवी म्हणतात,
*‘गंधाळली पहाट, प्राजक्त फुलांचा सडा*
*मन मन माझे जसे, जाई जुई केवडा’*

अशाच प्रकारची मनस्थिती लेखिकेची पारिजातकाचे झाड आणि फुले पाहिल्यावर होते. लेखिका म्हणते, ‘पारिजातकाचे झाडाचा समंदेच फुलझाडापरिस येगळाच रह… त्येची फुला कदीच हातानी खुडाये लागायची नाय… त रातभर आंगभर फुलाही सजेल पारिजातक पहाट होयेची चाहूल लागं, ताहा आपण होऊन फुला भुईवर वगळून टाकं…. मजे, जसा काय दुसऱ्यासाठीच फुला आन त्येचा सुवास उदळून दियेचा तो’…..(पृष्ठ क्र.२७) अशाप्रकारे पारिजातकाच्या झाडाकडून दुसऱ्यासाठी सुगंध देणे, दुसऱ्यासाठी प्रेम आणि आयुष्य उधळीत राहणे हेच आपले जीवित कार्य आहे, हेच जीवित ध्येय मानणारी प्राजक्ताच्या झाडाची भूमिका लेखिकेने आपल्याही अंगी बाणवली आहे. ही शिकवण लेखिकेला पारिजातकाच्या झाडाकडून मिळाली आहे. दरवेळेस पारिजातकाच्या झाडाचे वेगळे रूप दिसणे, त्याविषयाचे प्रेम, आवड निर्माण होणे, भूक तहान विसरून फुले वेचण्याचे प्रचंड वेड लागणे, त्यासाठी वडिलांचा राग देखील सहन करणे, त्यासाठी बंडखोरी करणे हे सर्व लक्षात घेतल्यावर लेखिकेला योगायोगाने सासरच्या मंडळींनी दिलेले ‘प्राजक्ता’ हे नाव अत्यंत साजेसे तसेच समर्पक वाटते. पारिजातकाच्या फुलझाडाचे वेड असलेली लेखिका रानवेडी तर आहेच परंतु फुलवेडी देखील आहे. हे वेड पाहिल्यावर वडील देखील चिडतात आणि रागावून म्हणतात, ‘पाहजं त दोनेक गोदड्या घेऊन तठच झाडाखल निजायेही जाय… मंग पाहाटचे लवकर उठून जायेची गरज काय पडणार नाय’….(पृष्ठ क्र.२९) सतत दररोजचा दिनक्रम न चुकवता जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण संपेपर्यंत फुले वेचण्याचे कधीही बंद झालेले नाही म्हणूनच कदाचित पारिजातकाच्या फुलाप्रमाणे झाडाचे मन जाणून घेणाऱ्या लेखिकेचे मन हे नाजूक व हळुवार बनले असून त्यांची शब्दकळा फुलाप्रमाणे नाजूक, सुकुमार व कोमल बनलेली दिसते. आज लेखिका पारिजातकाचे झाड पाहते तेव्हा तिला तिचे बालपण आठवते. वेण्यांमध्ये माळलेल्या पारिजातकाच्या फुलांचा गजरा माळलेली फुले, पाठीवर घातलेल्या दोन वेण्या हे सर्व आठवल्यावर लेखिका बालपणाच्या आठवणीत रममाण होते व तिचे मन पारिजातकाच्या झाडाजवळ क्षणभर घुटमळते. लहानपणीचा आनंद ती पारिजातकाच्या झाडाजवळ उभी राहून आजही शोधत राहते. मोठेपणाचे ओझे झुगारून देऊन आजही बालपण स्विकारावे असेही तिला वाटत राहते. पारिजातकाच्या फुलांचा सुगंध आज तिच्या मनात भरभरून वाहतो. झाडाची फुले किती वेचावी आणि किती नाही असे तिला होते. झाडाजवळ उभे राहून त्या झाडाशीच आपले मनोगत जणू काही बोलत राहते. पारिजातकाच्या फुलाचे निस्वार्थीपण, कोमलपण व दुसऱ्यासाठी सुगंध देण्याचे वृत्ती कथन करताना लेखिका म्हणते, ‘हा पारिजातक पण कसाक ना…? रातभर खांद्या खांद्यांवर फुलून येतोय, फुलांचा सुवासही समद्यांलंच मिळावा, मगून तो लांबधर पांगतोय…. मग पाहाटचे वाऱ्यासंगा आपोआप फुला वगळून त्येचा भुईवर सडाच त घालतोय….! पदरलच त काय…? पण दुसऱ्यासाठीच मनमोकळेपणी सुवास उदळतोय तो… मग फुलांचा इचार करता करता मालही वाटतय, आपण पण पारिजातकाचे झाडावानीच होवा का…? त्येचेसारकाच मन हालका करून रिता करावा… मन रिते होयेल मनात पारिजातकाचा सुवास सासवून ठवावा…. होडा का, ठासूनच भरावा… काळजाचे खोल खोल कप्प्यात… पाहजं तवडा आगदी मनाजोगा… आयुक्शभरासाठी’…! (पृ.क्र.३२-३३) थोडक्यात, ‘पारिजातकाची फुला’ हा लेख म्हणजे लेखिकेने आठवणींच्या रूपाने वेचलेल्या सुगंधी, सुवासिक फुलांची मनाच्या परडीत केलेली साठवण आणि बालमनाला सापडलेला आनंदाचा खळाळणारा अवखळ झरा अस्सल आदिवासी कोकणा बोलीभाषेतील सुकुमार शब्दकळांच्या सिंचनातून घडविलेला जणू भावना आविष्कारच होय’.
(२)
‘आंगणातली रातसाळा’ या दुसऱ्या ललित लेखांमध्ये घराच्या अंगणामध्ये रात्रीच्या वेळी विविध अज्ञात घटकांचे तसेच आकाशातील चांदण्या, तारे, तारका याविषयीचे आलेले वर्णन आणि त्यातून लेखिकेला मिळालेले ज्ञान भरभरून मिळालेली शिदोरीच ठरली आहे. म्हणूनच या लेखाला ‘आंगणातली रातसाळा’ हे नाव दिले आहे ते तितकेच समर्पक देखील वाटते. ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात जीवाला गारवा मिळावा अशी गरिबीने गांजलेल्या आदिवासी माणसांकडे कोणतीही साधने नसतात. अशा आदिवासी भागात दुपारच्या वेळेला गारेगारवाला आल्यावर मुले ती गारीगार घेण्यासाठी उकिरड्यावरचे भंगार, केसांचे कुंजके शोधून ती गारेगारवाल्याला विकतात आणि थंडगार गारगार खाऊन जीवाला गारवा मिळवून घेतात. मोठी माणसे सभोवतालच्या झाडाखाली बसून थंडगार वाऱ्यात झोपतात. करमणुकीची साधने नसल्याने झाडाखाली बसून किंवा मंदिराच्या वाट्यावर बसून गप्पा मारणे, त्यातून अनेक अफवा देखील ऐकायला मिळतात. हंडीच्या घोलात धोरोकरी येणे, रात्री गावात चोरांची टोळी येणे व घराची कवले उस्तरून घरात येऊन चोरी करणे, धरण बांधताना त्या बांधात गाडण्यासाठी लोकांना पकडून नेणे, देवीचे पायरीजवळ वेड्यासारखा माणूस दिसणे त्यावरून तो खबऱ्या असावा, दरोडेखोर असावा त्याच्याविषयीचे समज-गैरसमज निर्माण होणे अशा प्रकारच्या चोरांविषयीच्या अनेक अफवा मंदिराच्या पारावर किंवा अंगणातील ओट्यावर ऐकायला मिळतात. चोरांचा बंदोबस्त व्हावा म्हणून गावातील माणसांचे पहारे करणे सुरु होते परंतु आदिवासी माणसे आपल्या घरात खाण्यापुरते धन-धान्य फक्त ठेवतात गरिबीने गांजलेल्या आदिवासींच्या घरात चोरून नेण्यासारखे त्यांच्या जवळ काहीही नसते. एकंदरीत आदिवासी भागातील लोकांच्या घरातील हालाखीची परिस्थितीचे वास्तव चित्रण देखील लेखिकेने केले असून त्या म्हणतात, ‘समंदे गावातून फकस्त दोन-तीन लोकांखल शेतात इहिरी होत्या. त्येच्यानी भात, नागली,वरी, उडीद अशी पोटापाण्यापुरता हांगामी पिका घेतली जायेची…मग आसे परिस्तीतीत लुटण्यासारका तरी लोकांखल काय होवा…? (पृष्ठ क्र.३६) आदिवासी भागात रात्री जेवण झाल्यावर करमणुकीची काही साधने नसल्यामुळे लोकांची ढोलावरील नाचगाणी होतात, तर कधी पुरुष माणसे बायांचा वेष परिधान करून तमाशे करतात. रात्री झोपताना ढेकणांचा होणारा त्रास त्यामुळे बऱ्याच माणसांचे अंगणात झोपणे सहाजिकच असते. अंगणामध्ये झोपणाऱ्या लोकांचा लेखिकेला नेहमीच हेवा वाटतो. तितकीच अंधारात फिरणाऱ्या चोर, किड- मुंगे, सरपटणारे प्राणी यांच्या विषयीची भीती देखील वाटते. रात्रीच्या वेळी अंगणात झोपल्यावर दिसणारे आकाश म्हणजे लेखिकेला रात्रीचा काळाकुट्ट फळाच वाटतो. अंगणात बसल्यावर लेखिकेचे वडील आभाळातील ग्रह, तारे, चंद्र, आकाशगंगा, नक्षत्र यांची इथंभूत माहिती देतात. चंद्रावर काळा डाग कसा पडला? अमावस्या, पौर्णिमा कशी होते? त्याविषयीच्या पौराणिक कथा, त्याविषयीचे विज्ञान, अंतराळात माणूस कसा गेला? चंद्रावर कसा पोहोचला? चंद्राला चांदोमामा का म्हटले जाते?ग्रह, उपग्रह कसे तयार झाले? चंद्राला खळे कसे पडते? याविषयीची शास्त्रीय माहिती देखील लेखिकेचे वडील तिला करून देतात. यामुळेच लेखिकेच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे बीज रुजते. लेखिकेच्या मनातील गैरसमज देखील सहजपणे दूर करून देताना वडील म्हणतात, ‘जाहा कदी चांदाल आसा खळा पडतय, ताहा आबाळात देवांची सबा भरत्येय आसा काहीच रहत नाय… त पृथ्वीचे कक्श्येत बरफाचं कण जमा होतंय…. त्येच्यानीच चांदाचे चंबुत आसा खळा पडतंय’… (पृष्ठ क्र.४१) मृग नक्षत्र लेखिकाला प्रचंड आवडते. या मृग नक्षत्राची तसेच ध्रुव बाळाची पौराणिक गोष्ट लेखिकेला वडिलांकडून ऐकायला मिळते. शुक्रतारा, मंगळ ग्रह, सात चांदण्यांचा पुंजका, सप्तर्षी, चोरांचा चांदला या सर्व गोष्टींचा वास्तवपणे उलगडा करून देऊन त्या मागील खरे कारण वडील लेखिकेला समजून सांगतात. म्हणूनच लेखिका म्हणते, ‘लाहानपणातले आंगणातले आमचे ह्ये रातसाळत आबाळाचे काळे फळ्यावरले चांद,गरह, आकाशगंगा, तारं, तुटते तारं, धूमकेतू आसे समद्यांची माहिती मिळत गेली… निसरगातले येगयेगळे घटकांची माहिती समजून घियेल… त्येंचे इसयीचा न्यान मनात जागा होवा, मगून वडील आदी करमणूक मगून गोठी सांगत. मग त्येची शासरीय कारनाही सांगत’.