शिरूर येथे क्रॉपसॅप अंतर्गत मका पिकाची शेतीशाळा संपन्न
कृषि आयुक्तालयाकडुन १७ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीमध्ये खरीप पिके उत्पादन वाढ मोहीम राबविण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.त्याअनुषंगाने शिरूर येथे क्रॉपसॅप अंतर्गत मका पिकाची शेतीशाळा संपन्न झाली.
कृषी सहाय्यक रोमा आहेर यांनी प्रास्ताविक करून शेतीशाळेचे महत्त्व विशद केले .सदर शेतीशाळेसाठी कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ.राकेश सोनवणे उपस्थित होते.त्यांनी मका पिकावरील समस्या,किड व रोग , खत व्यवस्थापन,एकात्मिक किड नियंत्रण, इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. मका पिकावरील लष्करी अळीचे नियंत्रण करण्यासाठी मशागतीय उपायोजना,यांत्रिक नियंत्रण पद्धती,जैविक नियंत्रण पद्धती,रासायनिक नियंत्रण पद्धती यांची सविस्तर माहिती दिली.
लष्करी अळीचे नियंत्रण करण्यासाठी शेत तणमुक्त ठेवावे,एकरी दहा पक्ष थांबे लावण्यात यावेत,एकरी पाच कामगंध सापळे वापरण्यात यावे, तसेच संध्याकाळी सहा ते नऊ या कालावधीमध्ये प्रकाश सापळे लावण्यात यावे,न्यूमोरिया रिलाई या जैविक किडनाशकाची ३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करून जैविक किडनियंत्रण करण्याचे आवाहन डॉ. राकेश सोनवणे यांनी केले .तसेच सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित शेतकरी बांधवांना कांदा पिकाचे रोपवाटिका ते काढणी पश्चात तंत्रज्ञान व टोमॅटो वरील कीड – रोग नियंत्रण यांचीही सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर शेतकऱ्यांचा समस्या जाणून घेण्यात आल्या व त्यानुसार सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी अमित जाधव, रविंद्र पवार, नितिन जाधव, समाधान शिरसाठ , अभिमान जाधव , हरिभाऊ देशमाने, अण्णा देशमाने , दिलीप पवार आदी शेतकरी बांधव उपस्थित होते. सदर शेतीशाळेचे आयोजक कृषी सहाय्यक रोमा आहेर यांनी उपस्थित शेतकरी बांधवांचे आभार मानले.
कृषि आयुक्तालयाकडुन “खरीप पिके उत्पादन वाढ मोहीम” राबविण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.त्या अनुषंगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होवून त्याचा अवलंब होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदर मोहिमेत सहभागी होवून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.
-रोमा आहेर, कृषि सहाय्यक, खेलदरी

