[masterslider id="2"]
कविता काव्यरसास्वाद लेख विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हेल्थ

बालवाचकांच्या आनंदाला नवे पंख देणारा आगळावेगळा त्रैभाषिक बालकविता संग्रह – गरगर मोळ्या

यांनी लिहिलेले वंदना गांगुर्डे

बालवाचकांच्या आनंदाला नवे पंख देणारा आगळावेगळा त्रैभाषिक बालकविता संग्रह – गरगर मोळ्या

(कवी जनार्दन देवरे यांनी केलेलं रसग्रहण )

कवीवर्य रावसाहेब जाधव हे मराठी कवितेतलं मोठ नाव. ‘ ढेकूळ या त्यांच्या काव्यसंग्रहामुळे ते ढेकूळकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. पण का कुणास ठाऊक (शिक्षक म्हणून बालकांसोबतच जास्त वेळ जात असल्याने असेल कदाचित.) त्यांनाही बालकांसाठी कविता लिहाव्याशा वाटल्या आणि त्यांनी त्या आपल्या नेहमीच्या ग्रामीण भाषिक शब्दांचे हात धरुन लिहल्या.बालभावविश्वाशी तादात्म्य पावत ,बालजगत व त्याचा भवताल धूंडाळत,अनुभवत त्यांनी दोनेक वर्षात बालकविता लिहल्याही . संग्रह करणही निश्चित झालं.
पण पुन्हा का कुणास ठाऊक त्यांच्या डोक्यात आणखी एक नवीनच कल्पना आली हा काव्यसंग्रह आपण त्रैभाषिक केला तर… ? म्हणजे मराठी,हिंदी आणि इंग्रजीतून.आणि मग काय? झाली शोधाशोध सुरु …! आणि इंग्रजीसाठी भाषांतरकार म्हणून मिळाले चांदवड येथीलच शीतल अॕकडमीचे श्री.राहूलजी केदारे.त्यांनी आनंदाने हे गोड कार्य स्विकारलं,आणि समर्थपणे पेललही.पण पुढे हिंदी भाषांतरकार शोधून सापडेना.दोन-चार हिंदीचे प्राध्यापकही चाचपून पाहिले पण काही खेळ जमेना.यात दिडेक वर्ष गेल.त्यात पुन्हा महामारीने छळ मांडला .
पण लक्ष्यापासून विचलित होतील ते रावसाहेब कसले…? आणि हिंदी भाषांतरासाठी नाव पुढे आलं ते नगरच्या हिंदी अनुसंधान केंद्रातील अभ्यासक आणि साहित्यिक डाॕ.श्री.संजय बोरुडेंच. मग काय ? ठरलं .डाॕ.बोरूडेंनी त्यांच अत्यंत व्यस्त वेळापत्रक असतांनाही भाषांतर / भावानुवाद करण्याच काम आनंदाने स्विकारलं आणि चारेक महिन्यात निर्दोषपणे पूर्णत्वासही नेलं.
आणि आकारास आला मराठीतील पहिला एकाच कवीच्या बालकवितांचा त्रैभाषिक बालकविता संग्रह *’गरगर मोळ्या!’*
असा प्रयोग याआधी कोणी केल्याच माझ्या तरी वाचनात व ऐकण्यात नाही.काही शैक्षणिक संस्था वा शैक्षणिक प्रकाशनांनी संपादीत स्वरुपात असा प्रयोग केलेला असेलही कदाचित पण एकाच कवीच्या बालकवितांचा पहिलाच त्रैभाषिक काव्यसंग्रह असेल गरगर मोळ्या.
हे एवढं सांगण्याच/ मांडण्याच कारण म्हणजे इथपर्यंत मी या निर्मितीप्रक्रीयेचा एक साक्षीदार होतो,एक भाग होतो.
नंतर जेव्हा पुस्तक हातात आलं तेव्हा तर सारा निर्मितीचा शीणच निघून गेल्याचा फिल अनुभवला मी.देव हिरेंच बहारदार मुखपृष्ठ क्षणात मनाला भूरळ घालून गेल. दिशोत्तमा प्रकाशनच्या सौ.सुरेखा पाटील यांनी घेतलेले श्रम पानोपानी दिसू लागले.
कुलश्री प्रिंटर्सने केलेली सुबक छपाई आणि श्री.निलेशजी बेहरांची आशयचित्रे पहिल्या गिरकीलाच मन प्रसन्न करुन गेली.
आणि यातील बालकविता तर ‘एकसे बढकर एकच !’ विशेषतः या कवितात आलेले अस्सल ग्रामीण/शेतीमातीशी संबंधित शब्द थेट त्या स्थळी घेवून जातात आपल्याला.एक भन्नाट अनुभव बालक होत आपण अनुभवत जातो.भाषांतरकारांनीही भाषांतर करतांना अशी काही कमाल केलीय की ,त्याच नाव तेच.आता या चार ओळीच बघा ना.

मराठी
करीत दंगा झाडवेलींशी
आल्या पाऊस राफा
ठिसूळपणाला विसरून आपल्या
उगीच हसला चाफा /

हिंदी
झगडा करती पेड लताओसें
आई बरसात की धारा भी
खोखलापन भूलकर अपना
यूँ ही चंपा हसने लगी !

इंग्रजी
Quarreling with trees and creepers
Heavy drizzles came running
forgetting our delicacy
Laughing Champak silvery.

बरं ,आणखी कळस म्हणजे या काव्यसंग्रहाच इंग्रजीत केलेलं ‘Revolve around ourselves हे नाव किंवा हिंदीतलं ‘घुमते है गोलंकार हे नामकरण तर थेट त्या त्या भाषेच्या अंगणातच आपल्याला ‘गरगर मोळ्या’ करावयास भाग पाडून जणू बालआनंद सोहळ्यातच नेते आपल्याला.
चोच तिची वेची अळ्या,दगडफूल,चल गड्या मित्रा,आईची बोटे ,घर माझे मळ्यातले,उंदीर सारे गेले पळून,अंगणात मी नाचते गं,चिंचेचा आकडा आणि इतर सा-याच कविता मनास भूरळ घालतात.एकूणच एक नवी बालानुभूती देत हा काव्यसंग्रह आपल्याभोवती एक शब्दसमृध्द भावविश्व निर्माण करतो आणि आनंदाला नवे पंख देत वाचकास कल्पनाविश्वात अलगद घेऊन जातो.
या बालकाव्यसंग्रहातील कविता म्हणूनच पुन्हापुन्हा वाचायला हव्यात , अनुभवायल्या हव्यात.

– जनार्दन देवरे

मनमाड

▪️ गरगर मोळ्या
▪️कवी रावसाहेब जाधव
▪️प्रकाशक -दिशोत्तमा प्रकाशन,नाशिक
▪️मूल्य -१२०/-रु.
▪️मुखपृष्ठ – देव हिरे.

लेखकाबद्दल

वंदना गांगुर्डे

लेखका , कवयित्री

एक टिप्पणी द्या