(पृ.क्र.४४) अशाप्रकारे त्यांना रात्रीच्या शाळेत नभांगनातील विविध घटकांची सविस्तर माहिती मिळत गेली. लेखिकेच्या वडिलांचे ‘दलित मित्र’ म्हणून ओळखले जाणारे आवारी गुरुजी, यांच्याकडूनही रात्रीच्या वेळी अंगणात बसलेले असताना विविध प्रकारच्या वनौषधींचे उपयोग, त्यांना दिलेली नावे, आदिवासी समाजातील वाद्य, लोकगीते, लोकनृत्य, त्यांचा उगम, गावांचा इतिहास तसेच बोरवट या गावाचा इतिहास इत्यादी विषयी देखील माहिती ऐकायला मिळते. यातूनच लेखिकेचे मन सजग, अभ्यासू, तर्कनिष्ठ व जिज्ञासू बनत गेले. लेखिकेच्या वडिलांनी या अंगणातल्या रातशाळेत जगाच्या पसाऱ्याचे अनमोल ज्ञान घरातील भावंडांना दिले. इतिहासाच्या गोष्टी, सणांची माहिती दिल्यामुळेच लेखिकेला वाचनाची आवड निर्माण झाली. वडील व सज्ञान माणसांचे अनुभव लेखिका भान हरपून ऐकत राहते. रात्रीच्या वेळी भूताविषयीची घातलेली भीती लेखिकेच्या मनात घर करून बसते. रात्रीच्या वेळी छम छम वाजणाऱ्या घुंगराचा आवाज हा भुताचा नसून बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगरांचा आवाज आहे, याचा उलगडा झाल्यावर लेखिकेच्या मनातील भूतांची भीती नष्ट होते. रात्रशाळेची आठवण झाल्यावर लेखिका त्यात गुंतून जाते. आजही सुट्टीच्या काळात लेखिकेला रात्रशाळेतील अंगण व आकाशातील ग्रह, तारे, चांदण्या, नक्षत्र भुरळ घालतात. त्यावेळी ऐकलेल्या गोष्टी, त्यातून होणारी करमणूक, त्यातून मिळणारा आनंद, शहरासारख्या उंच इमारतींच्या गच्चीवर उभे राहून पाहण्यापेक्षाही काहीतरी वेगळा होता, हेही लेखिका सांगायला विसरत नाही. आज भातिक सुखे माणसांच्या पायाशी लोळण घेतात परंतु गावाकडल्या अंगणात बसून काळ्याकुट्ट रात्री आकाशातील गमती-जमती अनुभवण्या इतके स्वर्ग सुख आज कधीही मिळणार नाही, याची खंत देखील लेखिका या लेखामध्ये व्यक्त करते.
(३)
‘गवऱ्या’ या ललित लेखांमध्ये लेखिका शेण्या अर्थातच गुराढोरांच्या शेणापासून तयार केलेल्या व सरपण म्हणून वापरल्या जाणाऱ्या गोवऱ्या वेचण्याविषयीचा अनुभव कथन करते. यावर लेखिका म्हणते, ‘त्येटायमात गावाखल परत्येक घरात चूल, उखळ, मुसळ, पाटा-वरवटा, जाता आस्या दरदिशी वापरल्या जायेच्या त्या वस्तू रहत… त्येटायमात चुल चेटवायचा येकच सादन होता त्या मजे, रानावनातून गोळा करून आणेल त्या फाट्या आन त्येंचेसंगा गवऱ्या’… (पृष्ठ क्र.५२) आदिवासी भागात चूल पेटवण्यासाठी प्रामुख्याने या गोवऱ्यांचा वापर केला जातो. पाणी तापवणे, स्वयंपाक करणे यासाठीही त्या वापरल्या जातात. लेखिका आपल्या मैत्रिणींच्या सोबत या गोवऱ्या गोळा करण्यासाठी गावाच्या अवतीभवती असलेला परिसर धुंडाळून काढते. मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यावर पाऊस पडायच्या अगोदर या गोवऱ्या गोळा केल्या जातात व पाऊस पडायच्या आतच त्या घरात आणून साठवल्या जातात. घरामध्ये फाट्या (सरपण), गोवऱ्या,सरपण, वैरण भरण्याची मे महिन्यात आदिवासी भागामध्ये लोकांना घाई होते. लेखिका आपल्या बहिणींसह आई-वडिलांना गोवऱ्या, सरपण, वैरण भरायला मदत करतात. नडगदरी, डुक्करमाळ, चारणवाडी, चोंडी नदी,म्हशाची पातळी, पाथरटखंडी नदी, रानवा, वरसाचा झाड याठिकाणी तिच्या मैत्रिणी आणि लेखिका कधीही गोवऱ्या वेचायला गेल्या नाहीत कारण गावातील माणसांकडून त्यांनी तिथे म्हशा, चारनीन, हेडोळी, खैस, रानवा अशी रानभूते निघत असल्याच्या बातम्या व अफवा ऐकल्यामुळे त्यांच्या मनात भीती असते. परंतु याउलट आखंदारवाडी, बेलदरी, खिडकरबारी, वाकडवहाळ, तलावाचा परिसर, बाजारवाट, बुवाआजाचा डोंगर, पाथरटखंडी नदी, चोंडी नदी, डुक्करमाळ, घोडीचा माळ, देवीची पायरी या परिसरात मात्र मैत्रिणींसोबत लेखिका गोवऱ्या वेचायला आवडीने जाते. गोवऱ्या वेचत असताना मैत्रीणी एकमेकांच्या गोवऱ्याच्या टोपल्या भरायला मदत करतात. दमल्यानंतर झाडाखाली निवांत बसून गप्पा गोष्टी मारतात. एका दिवशी अशाच झाडाखाली बसल्यानंतर दारुडे त्यांना दारू विकणारी माणसे समजून पळत पळत त्यांच्याजवळ येतात व ते दारू विकणारे नसून आपल्या गावातील मुली आहेत हे पाहिल्यानंतर त्यांची प्रचंड फजिती होते. दारुडे लेखिका आणि तिच्या मैत्रिणींकडे पाहून हसत हसत म्हणतात, ‘तुमचे मायल,तुमचे त पोरग्याहो…, गवऱ्या इचाये आल्याहा काय व…? तेवढ्यात दुसरा एक जण म्हणतो, पोरग्याहो, आमाल पक्का फापळवला व तुमी… पण आदवाचे आठ काहाल येऊन बसल्याहा…? (पृ.क्र.५८) वरील संवादात आदिवासी माणसांच्या बोलण्यातही प्रेमळपणा, भाबडेपणा, जिव्हाळा दडलेला असून मैत्रिणी व लेखिका समोरच्या व्यक्ती दारुडे असूनही त्यांची भीती देखील वाटत नाही. दारुड्यांनी त्यांना दारू विकणारे समजून दारुड्यांची झालेली फजिती पाहून त्या हसतात. विनोदाद्वारे हलक्या फुलक्या वातावरणाची निर्मिती या ठिकाणी लेखिकेने प्रसंगाद्वारे केली आहे. लेखिका आणि मैत्रिणी भूक लागल्यावर उंबराच्या झाडाची उंबरे देखील खातात परंतु त्यातील बारीक किडे तोंडात जाणार नाही याचीही काळजी घेतात. उंबराच्या झाडाला फूल कधी दिसले नाही याचेही लेखिकेला वारंवार नवल वाटत राहते. उंबराच्या फुलाविषयीच्या अनेक चमत्कारिक गोष्टी लेखिका इतरांकडून ऐकते. उंबर म्हणजे सगळ्या पक्षांना खाद्य देणारे लेकुरवाळे झाडच असे लेखिकेला वाटत राहते. उंबरे खातानाचा प्रसंग लेखिकेने सुंदररित्या चितारला आहे. आदिवासी भागातील करुंदा, आळवा, खरबाटा, तोरणा, गळघुगरा, इंगळा, टेंभुर्णा, जांभळा, आंबे, भोकरा, असंदा अशा अनेक रानमेव्याची ओळख ही लेखिकेने करून दिली आहे. लेखिका म्हणते, ‘रानात गवऱ्या इचाये जायेचे नाड्यांनी, रानमेव्याची चव चाखा ताहा, तशीच रानातली झाडा-झुडपा, फुला पाहा, ताहा मालं तो निवळ आनंद मिळं’… (पृष्ठ क्र.६४) लेखिकेला गोवऱ्या वेचताना रानमेव्याची चव चाखण्यातून अभूतपूर्व आनंद मिळतो. गोवऱ्या वेचताना करवंदीच्या झुडपाखाली दिसलेल्या घाऱ्या डोळ्याच्या प्राण्याला पाहून भीतीने त्यांची गाळण उडते व लेखिकाच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. या वेचलेल्या गोवऱ्या पेटवून त्याच्यावर ओली घोंगडी सुकवली जाते. गोवरीच्या राखेने दात घासले जातात. ओला गोठा कोरडा करण्यासाठी गोवरीची राख वापरली जाते त्यामुळे ओलावा कमी होतो. पावसाळ्यात शेतात चहा गरम करण्यासाठी गोवरी वापरली जाते. बी-बियाण्यांना, धान्यात कीड लागू नये म्हणून त्यात गौवरीची राखुंडी टाकली जाते. गुरांच्या शेणापासून गवऱ्या थापल्या जातात हे अनेक फायदे गवरीच्या राखेचे आदिवासी भागात लोकांना होतात, याचीही इथंभूत माहिती लेखिका यात देते. आज गवऱ्या वेचणाऱ्या लेखिकेच्या मैत्रिणी कुणाची लग्न झाली आणि कुणी अर्धवट शाळा सोडून दिली. दहावी, बारावी पर्यंत काहींची शाळा बंद झाली तर लेखिका शिकून नाशिकसारख्या ठिकाणी कॉलेजला गेली. अपयशाला पायदळी तुडवून यशाचे शिखर गाठत गेली. लहानपणाच्या अशा अनेक गोष्टी लेखिकेच्या मनात आठवतात व त्या घटना ताज्या होतात. हा लहानपणीचा ठेवा लेखिकेने आपल्या काळजात सांभाळून ठेवला आहे. उंबरा खाणे, पळसाच्या पानात करवंदे खुडून साठवणे, माळरानावर उनाड फिरणे यातून लेखिकेला प्रचंड आनंद मिळतो. आज लेखिका म्हणते, ‘त्ये समदेच क्सनाही शिकवलाय मालं, आयुक्सातला खरा जगना… मोकळे आबाळात उडणारे पाखरावांनीच’…. (पृष्ठ क्र.७०) हे सर्व बालपणीचे क्षण लेखिकेला अनेक गोष्टी शिकवून जातात हेच आनंदाचे क्षण लेखिकेला जगण्याचा खरा आनंद देऊन जातात.
