प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून नवीन व कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण व अद्यावतीकरणासाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी १५ जून २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन या घटकांमध्ये नाशिक जिल्ह्याची कांदा या पिकासाठी निवड करण्यात आलेली आहे.तसेच या योजनेमध्ये सन २०२०-२१ ते सन २०२४-२५ या पाच वर्षांचा कालावधी करिता असंघटित क्षेत्रातील अन्नप्रक्रिया उद्योगांचा समावेश असून कार्यरत वैयक्तिक सुक्ष्म उद्योगांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे,शेतकरी उत्पादक संस्था,स्वयंसहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्थांच्या उत्पादनवाढीसाठी सर्वंकष मूल्यसाखळी विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.
पात्र लाभार्थ्यांसाठी या योजनेचा अर्ज कृषी विभागाच्या http://pmfme.mofpi.gov.in किंवा http://pmfme.mofpi.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी दिली आहे.
या योजने अंतर्गत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडित पात्र प्रकल्प किमतीच्या ३५ टक्क्यांपर्यंत व जास्तीत जास्त रुपये १० लाख मर्यादेत प्रती प्रकल्पासाठी अनुदान देण्यात येणार आहे.यामध्ये लाभार्थी हिस्सा १० टक्के असून पात्र लाभार्थ्याचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.तसेच सामायिक पायाभूत सुविधांसाठी यापूर्वी निर्धारित केलेली आर्थिक व्यवहाराची व अनुभवाची अट शिथिल करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलेले Annexure1 मधील नमूद प्रक्रिया प्रकल्प या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग,इंक्युबेशन सेंटर,पायाभूत सुविधा,ब्रँडिंग व विपणन क्षमता बांधणी व संशोधन प्रशिक्षण संस्थेबाबत प्रशिक्षण या बाबींचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना अटी व शर्ती यांची माहिती www.krushi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी दिली आहे.