(४)
‘साळची मदली सुट्टी’ या ललित लेखामध्ये लेखिकेने शाळेच्या मधल्या सुट्टीत शाळेतील मुलांबरोबर मैत्रिणींसोबत घालवलेल्या आनंदाचे क्षण मोजक्या शब्दात रेखाटले आहेत. डोंगरांच्या आत मध्ये वसलेले व दोन नद्यांच्या मध्ये वसलेले लेखिकेचे ‘बोरवट’ हे गाव. तिथे शिक्षणाची सुविधा उत्तम असल्याने आजूबाजूच्या गावांची बरीच मुले तिथे दऱ्याखोऱ्या, ऊन, पाऊस, वारा, थंडी सहन करीत तसेच चिखल तुडवीत शाळा शिकायला येतात. काहीच्या पायांमध्ये साधी चप्पल सुद्धा नसते. रस्त्यावरील धुळीचे चटके सहन करत ही मुले शिकायला येतात. आदिवासी मुलांच्या शैक्षणिक स्थितीची वास्तवरित्या मांडणी केली आहे. लेखिकेला खेळताना आजूबाजूच्या माळरानावर पसरलेली राने तसेच झाडांच्या बारीक फुलांचे अप्रूप वाटते. येथे शिकायला येणारी शाळेतील मुले फाटलेली पुस्तके, वह्या सुई दोऱ्याने शिवून वापरतात. कष्ट करून शिकतात. त्यात मुलांना कसलीही लाज वाटत नाही. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिस्थितीचे भयाण वास्तव लेखिकेने उभे केले आहे. असे असले तरी मुले शाळेच्या मधल्या सुट्टीत बाहेर येऊन मैदानावर रानपाखरावानी मुक्त होऊन हुंदडतात. घरून आणलेली मीठ,मिरची, भाकरी व मिळेल ती भाजी वाटून खातात. मधल्या सुट्टीत लेखिका, तिच्या मैत्रिणी कांद्याचा ससा करून खेळ खेळते. ‘डोंगर का पाणी’ हाही मधल्या सुट्टीतला खेळ त्यांच्या घरी रंगतो. मधल्या सुट्टीत खरकटी भांडी धुवून ठेवणे, चौथऱ्यावर पळत पळत जाणे व शाळेची घंटा होईपर्यंत शाळेत हजर राहणे हा उद्योग चालायचा. कधी कधी वडाच्या झाडाच्या पारंब्यांवर मुले आनंदाने झोका खेळतात व पुस्तकातील
*‘वडाच्या पारंब्या लोंबतात, लोंबतात*
*त्यांचे झोपाळे झुलतात, झुलतात*
*झुलत्या झोपाळ्यावर बसतात, बसतात*
*अशी आमची मुले, रानची फुले…’*
अशी गाणी गातात या प्रसंगातून बालपणीच्या अनेक आठवणी जाग्या होतात. ही मुले कधी कधी विनोद करून हसतात, खिदळतात. चिंचेच्या झाडावर लागलेल्या चिंचांवर तुटून पडतात. उंच झाडांवर न घाबरता चढतात. शाळेच्या मधल्या सुट्टीत पिकलेल्या टेंभुर्णीच्या पिकनी खाणे, कच्या टेंभुर्णीच्या फळांची पिकन घालणे तसेच काही खोडसाळ मुलांकडून पिकनी काढून खाऊन त्या जागी कोळसे, दगड, काटे ठेवून दुसऱ्याची फसगत करणे, गुरुजींनी चिंचा, बोरे यांची चोरी पकडणे व शिक्षा करणे, त्यामुळे गुरुजींना धडा शिकवण्यासाठी मुलांच्या मनात काचकुहरीच्या शेंगा गुरुजींच्या खुर्चीला लावून त्यांची फजिती करण्याचा मनात विचार आणणे या सर्व बाबी लेखिकेने चित्रमय पद्धतीने जीवंत तितक्याच विनोदी व खेळकर पद्धतीने उभ्या केल्या आहेत. लेखिकेचा चिंचा, आंबे भरपूर खाल्यानंतर गळा खराब होतो. आपला आवाज कायमचा बंद होईल की काय याची भीती तिला वाटते. शाळेतील मुले सावरीच्या झाडाचा काटा काढून तो गंतुरीच्या पिकलेल्या पानामध्ये एकत्र करून त्याचा विडा बनवून खातात. आंब्याची कोवळी पाने ही खातात. कापडी चेंडूच्या माध्यमातून लिंगोरसेचा खेळ खेळतात. कधीकधी खो-खो, लंगडी, हत्तीची सोंड शाळेच्या मधल्या सुट्टीत हे खेळ रंगतात. आबयच्या बिया घासून त्याचे चटके देण्याचा खेळही रंगतो. कधी कधी तरवटेतील बिया काढून त्यांचा जादूचा खेळ रंगतो. कधी विहिरीतल्या पाण्याने घरातील जागा शेणाने सरवण्याचाही उद्योग चालतो. या सर्व शाळेच्या मधल्या सुट्टीतल्या गोष्टी लेखिकाला प्रचंड आनंद देतात म्हणूनच लेखिका म्हणते, ‘कोणी खेळ खेळून, त कोणी चिचा, टेंबुरना खाऊन आनंद गवसत… त कोणी वडाचे पारंब्यांचं हिंदोळं घेऊन, त कोणी येडायपणा करूनही निसताच निवळ आनंद मिळवत… आजही साळंचे मदले सुट्टीतल्या गोड आठवणी मी मनापासून जपून ठवल्याय.. (पृष्ठ क्र.८७) एकंदरीत शाळेच्या मधल्या सुट्टीत लेखिकेला गवसलेला आनंद अत्यंत प्रामाणिकपणे, जीवंतपणे खेळकर भाषाशैलीच्या माध्यमातून रेखाटला आहे.
(५)
‘खेळ बासनांचा’ हा ललित लेख म्हणजे ‘आदिवासी भागातील बाल विश्वाच्या खेळण्यातून बाल मनाला गवसलेला स्वर्गीय आनंदाचा जिता-जागता सोन्याचा हंडाच होय’. बालपणी लहान मुलांचे खेळण्याशी आपोआपच नाते जडते. लहान मुले खेळणी खेळताना रममाण होतात, वास्तव आयुष्याला विसरतात. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील बालपणाचा खेळ म्हणजे आयुष्यातील विसरता येणारे पान असते. या खेळात कधी आई, कधी मोठी बहीण, कधी शाळेतील मास्तरीन म्हणून भूमिका करताना लेखिकेला खूपच मज्जा वाटते. करंजाळीच्या बाजारात जाऊन महागीची खेळणी बाहुल्या विकत घेण्याइतकी ऐपत नसल्याने लेखिका महागडी खेळणी विकत घेऊ शकत नाही. आदिवासी भागातील माणसे थोडेफार घरातील धान्य विकून जत्रेच्या वेळी बाजारातून माणसे थोडेफार भाज्या व इतर आवश्यक वस्तू विकत घ्यायची तर कधी लहान पोरांसाठी थोडी फार प्लास्टिकची खेळणी विकत घ्यायची. लेखिकेला मात्र निळ्या डोळ्याची बाहुली घ्यावीशी वाटते. ती त्या बाहुलीकडे आकर्षित होते परंतु वडिलांनी आपल्याला ती बाहुली विकत घेऊन द्यावी, अशी तिच्या मनात तीव्र इच्छा निर्माण होते. परंतु ही बाहुली आपल्याला घेता येणार नाही, याची जाणीव देखील असते. परिस्थितीमुळे कदाचित तशी सांगण्याची हिंमत देखील होत नाही. भांडी, बाहुली खेळायला लेखिकेला प्रचंड आवडते पण ते विकत घेऊन द्यावेत असेही कधीही तिने आपल्या वडिलांना सांगितले नाही. लेखिकेचा बासनांचा (भांड्यांचा) खेळ कधी झाडाखाली, कधी अंगणात किंवा सावली असलेल्या मोकळ्या जागेत रंगायचा. विहिरीच्या अवतीभवती साचलेली चिकन माती आणून त्यापासून चुली, भांडे तसेच तवा, ताट अशा अनेक वस्तू तयार करून त्या कडक उन्हात वाळवल्या जायच्या. हीच मातीची भांडी खेळायला वापरली जायची. लेखिका बालपणी बाजारातली भांडी, खेळणे विकत घेऊन खेळण्याची कधीही हाऊस पूर्ण करू शकली नाही परंतु वाटेल त्या वस्तूचे तुकडे, तुटलेल्या कौलांचे तुकडे, प्लास्टिकच्या डब्यांची रिकामी झाकणे अशी मिळेल त्या वस्तू खेळणे म्हणून वापरण्याइतकी असलेली लेखिकेच्या बालमनाला समजूतदारपणाची झालर साहजिकच मनाला स्पर्श करून जाते. लेखिकेची आई भाकरी करायला कशी बसते? भाकरी कशी थापते? ती संवाद कशी साधते? याचे हुबेहूब वर्णन व नक्कल या खेळाच्या माध्यमातून अतिशय सुरसपणे रेखाटली आहे. दोन स्त्रिया एकमेकांमध्ये जसे संवाद साधतात, तशाच बासनांच्या खेळामधल्या मैत्रिणी जणू काही मोठ्या समजदार स्त्रियांप्रमाणे गोड संवाद साधतात. उदाहरणार्थ, ‘होवं, बरा गडे आठव करून देलास… मालही बजारं इयाचा हाये… चला आपण समंद्या हारीनीच बजारं जाव….’ मजे घरात आईस जशी शेजारणीशी चावळं, तस्या मैतरनी खेळात चावळत…’ (पृष्ठ क्र.९३) भाजी तयार करणे, तव्यावर भाकरी भाजणे, स्वयंपाक वाढणे, कापडी पिशवी घेऊन बाजारला जाणे या सगळ्या वास्तव जीवनातील नकला बासनांच्या खेळात हुबेहूब जीवंतपणे उभ्या केल्या आहेत. खेळ खेळताना कधीकधी दुकानातून आणलेली बिस्किटे, भत्ता, गोडीशेव, खोबरा गोळी या सर्वांचे बारीक समान तुकडे करून एकमेकांमध्ये वाटून खातात. बालविश्वाच्या मनातील घट्ट मैत्रीचे, जिव्हाळ्याचे प्रतीक ललित लेखाद्वारे स्पष्ट करून सांगितले आहे. लेखिका बालपणी देखील डोळ्यावर चष्मा लावून, हातात छडी घेऊन शाळा मास्तरीन बनण्याची नक्कल करते. तिला यात आनंदही मिळतो. ती मुलांना प्रश्न विचारते, पाढे विचारते, कविता म्हणून दाखवते, गाणे म्हणून दाखवते. परंतु रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या माणसाने किंवा गुरुजींनी हा खेळ पाहिल्यावर लाजून ती घरात पळते. बालमनाचा रुसवा, फुगवा हाही जास्त काळ टिकत नाही. समजूतदारपणा, जिव्हाळा, एकमेकांबद्दलचे अतीव प्रेम या भासनांच्या खेळात दडलेले दिसते. बाहुल्यांच्या लग्नाचा खेळ, लग्नाची चाललेली घाई, चिंध्यांपासून बनवलेला नवरा व नवरी, त्यांना एरंडाच्या पानाच्या देठांनी बनवलेल्या मुंडावळ्या, गळ्यातील दाग-दागिने, नवरा नवरीचे लागलेले लग्न, लग्नातील आनंद, लग्नाचे वेळी म्हटली जाणारी ‘कावळा पिपाणी वाजवतो, मामा मामीला नाचवतो’ किंवा ‘आडवे दांडालं गो पोरी नवरा कुणाचा येतो’ अशी अनेक बालगीते वाचकाला बालविश्वात गुंतवून टाकतात. आदिवासी भागातील बालविश्वाकडून साकारलेल्या या सुंदर कलाकृतीचा, कारागिरीचा व नाट्यमय खेळाचा उत्तम नमुना म्हणून ‘खेळ बासनांचा’ हा सुंदररित्या प्रकट झाला आहे. आज बाजारातून अनेक महागडी खेळणी घेण्याइतकी लोकांची ऐपत झाली आहे. त्या काळात आजच्यासारखी गॅस, शेगडी, मिक्सर, फ्रिज अशा वस्तू मिळत नव्हत्या. लेखिकेला निळ्या डोळ्याच्या बाहुलीबद्दल अत्यंत प्रेम आहे. गोष्टीतल्या सिंड्रेलावाणी झगा घातलेली, हातात पर्स असलेली, कुरुळे केस असलेली, वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस परिधान केलेली ही बाहुली तिच्या नजरेसमोर सतत उभी राहते. महागडी खेळणी घेणे पैसे नसल्याने जमत नाही म्हणून त्या काळात स्वतः मातीची भांडी तयार करून किंवा नारळाची कवटी, कौलांची तुकडे, चिंध्या, फाटलेल्या साड्या यांचा वापर करून खेळासाठी योग्य व साजेशी खेळणी आदिवासी मुले-मुली बनवायची. परंतु आज मात्र गावाकडे मातीची भांडी तयार करून खेळणारी मुले दिसत नाहीत. शाळेच्या, खाजगी क्लासच्या ओझ्याखाली व आई-बापांच्या अपेक्षांखाली आजचे बालपण दबलेले, भरलेले दिसते. स्मार्ट होण्याच्या काळात घराबाहेर मोकळे राहून खेळ खेळावेत असे वातावरण नाही. घरात टीव्ही, मोबाईलवर कार्टून पाहण्यात, गेम खेळण्यात बालपण हरवले आहे. नवे बदल होत आहेत तसेच मुलांच्या खेळातही बदल होत आहेत. म्हणूनच लेखिका म्हणते, ‘त्येच्यानी आत्ताचे पोस्यांचा निरागस, आवखळ, मनमोकळा जगनां आन त्येंच खेळही बाहंदून टाकल्यावानीच झालंय… फ्लॅटमदले चार भितीत कोंडल्यावानीच…!’ (पृ.क्र.१०२) लेखिकेला आजच्या परिस्थितीत तसले निखळ भरभरून आनंद देणारे खेळ हरवून गेल्याचे आढळते. लेखिकेला बालपणामध्ये विविध बासनांच्या खेळात सापडलेला खराखुरा आनंद तिच्या मनाला स्वर्गीय सुख देऊन जातो. म्हणून बालपण एखाद्या अर्थाने लेखिकेच्या दृष्टीने गोड साखरेचा खडाच आहे, असे तिला वाटते.
(६)
‘लाहानपण इचतूय मी’ या ललित लेखामध्ये लहानपणीच्या अनेक आठवणी लेखिकेने आपल्या बोलीभाषाद्वारे जीवंत केल्या आहेत. ‘लाहानपण मजे, निसता आनंदाचा झिरा…. सारकां खळाळत वाहात रहावा आसा. त्येचा पाणी कित्यिकही पेला तरी मन कदीच भरत नाय आन हा आनंदाचा झिरा कदीच आटतही नाय… तस्याच माजेही काळ्जातून सारकं खळाळत रहतंय लहानपणातलं आठव..’ (पृष्ठ क्र.१०३) लेखिकेच्या बालपणातल्या अनेक आठवणी लेखातून ताज्या झाल्या आहेत. पावसाळ्यात वाऱ्याच्या झुळकेबरोबर जमिनीवर डोलणारी बारीकसारीक फुलझाडे, गवत यांच्या झुळकेबरोबर डोलणे, फुलपाखरांच्या पंखावरील नक्षी, उडणारे फुलपाखरे पकडणे ते पकडण्यासाठी त्याच्या मागे धावणे या गोष्टी देखील लेखिकेला आनंद देऊन जातात. बालपणी लेखिका घराच्या अंगणात वाळत टाकलेल्या भुईमुंगाच्या शेंगांची राखण करताना घोंगड्याच्या सावलीत किंवा झाडाचा सावलीत बसून अनेक खेळ खेळतात. फुटलेल्या कौलांचे तुकडे, नारळाच्या करवंट्या यांची भांडी बनवून तिथे स्वयंपाक बनविण्याचा खेळ सुरू व्हायचा. त्यानंतर अंगणात शेंगांचे दाणे टिपायला आलेल्या चिमण्या, त्यांना पकडण्यासाठी केल्या जाणाऱ्या युक्त्या परंतु त्यांना हुलकावणी देऊन दाणे टिपून चटकन पळून जाणाऱ्या चिमण्या माणसापेक्षा कितीतरी पटीने हुशार वाटतात म्हणूनच लेखिका म्हणते, ‘आमचे परीस चिमण्या काय कमी नवत्या…. त्येंचे होडूकसे डोकीतला होडूसा मेंदू… कित्यिकसा काम करत होवां…? पण चिमण्या भलत्यात चताऱ्या होत्या तं..! (पृष्ठ क्र.१०६-१०७) संध्याकाळच्या वेळेला लेखिकेच्या अंगणात गल्लीतली सगळी मुले खेळ खेळायला जमा व्हायचे. तिथे हत्तीची सोंड, येलधऱ्या, कबड्डी, डोंगर का पाणी, मामाचा पत्रा हरवला असे कितीतरी आदिवासी मुलांचे खेळ रंगतात. पावसाळ्यात हे अंगणात रंगणारे खेळ कमी व्हायचे त्यानंतर ऋतुमानानुसार वेगवेगळे खेळ आदिवासी भागातील मुले शोधून काढायची. यात भवरे पकडणे ते बांधून ठेवणे, भोवरा पकडला की भवऱ्याची मुलांच्या हातातून सुटण्यासाठी चाललेली धडपड पाहून लेखिकेच्या मनात चलबिचल सुरू होते, तिला ते धडपडणे सहन होत नाही. अत्यंत संवेदनशील मनाची लेखिका भवऱ्याचे धडपडणे सहन करू शकत नाही. लेखिकेला पशुपक्षी, प्राणी, झाडे, वेली यांचे मन समजून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. म्हणूनच सर्वच निवेदन त्यांच्या लेखणीद्वारे अत्यंत जीवंतपणे उतरले आहे. त्यानंतर गवतफुलांवर फिरणारा ‘चाटू’ हा एक रुबाबदार किड्याप्रमाणे दिसणारा कीटक पकडून त्याच्या शेपटीला मुले दोरी बांधायची. त्याचे पंख लेखिकेला परीच्या पंखासारखे भासतात. ‘चाटूचं पखही येकदम भारीच… गोठीची पुस्कदा वाचा ताहा त्याहात परीचा चितरंही रह. त्ये परिचे पाठीलं हाताचे मेरलच दोन फुलपाखरावानी पख रहत…त त्ये चाटूंच पखही मालं परिचे पाठीवरले पखवानीच वाटतं’…(पृष्ठ क्र.११०) अशाप्रकारे त्या कीटकाचे सौंदर्य रेखाटण्याची भारदस्त शैली लेखिकेच्या लेखणीत आहे. आदिवासी भागातील पोरांची डबक्याचे झाकणे, निरूपयोगी चिंध्या, उकिरड्यावरच्या वस्तू, चिंचोके, बेहडा यापासून खेळण्याच्या वस्तू बनवितात. त्याला महागड्या पैशांची गरज लागत नाही. हव्या त्या परिस्थितीत हव्या त्या वस्तूचे खेळणे बनवण्याची कला आदिवासी बालमनामध्ये ठासून भरलेली आहे. अबयच्या बिया त्या घासून दुसऱ्याच्या हाताला चटका देणे, काचकुहरीच्या लागण्याने अंगाला सुटणारी खाज त्याचा घेतलेला अनुभव, खोड्या काढण्यासाठी कुहऱ्याचा केलेला वापर त्यातून काढलेल्या खोड्यांपासून मिळणारा आनंद लेखिकेने सविस्तर रेखाटला आहे. गावाकडील गल्लीत सागर गोटे, विटी-दांडू,चल्लस, आया भोया, कोयपाटी, फुगड्यांचा खेळ अशा अनेक खेळांची माहिती या निमित्ताने करून दिली आहे. गावाकडील एखाद्याच्या घरातील टीव्हीवर पाहिली जाणारी रामायण मालिका, मालिका पाहून रामाच्या बाणाचे लागलेले वेड, बांबूच्या कामठीपासून बनवलेले बांध, त्याचा बनवलेला धनुष्य व खेळात केलेला वापर तसेच महाभारत, चंद्रकांता, मोगली या मालिकांचे एकेकाळी आदिवासी भागातील मुलांना लागलेले वेड जीवंतपणे रेखाटले आहे. त्याकाळात शक्तिमान मालिका तर लहान मुलांची आवडती मालिका बनली होती. लहान मुले गोल गोल फिरून स्वतःच्या पायाला दुखापतही करून घ्यायची तरी त्यांच्या खेळाचा आनंद कधीही कमी झाला नाही. लहानपणीच्या अशा अनेक छोटे मोठे खेळ खेळतात. लहान पण काळाच्या पडद्याआड कधी गेले तेही समजले नाही. वाढत्या वयाबरोबर लहानपणही मागे सरून गेले ते परतून न येण्यासाठी. म्हणूनच लेखिका म्हणते, ‘लाहानपणातल्या आठवणी परत्येकाचेच काळजात घर करून राहत्याय… कायमच्याच.. माजेही काळजात लाहानपणातल्या ईखरेल आठवणी मी परत परत इचत रहतुयं’.. आठवणीचे रूपानी… मग लांबधर निगून जायेल लाहानपणाल मी गवसत रहतुयं… परत माज्यातलीच भूलून जायेल आवखळ पोरगी गवसायं..! (पृष्ठ क्र.११७) एकंदरीत बालवयातील विविध आदिवासी भागातील खेळांच्या रूपाने लेखिकेला मिळणारा निखळ आनंद आणि त्या खेळांचे केलेले सविस्तर वर्णन वाचकाला वास्तवापासून बालपणाकडे घेऊन जाते.
(७)
‘जाता’ या ललित लेखांमध्ये लेखिकेच्या घरी असलेल्या जात्यावर दळणाऱ्या बायांचे मनोविश्लेषण आले असून त्यांची सुखदुःख जात्यातील धान्याप्रमाणे भरडले जातात.बाया दळता दळता देहभान हरपून जातात आणि आपले दुःख जात्यात भरडून त्याचे जणू काही पीठ करून टाकतात. मनातले दुःख दडवून, ‘घाम आला तो पुसावा’ असे भासवून डोळ्यातील अश्रू सहजपणे फडकीच्या पदराला पुसून परत हसत राहतात जणूकाही घडून न घडल्यासारख्या. अशा आदिवासी भागातील बायांचे सुख, दुःख व संकटे पार करून जगण्याची चिवटवृत्ती या लेखात लेखिकेने अत्यंत संवेदनशीलवृत्तीने, हळुवारपणे नाजूक भाषाशैलीच्या माध्यमातून रेखाटली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात,
*’अरे घरोटा घरोटा*
*जात्यातून पडे पिठी*
*तसं तसं गाणं*
*येतं माझ्या व्होटी’*

‘जाते’ हे आदिवासी ग्रामीण भागातील स्त्रीच्या दैनंदिन जीवनाचा भाग होते. जात्यावरल्या ओव्या, जात्यावरची गाणी, संत जनाबाईची अभंगवाणी या जात्याच्या संगतीनेच फुलली, बहरली आणि सुगंधित झाली. कदाचित ‘जाते’ हे स्त्रीला आपल्या मनातील भावभावना, आपले दुःख व्यक्त करण्याचे प्राण सखा म्हणून प्रभावी माध्यमच सापडले आहे. लेखिका बालवयापासून अनेक आवाज ऐकत आली आहे. सकाळी उठल्यावर पक्षांचा येणारा आवाज, दही घुसळतानाचा आवाज, वाऱ्याच्या झुळकेने हलणाऱ्या पानांचा सळसळ आवाज, कोकिळेचा कुहू कुहू आवाज, गोठ्यातल्या गाईचे दूध काढतानाचा येणारा आवाज, उदास पारव्याचा घु घु आवाज, सुतार पक्षाचा झाडावर ढोली कोरतानाचा आवाज, गोठ्यातील वासरांचा हंबरण्याचा आवाज तर कधी सकाळी सकाळी गावात फिरणाऱ्या वासुदेवाच्या हातातील टाळ आणि चिपळ्यांचा आवाज, विहिरीवर जमणाऱ्या स्त्रिया, मुले-मुली त्यांच्या हसण्याचा, खिदळण्याचा निखळ आनंद देणारा आवाज, चिमण्यांचा चिवचिवाट, कलकलाट करणारे चिंचेवरील बगळे या सर्व आवाजातून लेखिकेच्या मनात कालवाकालव होते. आज हे सर्व आवाज ऐकू येईनासे झाले आहेत, याची खंत देखील लेखिकेला वाटते.या लेखांमध्ये ‘आमचे गावात जरी गिरण होती, तरीपण उडीद, कुळीद, तुरीची डाळ भरडाये जात्याचाच वापर होयेचा. तसाच उडदाचा बेसन भुज्या, कुळदाचा बेसन आसा दळायही समंद्याच आवा जात्याचा वापर करत… तसाच मिरची कुटायं उखळाचाच वापर होयेचा…’ (पृष्ठ क्र.१२०) आदिवासी भागांमध्ये आजच्यासारख्या गिरण्या किंवा साधने नसल्यामुळे स्त्रीया दळण दळण्यासाठी जात्याचा वापर करायच्या. या लेखात रानातल्या रानभाज्यांचा म्हणजेच सावरीची फुला, भोकरीची भाजी, कवळीची भाजी, भोकरा, शेवळा, देहगडी, उळूसवेल, मोहट्या, वाघाटा, तेरा,वाथरटा, चाईचा मोहोर, चिकन भेंडी, आळिंब, भुईफोड, लोती, कारले, दोडके, गिलके, भोपळा, डोंगर, चक्की, आळूची पाने, कांदवरं, कोची, माटाची भाजी, मोहरीची भाजी, खुरासणीच्या पानांची भाजी अशा अनेक कंदमुळे, रानभाज्या यांचा सविस्तर परिचय वाचकाला करून दिला आहे. लेखिका आणि तिची बहीण यांना जात्यावर दळणाऱ्या बाया आणि त्यांचे बोलणे ऐकायला खूप आवडते. ‘जहा कधी हवा आमचे घरी दळायला तहान दळता दळता आई आणि मोठी आई सांगा एकुदे विषयावर त्याचा वळत राहत मग त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकायला मालक आणि देवयानी लय आवडत (पृष्ठ क्र.१२०) लेखिका जात्यावर दळण कशा दळतात? जात्याचा आवाज, जातामध्ये धान्य कसे टाकतात? जात्यातून पीठ कसे पडते? दळताना स्त्रियांच्या चेहऱ्यावर हावभाव कसे बदलतात? याकडे एकटक बघत राहतात. लेखिकेची निरीक्षणशक्ती अतिशय सूक्ष्म असून बारीक सारीक गोष्टी अत्यंत तपशीलवारपणे टिपल्या आहेत. जात्यावर दळायला बसताना निघणारा घाम, घामाच्या वाहणाऱ्या धारा, दळण्यासाठी दोन्ही हातांचा केलेला वापर, जात्याच्या मध्यभागी खोलगट भागात टाकले जाणारे धान्य इतरत्र कसे सांडले जात नाही? हा लेखिकेला नेहमीच पडणारा प्रश्न आहे. दळताना भान हरपून जाणाऱ्या बाया आपल्याच भावविश्वात गुंग होऊन जातात. दळायला आलेल्या बायांशी लेखिकेने संवाद साधताना अनेक गूढ म्हणजेच कोडे लोकसाहित्याचा महत्त्वाचा भाग म्हणून कोड्याचा अर्थ उत्तरासह उलगडून दाखवला आहे.उदाहरणार्थ ‘हरण पळ, दूध गळ’-जाता, ‘मी जातू रागा आणि तू माजे मागा’-सावली, ‘आवडासा गडू, डोळ्यात आणतो रडू’-कांदा, ‘इकडून डोंगर तिकडून डोंगर मदीच लाल्या उंबर’- विस्तव, ‘तंग तंग तंगला, पाण्यात बंगला, रातभर जागला पण हाती नाय लागला’- उंबराचे फुल, ‘हात नाय पाय तरी बजार जाय’- पिशवी, ‘ढवळी कोंबडी आली का काळी कोंबडी पळ’- दिवस रात’, ‘होडी होडीशी दोरी पण भुई कोरी’- गांडूळ, ‘ताटभर पैसं मोजात नाय’- आभाळातल्या चांदण्या अशा बऱ्याच गूढ कोड्यांचा उल्लेख आला असून त्याची बरीच उत्तरे लेखिका स्वतः देते तर कधी जात्यावर दळणारी बाई देते. दळण दळताना स्त्रीच्या गळ्यातील हिंदोळे घेणारे मंगळसूत्र लेखिकेला गुंतवून ठेवते. ‘त जाहा बाई जात्यावर दळायं बस, ताहा ती ज्ये दिशेनी जातां गर्र गर्र आवाज करत फिरवं, त्येच बाजूनी तिच्ये गळ्यातला मंगळसूतरंही फिरं.. जसा काय जात्यासंगा मंगळसूतरंही हिंदोळा घियेचा…. जात्यावर कनच्याही आवां दळत, ताहा परत्येकीची आसीच गत होयेची… (पृष्ठ क्र.१२६) आदिवासी ग्रामीण भागातल्या स्त्रिया सांजेपुरताच दळण दळतात. कोरडवाहू शेती असल्याने बऱ्याच लोकांमध्ये दारिद्र्याचे प्रमाणही दिसते. पोटापुरता शिधा व धान्य प्रत्येकाच्या घरामध्ये आढळते. किरकोळ गरजा भागवण्यापुरता काही वस्तू खरेदी कराव्या लागतात. आदिवासी भागातील भयाण दारिद्र्यवस्थेचे चित्रण देखील केले आहे. जात्यावर दळणाऱ्या बाया दळता दळता, बोलता बोलता मुक्या होऊन जायच्या.त्यांना भान नसायचे. दळताना वेगळ्या भावविश्वात त्या हरवून जायच्या यांचे वर्णन करताना लेखिका म्हणते, ‘आवा दळता दळता आबग्यात काहा मुकाटेच होत होव्या…? काहा त्या आस्या भानावर नसल्यावानी दळत्याय…? उमजत त काही नवता. पण, येखुदे येळस त्येंनी उरात दाबून ठवेल दुख त्या जात्यासंगा भरडून टाकत होव्या का…? का, जात्यासंगा दुख भरडून मन रिता करत होव्या? काही उमजायचा नायं’…(पृ.क्र.१२८) स्त्रियांच्या नाजूक, तरल भावावस्थेचे संवेदनशीलवृत्तीने चित्रण केले आहे. जात्यावर लग्नकार्याची हळद दळली जाते त्यावेळी गाणी म्हटली जातात. त्या गाण्यांचा सूर ही लेखिकेने ऐकले आहेत. नागलीचे पीठ, विविध धान्यांचे पीठ तसेच विविध प्रकारचे मसालेही या जात्यावर दळले जातात. जात्यावर दळलेल्या पिठाचे बनवलेले कालवण आणि गिरणीत दळलेल्या पिठाचे बनवलेले कालवण यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आज मोठ्या मोठ्या मॉलमध्ये पॅकिंग केलेले पीठ दिसते पण त्याला जात्यावर दळलेल्या भुज्याच्या पिठाची सर कधीच येणार नाही.आज ‘जाते’ ग्रामीण आदिवासी भागातून नष्ट झाले असून शेती, गावची माणसे, त्यांची जीवन जगण्याची पध्दत बदलत आहेत म्हणूनच लेखिका म्हणते, ‘गावाखलही आवांचा जात्याशी ज्या नातां होता, त्या आता दुरावत चाललायं… काहींचे घरी जाती असली, तरी त्येचा फारसा वापर होत नाय… तं काहींचे घराबाहेर मोकळे जागंत धूळ खात येकटीच बसल्यात जाती… पदरचा गतकाळ आठवत’…! (पृष्ठ क्र.१३२) अशा पद्धतीने लेखिकेने जात्याचे व जात्यावर दळणाऱ्या बायांचे तसेच जात्याशी लेखिकेच्या बालमनाशी जडलेले नाते अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीने लेखातून प्रकट केले आहे.
(८)
‘चाफा’ या ललित लेखांमध्ये पारिजातकाच्या फुलाप्रमाणे चाफ्याच्या झाडाच्या फुलांचे सुंदररित्या वर्णन केले आहे. गावातील मुले कधी, कधी पतंग आभाळात उडवतात परंतु दोरीपासून पतंग वेगळा झाल्यानंतर दुसऱ्याच्या तालावर नाचणारा पतंग मोकळा होतो आणि त्याला हवे तसे आकाशात उडता येते. कधीकधी लेखिका तत्वचिंतनात्मक भाष्य करताना दिसते. ‘येखूदा झाडाचा पिकेल पान भुईवर गळून पडं, ताहा जर का वारा सुटला तं पिकेल पान थेट भुईवर पडत नाय… तं वारा जनाहून नेईल तनाहून त्या पान भरकटत गरकं मारत जातंय मग वाऱ्याचा वेग कमी झाल्येवर त्या भुईवर पडतंय… तसाच तो पतांग भुईखल झोपावत गरकं घेत घेतच खाली येत होता’….(पृष्ठ क्र.१३५) पतंगाप्रमाणेच माणसाचे आयुष्य देखील बिनभरवशाचे, दुसऱ्याच्या तालावर नाचणारे अशाच पद्धतीचे आहे की काय? दोरी तोडून विहरणाऱ्या पतंगाच्याप्रमाणे माणसाला का जगता येत नाही? असा प्रश्न लेखिकेला पडतो. लेखिका चाफ्याच्या फुलांचे, झाडाचे सविस्तर व सूक्ष्मरित्या वर्णन करून सांगतात. वेड्या वाकड्या पसरलेल्या चाफ्याच्या फांद्या, सश्याच्या कानावाणी लांबलचक हिरवीगार पाने, पांढऱ्या पाकळ्यांच्या आतून रंग काम करावे तसेच आतून फिकट पिवळा असा चाफ्याच्या फुलाचा रंग, पाकळ्यांच्या काठांवर खारीच्या पाठीवर रेघा असाव्या तसा गुलाबी रंगाची रेष, राखाडी रंगाचे खोड अशा पद्धतीने सजलेला चाफा येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वागत करतो व लेखिकेच्या बालपणाच्या आठवणीचे एक पान सहज उलगडत जाते.चाफ्याच्या झाडाची पौराणिक गोष्टही या निमित्ताने लेखिका सांगायला विसरत नाही. दुसऱ्याच्या बागेत सजलेला चाफा, त्याची फुले मात्र लेखिकेच्या अंगणातच पडतात. त्यामुळे लेखिकेचे चाफ्याच्या झाडाशी एक आगळे वेगळे नाते तयार झाले आहे. लेखिकेच्या दिवसाची सुरुवातही चाफ्याच्या झाडापासूनच होते. चाफ्याच्या झाडावर चालणारा पशू-पक्ष्यांचा किलबिलाट, पहाटेची ऐकू येणारी गाणी, चाफ्याच्या कोवळ्या पानांच्या आडून झळकणारी सूर्याची कोवळी किरणे आणि चाफ्याच्या झाडांमध्ये लेखिकेला मोठ्या आईचे दिसणारे रूप मन भावविभोर करून जाते. म्हणूनच लेखिका म्हणते, ‘चाफ्याचे हिरवेकाच सळसळते पानांमदून मालं जाणवत रहतयं तिचा मायेचा हात… नकळत मग चाफ्याचे फुलाचे सुगंदातून तिची आठवण उजानच जाणवाये लागत्येय’…(पृष्ठ क्र.१३८) कवी कुसुमाग्रज म्हणतात,
*’चाफ्याच्या रे फुला*
*किती हा अबोला,*
*पाकळ्यांच्या आत आत*
*किती गंध अनावर झाला’*
चाफ्याची फुले आदिवासी भागात स्त्रिया, मुली केसात माळत नाहीत कारण ती उत्तेजक असतात.विशेषतः ही फुले माळल्याने केस गळतात असा समज आहे. लेखिकेची आई चाफ्याच्या पानातून निघणारा चीक कपाळावरील ठसठशीत कुंकू लावण्यासाठी करते. लेखिका चाफ्याच्या फुलाकडे बघणाऱ्या मोठया आईचे वर्णन करताना म्हणते, ‘कदी कदी मोठीआई पण चाफ्याचा येखूदा फूल इचून नाकानी त्येचा सुवास हुंग. तं कदी येखुदा फूल उगाच हातात घेऊन निरखं. ताहा ती मालं येखुदे बांडगे पोरगीवानीच वाटं (पृष्ठ क्र.१४०) अशाप्रकारे स्त्रीच्या हातातील चाफ्याचे फूल पाहून लेखिकेने केलेले वर्णन अनेक गोड आठवणी उजागर करतात. संध्याकाळी, सकाळी चाफ्यावर चिमण्यांचा चिवचिवट चालतो म्हणून अंगणाच्या कोपऱ्यावर असलेला चाफा लेखिकेला चिमण्यांचा गावच भासतो. चाफ्यावर बसणाऱ्या चिमण्या, दाणे टिपणाऱ्या चिमण्या परत उडून जाऊन फांदीवर बसणाऱ्या चिमण्यांची कसरत अतिशय सूक्ष्मपणे चितारली आहे. या लेखामध्ये कोंबड्यांनी पंखात माती भरून ओट्यावर येऊन उधळणे असे झाल्यास पाहुणे येण्याचा संकेत देखील या लेखात येतो. नेमकं त्याच दिवशी पाहुणे येतात हे पाहून हा संकेत की योगायोग आहे असाही प्रश्न लेखिकेला पडतो.चाफ्याची फुले, त्याचा सुगंध लेखिकेला प्रचंड आवडत असला तरी त्याची फुले वेणीत माळण्याचा योग मात्र केस गळतील या समज- गैरसमजामुळे आलेला दिसत नाही. सणासुदीला चाफ्याच्या फुलांच्या माळा बनविणे, देवासाठी त्याची फुले वाहणे, गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीभोवती त्याची फुले घेऊन त्याचा हार बनविण्यासाठी चाफ्याच्या फुलांचा वापर केला जायचा परंतु आज मात्र बरीच वर्ष होऊनही आज ‘चाफा’ लेखिकेच्या घराच्या कोपऱ्यावर जसाच्या तसा म्हाताऱ्यासारखा उभा आहे. खांद्या छाटल्यामुळे तो उदास वाटतो. त्याने लेखिकेचे बालपण, अवखळपणा उघड्या डोळ्याने पाहिला आहे. त्याची सळसळणारी पाने व लहान मुलींचे खेळ पाहून तो आनंदाने मोहरायचा. कौतुकाने लहान मुलींकडे बघत राहायचा जणू काही लहान मुलींच्या खेळासोबत तोही खिदळायचा, हसायचा तेव्हा तो टवटवीत दिसायचा.आता फुलझाडे, फळझाडे पूर्वीसारखी राहिली नाही. फक्त गावातील तो एकमेव चाफा उरलाय पण पूर्वीसारखे तेज त्या झाडावर दिसत नाही याची खंत व दुःखही लेखिकेला वाटते. कदाचित अंगाखांद्यावर खेळणाऱ्या चिमण्या अर्थातच मुली आता त्याच्यापासून दूर गेल्यात यामुळे तो उदास झाला असावा. चाफ्याच्या झाडाखाली पूर्वीसारखे कोणी फिरकत नाही. गाव बदलला, माणसांमध्ये दरी निर्माण झाली. कदाचित बदलत्या दिवसाची सल चाफ्याच्या झाडाला ही टोचत असावी म्हणूनच लेखिका लेखाच्या शेवटी म्हणते, ‘माहेरी गेल्येवर आंगणात बसल्येवर चाफ्यात आन माज्यातही आंतर वाहडेल हाये आसा मालं जाणवतंय. कारण आंगणातून मी त्येच्याखल पाहात उबी रहतुय… आन कुपाचे त्ये बाजूलं तो’…! (पृष्ठ क्र.१४५) अशारितीने ग्रामीण आदिवासी भागातील माणसांचे झाडे, निसर्गापासून दूर जाणे हे सहन होत नाही. झाड आणि लेखिका यांच्यातील दुरावल्या नात्याची सलही लेखाच्या शेवटी मनाला बोचत राहते.
(९)
‘उडणारी म्हतारी’ या आगळ्यावेगळ्या शेवटच्या लेखात लेखिकेने ग्रामीण भागातील रुईच्या वाळलेल्या दोड्यातून पांढऱ्या पुंजक्यासारखे भासणारी, हवेत उडणाऱ्या तंतुयुक्त बियांची करामत व गंमत सुंदररित्या उलगडून दाखवली आहे. या लेखात शहरी भागातले वातावरण लेखिकेला बालपणीच्या आदिवासी भागातील गावाकडे सहजपणे घेऊन जाते आणि परत गावाकडून लेखिकेचे मन शहरापर्यंत घडणाऱ्या बारीक-सारीक घटना, प्रसंगासहित उलगडत जाते. अचानक कुठून तरी पांढऱ्याशुभ्र केसावानी दिसणारी फूलझाडाची ‘बी’ घरात येते आणि तिला पकडायला कार्टून बघण्यात मग्न असलेली मुले धावतात, हे सर्व लेखिका कौतुकाने पहात राहते आणि सहज वाऱ्याच्या झुळकेसारखे तिचे मन गावाकडील बालविश्वात रममाण होते. लेखिकेची मुले पांढऱ्या म्हातारीला पकडून लेखिकेजवळ आणतात. लेखिका देखील त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघत त्यांच्या आनंदात सामील होते परंतु नाशिक सारख्या शहरात ही उडणारी म्हातारी म्हणजेच पांढरीशुभ्र तंतुयुक्त झाडाची बी कुठून आली? हा प्रश्न पडतो याचे उत्तर तिला तिच्या घराशेजारीच असलेल्या बंगल्याजवळ उभ्या असलेल्या रुईच्या झाडाला पाहून सापडते. या झाडाला वाळलेल्या दोड्यामधून अनेक बिया वाऱ्याच्या झुळक्याबरोबर उडत राहतात. पकडताना लेखिका आणि लेखिकेची मुले आनंदाने भारावून जातात. या पांढऱ्या, तंतुयुक्त बिया काटेसावरी आणि रुईच्या झाडावर येतात. रुईच्या झाडावर उमलणारी फुले मंडवळ्या तयार करण्यासाठी आदिवासी भागात वापरतात तसेच हळदीच्या दिवशी तेलवण या विधीसाठी देखील रुईच्या फुलांचा वापर केला जातो. लेखिका म्हणते, ‘शिमगा सरला, का रुईचे फुलातून करंजीवानी दिसणारी हिरवीकाच फळा तयार होयेची.. तसीच सावरीचे झाडाचे फुलातूनही फळा तयार होयेची… उनाळ्यापावत ती उनानी आन हावेनी आपोआप उकलाजायची. उकलून त्येचं दोन भाग होयेचं. मग त्याहातूनच म्हतारीचे धवळे केसावानी दिसत आस्या म्हताऱ्या निगत. या म्हताऱ्या मग नवा बी संगा घेऊन भुईतून परत उंगाये मगून वाऱ्यासंगा उडत उडत निगत’. (पृष्ठ क्र.१५०) झाडांवर बसणारी पाखरे झाडाची फळे खातात. त्या फळांबरोबर त्यातील बिया आजूबाजूच्या माळरानावर पसरवितात अशाप्रकारे अनेक ठिकाणी आजूबाजूच्या जंगलात फळझाडे, फुलझाडे व वृक्ष लागवडीत देखील अप्रत्यक्षरीत्या पक्षी देखील मदत करतात याचेही वर्णन या अनुषंगाने येते. म्हणून पक्षी निसर्ग संवर्धक आहेत असेच म्हणावे लागेल. मे महिन्यानंतर पावसाळा सुरू व्हायच्या वेळी येणारे वादळ, सुटणारा वारा आणि त्यासोबत पांढऱ्या तंतुयुक्त भिरभिरणाऱ्या बिया पकडायला आणि बघायला लेखिकेला खूप गंमत आणि आनंद वाटतो. या खेळामध्ये तंतुयुक्त बिया अर्थात म्हाताऱ्या पकडताना लेखिका देहभान विसरून जाते. म्हातारीच्या मागे पळत सुटते, तिला पकडण्याची मुलांमध्ये शर्यत लागते. या शर्यतीत अनेक जण ठेचाळून पडतात. तरीही परत डोळ्यातील अश्रू पुसून मुले धावत राहतात. कधी कधी या म्हाताऱ्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या देखील दिसतात. त्याचे वर्णन करताना लेखिका म्हणते, ‘कदी कदी रानात फाट्यांवर जाजन ताहा, नाय त माळात जाजन ताहा रानोमाळी रुई आन सावरी तसेच रानातले काही येलींच्या बऱ्याच म्हताऱ्या सडकचे मेरंलं निचित पडेल दिसत… मग मालं वाटं, ‘ह्या म्हताऱ्याही वाऱ्यासंगा उडून उडून भंगल्या होव्या का…? मगूनच तं त्या आस्या दमून भागून येखूदे जागं निसत्याच पडून रहत होव्या… जीवात जीव नसल्येवानी’… (पृष्ठ क्र.१५३) शाळेतील मधल्या सुट्टीत आंब्याच्या झाडाखाली बसून लेखिका आणि तिची मैत्रीण पुस्तक वाचत बसतात तेवढ्यात कुठून तरी उडणारी म्हातारी येते आणि सर्व मुले तिला पकडायला धावत सुटतात. शाळेची घंटा झाल्यावर मात्र त्यांना नाईलाजाने आनंदात विरजण पडल्यासारखे वाटते. या उडणाऱ्या म्हाताऱ्या दगडाखाली दाबून ठेवल्यावर त्याचे पैसे होतात म्हणून प्रत्येक मुले उडणाऱ्या म्हाताऱ्या पैसे मिळाव्यात या इच्छेने पकडून दगडाखाली दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु अशा अनेक गैरसमजामध्ये काहीही तथ्य नसल्याचे लेखिकेला कालांतराने लक्षात येते. कारण ऊन, ताण सहन करत घाम गाळून राबराब राबणारी माणसे उडणाऱ्या म्हाताऱ्या दगडाखाली ठेवल्यावर पैसे होत असतील तर कधीही गरीब झाले नसते. प्रत्येकजण श्रीमंत झाला असता. आदिवासी समाजातील लहान मुलांचे अथवा माणसांचे असलेले समज-गैरसमज समजून घेऊन त्यामागील तथ्य शोधून यातील सत्य शोधण्याची प्रवृत्ती लेखिकेच्या लेखणीद्वारे प्रकर्षाने प्रकट झालेली जाणवते. लेखिकेने गाव सोडल्यानंतर बालपणाची खूण पुसट होत गेली. हळूहळू लेखिका आठवीनंतर शिक्षणासाठी वस्तीगृहात गेली. तिथे दोन पुस्तके वाचून ज्ञान मिळू लागली. बालपण हळूहळू सरून गेले. आपणास आयुष्यात काहीतरी करायचे आहे याची चाहूल लेखिकेला लागते. बारावीच्या शिक्षणानंतर नाशिकसारख्या ठिकाणी लेखिका शिक्षणासाठी जाते. उराशी मोठे ध्येय बाळगून नाशिक शहरातील के.टी.एच.एम सारख्या महाविद्यालयात उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेते. या केटीएचएम महाविद्यालयाला लेखिकेने दिलेली समुद्राची उपमा महाविद्यालयाच्या व्यापकतेची व विस्तारित स्वरूपाची साक्ष देते. ‘तालुक्याची साळा मजे, नदीवानी वाटली… तं माजे गावची माजी जि.प.साळा मजे, वाटला तो एक झिरा…!’ (पृष्ठ क्र.१५८) या वाक्यात लेखिकेने तालुक्याच्या शाळेला दिलेली नदीची उपमा व जिल्हा परिषद शाळेला दिलेली झऱ्याची उपमा खरोखरच समर्पक अशीच आहे. आपले गाव सोडून आदिवासी भागातील एक तरुणी नाशिकसारख्या शहरात जाते. त्यावेळेला तिला तिथे नोकरीतील स्पर्धेची जाणीव होते. एम.पी.एस.सी.करून मोठी परीक्षा पास व्हावी परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने आपण म्हातारी मागे जसे बालपणी धावत होतो तसेच या परीक्षेमागे आपण धावतो आहोत याचीही जाणीव लेखिकेला होत राहते. पांढऱ्या शुभ्र तंतुमय भासणाऱ्या म्हातारी मागे पळता पळता आपण स्पर्धेच्या युगात कसे धावत राहिलो याचा चलचित्रपट वाचतांना वाचकाच्या नजरेसमोरून पुढे सरकत जातो. लेखिकेने यानंतर बी.एड केले आणि त्या आधारावर ज्युनिअर कॉलेजला शिक्षिकेची नोकरी मिळविली परंतु लेखिकेचे एम.पी.एस.सी. परीक्षा पास होऊन अधिकारी पद मिळवावे ही अपेक्षा होती. लेखिकेने एम.पी.एस.सी.ची परीक्षा दिल्यानंतर शारीरिक चाचणीमध्ये स्पर्धेतून बाद झाली तरीही अपयशाने न हरून जातात अधिकारी व्हावे ही अपेक्षा मनाशी बाळगून पुन्हा नव्या उमेदीने लेखिका तयारीला लागते. २००६ ची एम.पी.एस.सी.ची मुख्य परीक्षा चार गुणांनी राहून जाते. २००९ ची मुख्य परीक्षा पास होऊन २०१० ला मुलाखतीला पात्र झाल्यानंतर अधिकारी पदाचे स्वप्न अगदी जवळ असताना अवघ्या दोन गुणांनी लेखिका काही वैयक्तिक कारणांमुळे स्वप्नांपासून दूर राहते आणि लेखिकेचे स्वप्न शेवटी स्वप्नच राहते. लेखिकेला आयुष्यामध्ये शिक्षण घेत असताना स्वप्न बघताना, नोकरी करताना स्पर्धेच्या युगात धावताना अनेक हेवेदावे, संकटे, जखमा, कोड कौतुक सहन करावे लागते त्याबरोबरच काहींचे टोमणेही सोसावे लागतात. उपहासाला, अपमानाला बळी पडावे लागते परंतु असे असूनही मन खंबीर करून डोळातील अश्रू पुसून लेखिका नव्या उमेदीने उभे राहते आणि शून्यातून स्वतःला सिद्ध करण्याची तीव्र महत्वाकांक्षा बाळगते. एका लहान मुलीने एक आयुष्यभराचा विद्यार्थी म्हणून वडिलांकडून मिळविलेल्या शिकवणुकीतून न थकता धावत राहण्याचा मार्ग निवडते. लेखिकेला आपण शिक्षणासाठी, स्वप्नासाठी, नोकरीसाठी की आयुष्यात स्वतःची जागा तयार करण्यासाठी, घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी की नातीगोती सांभाळण्यासाठी आयुष्य जगतोय हा एक पडलेला प्रश्न ‘आ’ वासून उभा असतो. आरशासमोर उभे राहिल्यानंतर लेखिकेला केसांमधून कुठेतरी एक पांढरा केस डोकावत असल्याचे दिसते आणि तिला बालवयात ज्या पांढऱ्या म्हातारीला पकडायला आपण धावायचं त्या उडणाऱ्या म्हातारीची आठवण होते. लेखिका म्हणते, ‘येकदा का वयाची बारा-तेरा साला संपत्याय, ताहा उडणारी म्हतारी लांब निगून जात्येय.. बरीच लांब लांब.. तिचा इसर कदी पडून जातोय, त्या उमजतही नाय’… पण परत्येक माणूस जसा सिकसन, काम, नवकरी, घर त्येंचेमागा धावतंय तसा वयही वाहडत जातयं.. लाहानपणी वाऱ्यासंगा हानाहून तनाहून निसतीच उडत म्हतारी हिंड, त्ये म्हतारीचे मागा धावता धावता जसी काय उडता, उडताच आपला लाहानपणही ती तिच्येमागाच घेऊन पळत्येय…’ (पृष्ठ क्र.१६०) वय जरी वाढले तरी डोक्यावरील पांढऱ्या केसांच्या रूपाने उडणारी म्हातारी आयुष्यभर शेवटपर्यंत सोबतच राहते आपले बालपण जीवंत ठेवण्यासाठी. लेखिकेने ‘उडणारी म्हतारी’ या लेखाच्याद्वारे ललित लेख संग्रहाच्या शेवटी लेखिका आपल्या आयुष्यातील यश- अपयशाच्या घटना, प्रसंगांच्या रेखाटनातून वाचकाला तसेच ती स्वत: अंतर्मुख झाल्याचे सहजपणे जाणवते.
बाल वयातील अनुभव मुक्तपणे उधळणारी लेखिका आपल्या सख्या मैत्रिणींशी हितगुज करावे आणि अनुभवांचा खजिना सहजपणे प्रामाणिकपणे त्यांच्यासमोर उलगडून दाखवावा अशी लेखिकेची लेखनशैली वाचकाला अंतर्मुख करते आणि आकर्षित करून घेते. हळव्या, कोवळ्या वयाच्या बालवयापासून पारिजातकाच्या फुले वेचण्याच्या छंदापासून सुरू झालेल्या लेखिकेच्या जीवन प्रवासापासून वाचक लेखिकेच्या उडणाऱ्या म्हातारी पर्यंतच्या प्रवासापर्यंत वाचत वाचत कसा येऊन पोहोचतो हे कळत देखील नाही. पारिजातकाची फुले वेचण्याची वेड असलेली, अंगणातल्या रातशाळेत वडिलांकडून भरभरून ज्ञान मिळविणारी, आकाशातील तारे, ग्रह, चंद्र, तारका, नक्षत्र यांचे निरीक्षण करून मिळालेल्या माहितीच्याद्वारे भरभरून आनंद वेचून घेणारी व गोवऱ्या वेचण्याच्या व्यसनातून आनंद प्राप्त करणारी, शाळेच्या मधल्या सुट्टीत रानपाखरावानी भिरभिरणारी, हव्या त्या झाडावर हिंदोळे घेऊन मनाजोगता निखळ आनंद शोधणारी, बासनांच्या खेळात रमणारी, लहानपण वेचून खरा आनंद मिळविणारी, जात्यावरच्या गूढ, गोष्टी गप्पांमध्ये रंगणारी, चाफ्याच्या फुलांशी खेळणारी त्याच्याशी हितगुज साधणारी, चाफ्याच्या फुलाच्या सुगंधाने मोहूनन जाणारी आणि शेवटी उडणाऱ्या म्हातारीला पकडण्याच्या नादात वास्तव जगाचा स्पर्श होऊन भानावर येणारी तसेच वाचकाला देखील बालविश्वातून हळुवारपणे वास्तव विश्वात आणून सोडणारी लेखिका लालित्यपूर्ण भाषेच्या माध्यमातून आपले जीवनानुभव रेखाटण्यात खऱ्या अर्थाने यशस्वी ठरली आहे. आदिवासी भागातील रानमेवा पळसाच्या पानाच्या डोम्यात वेचणारी आदिवासी कुमारीकेचे चित्र आणि अवतीभवती हिरवाकंच घनदाट पसरलेले जंगल, उंच आकाशाला भिडणारी डोंगररांग, बालपणात रानमेव्याच्या सहवासातून आकाशाला भिडलेल्या डोंगराप्रमाणे आपले ध्येयापर्यंत ताकदीने संघर्ष करत पोहोचणाऱ्या लेखिकेचे व्यक्तिमत्व ठळकपणे प्रतिबिंबित करणाऱ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ देखील अत्यंत वास्तव व समर्पक असेच ठरले आहे. लेखिकेला मराठी भाषेतून उपमा, अलंकार, प्रतिमा व प्रतीके उसनी घ्यावी लागत नाही तर अवतीभवती पसरलेल्या झाड, फुले, वृक्ष, पशु-पक्षी व निसर्गातूनच तिला अमाप शब्दसंपत्तीचा घडा सापडतो. आदिवासी भागातील प्रतिमा, प्रतिके, रूपके, अलंकारांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून ओघवत्या, साध्या, सोप्या, सरळ कोकणी बोलीच्या माध्यमातून लेखिकेच्या बालविश्वातील घटकांचे मनोहारी, वास्तव, निखळ आनंद देणारे लेखन केले आहे. आपल्या अस्सल आदिवासी कोकणा बोलीतून सुमधुर शैलीद्वारे अनुभव वाटणारी रानफुलांचे प्रचंड वेड असणाऱ्या ललित लेखिकेचे नाव खरे तर ‘गंगा’ ऐवजी ‘प्राजक्ता’ असेच अधिक शोभून दिसते. ‘लाहानपण इचतूय मी’ या ललित लेखसंग्रहाच्या लेखिका प्रा.सौ. गंगा गवळी-पवार यांच्या लेखणीने खरोखरच आदिवासी कोकणा बोलीच्या रूपाने आदिवासी साहित्यात रसाळ, गोड, माधुर्ययुक्त बोलीभाषेची गंगा अवतीर्ण झाली आहे, असेच म्हणावे लागेल. बालपणीचा अनोखा, निर्मळ, नितळ, सदोदित आनंद देणारे क्षण या ललित लेख संग्रहाच्या माध्यमातून लेखिकेने जीवंत केले आहेत. बालपणीच्या भावविश्वात रमून आपणही या आठवणींना पुन्हा जीवंत करून एक एक क्षण नव्याने जगाल, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रा.सौ.गंगा गवळी- पवार यांच्या या ‘लाहानपण इचतूय मी’ या पुस्तकाचे स्वागत करून त्यांच्या पुढील लेखन कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

धन्यवाद…!

डॉ.मधुचंद्र लक्ष्मण भुसारे

कवी, साहित्यिक व संशोधक

मोबा.९८३४३३२७७२

 

पुस्तकाचे नाव: ‘लाहानपण इचतूय मी’
लेखिका: प्रा.सौ. गंगा गवळी- पवार
प्रकाशक: वैशाली प्रकाशन, पुणे
प्रथम आवृत्ती: ०७ एप्रिल २०२४
पृष्ठ संख्या: १६०
किंमत :रुपये २५०/-

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या