जेथोड
आदिवासी जीवनशैलीची सुक्ष्मातील सूक्ष्म तपशील सांगणारी कथा
हिरामण झिरवाळ यांचे ‘जेथोड’ हे पहिलेच पुस्तक. वास्तववादी साहित्याच्या लेखनप्रकारात वास्तववाद व निसर्गवाद याचा सुंदर मिलाफ असलेली ही एक उत्तम कलाकृती. लेखक स्वतः आदिवासी समाजातील असल्याने त्यांनी आदिवासी जीवनशैलीतील निसर्गवादी विचारधारा व वास्तववादी विचारधारा यांचा सुंदर गोफ विणला आहे. स्वतंत्र भारतात शिक्षणाची गंगा आदिवासींच्या दारापर्यंत आली. शिकल्या सवरलेल्या आदिवासींच्या अनेक समूहांतून लेखक, कवी लिहिते झाले. त्यांनी आपापली जीवनशैली, संस्कृती, विचार , सभ्यता, दुःख, दारिद्र्य,शोषण लिखित साहित्य कलाकृतीतून मांडण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यात सातमाळा डोंगर व सहयाद्रीच्या उतार भागात राहणारी कोकणा आदिवासी ही एकेकाळची पूर्णपणे नैसर्गिक शेतीवर अवलंबून असणारी एक प्रमुख जमात. या जमातीतून ज्या थोड्या लेखकांनी लिहिण्यास सुरुवात केली त्या लेखकांच्या यादीमध्ये आता लेखक हिरामण झिरवाळ यांनीही दमदारपणे इन्ट्री केली आहे.
तसं पाहिलं तर हे एक आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. पण हे पुस्तक वाचत असताना लेखक स्वतः च्या जीवनाबद्दल काही गोष्टी सांगता सांगता ज्याप्रमाणे अलगदपणे आदिवासी समूहाच्या जीवनशैलीचे सूक्ष्मातिसूक्ष्म तपशिल सांगतो त्यावरून ही गोष्ट त्याची स्वतःची न राहता आख्या समूहाची गोष्ट बनते. त्यामुळे काहीठिकाणी कथा व कादंबरीच्या स्वरूपाचीही वर्णने येतात. त्यामुळे लेखकाने आत्मचरित्र लेखनाच्या धाटणीच्या कोणत्याही कलाप्रकाराचे अनुकरण न करता एक वेगळा लेखन प्रयोग केल्याचे लक्षात येते. लेखकाने त्याचे दुःख, अनुभव, विचार, सोशिकपणा, अल्पसंतुष्टपणा आदी सारे वैयक्तिक पातळीवर न मांडता सामूहिक पातळीवर मांडण्याचा सुंदर प्रयोग विविध प्रसंगातून केला आहे.
या कादंबरीत खूप सारे असे प्रसंग येतात की, ज्या प्रसंगातून लेखक हलकेच आदिवासी संस्कृतीची सभ्यता व तत्वज्ञान याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतात. ‘भुजणी’ या प्रकरणात लेखक लिहितो की, “आदिवासींच्या अनेक पिढ्या नागलीने पोसल्या. दादा कणसरेची एक कथा सांगत. कणसरीचे शरीर कापून कोकण्याला घ्यायला सांगितले. कणसरेचे कोकण्यावर खूप प्रेम. तिने आपले शीर कापून घे म्हणून कोकण्याला खुणावले, पण कोकण्याची हिम्मत झाली नाही. शेवटी काही घेतले नाही तर उपाशी मरशील असे कणसरेने सांगितल्यावर कोकण्याने कणसरा मातेच्या वेणीचा गोंडा तेवढा कापून घेतला. कोकण्याने कणसरेचे शीर कापले असते तर शिरासारखे कणीस नागलीला आले असते. जास्त पीक हाती पडले असते, पण कोकणी हळवा! त्याने आईच्या आयुष्याचा विचार केला. आपल्याला कमी पडले तरी चालेल, पण कुणाला कापून आपले पोट भरणे त्याला कसे आवडणार? कुणाचा गळा कापून जगणं समृद्ध करणे म्हणजे पाप! किती सोप्या तर्हेने वडील शिकवत होते? नागली आणि कोकणा शेतकरी यांची ही कथा काही प्रतिकांच्या रूपाने खूप सारा मानवी जगण्याचा आशय प्रगट करते. एकप्रकारे नीती कथाही आहे. बोध कथाही आहे आणि आदिवासी विचारप्रवाहातील तत्वज्ञानही मांडण्याचा प्रयत्न करते. प्रत्यक्ष महादेव कोकण्याला कणसरेचे शिर कापून घ्यायला सांगतो. कणसराही माझं शीर कापून घे नाहीतर उपाशी मरशील असे सांगते. पण कोकणी कणसरेच्या वेणीचा गोंडा तेवढा कापून घेतो. यामध्ये मानवाने आपल्या सुखासाठी एखादी गोष्ट समूळ नष्ट होईल इतपत त्याचा उपभोग घेऊ नये. तसेच कणसरेचे शीर कापले असते तर शिरासारखे कणीस म्हणजे जास्त काही कोकण्याच्या हाती पडले असते. पण असे न करता गरजेपुरते घ्यावे म्हणून तो वेणीचा गोंडा कापतो. यातून कणसराही जगते आणि कोकणा शेतकरीही. कितीही संपत्ती मिळाली तरीही संतुष्ट न होणाऱ्या मानवी प्रवृत्ती साठी बोधही या कथेतून मिळतो असे खूप सारे खूप अर्थ या कथेत दडलेले आहेत. याच प्रकरणात लेखकाने पुढे एका ठिकाणी असे लिहिले आहे की, ” जनावरांना वेलीचा चारा खाऊ घालायचा असेल तर जमिनीवरून झाडावर चढणारी वेल न तोडता झाडावरून लोंबकळणाऱ्या वेली तोडून खाऊ घालण्याची समज आदिवासींत आहे. हे शहाणपण जंगलात राहून आदिवासी शिकला आहे. म्हणूनच लेखक एका ठिकाणी लिहितात की, “आदिवासी जंगलात राहिला, पणआदिवासीने जंगल कधीच तोडले नाही. इथले सागवान बाहेरच्या तस्करांनी पळवलं…” ही वस्तुस्थिती आहे. आजही आदिवासी आपल्या पन्नास टक्के गरजा जंगलांवरच भागवतात. कामासाठी शेतकऱ्याने जंगलातला एखादा भारा बांबू जरी तोडला तरी फॉरेस्टचे वनरक्षक पकडतात. दंड करतात नाहीतर पैसे, कोंबडे द्यावे लागते.एकप्रकारे विकतच घ्यावे लागते. आदिवासींच्या दैनंदिन वापरातल्या वस्तू ह्या निसर्गातील लाकडे, बांबू, पाने यांपासून बनविलेल्या असतात. त्या वस्तू पर्यावरणपूरक असतात. ह्या सर्व वस्तूंची , गरजांची पूर्तता नैसर्गिकपणे उगवलेल्या जंगलांतून होते. मात्र दुसरीकडे काही दलाल पैसा मिळविण्यासाठी सर्रास जंगलतोड करतात. जंगले खूप वेगाने कमी होत आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावर तर होतोच आहे पण जंगल म्हणजे फक्त सहल, मनोरंजन करण्यासाठी चे ठिकाण समजणाऱ्या शहरी संस्कृतीच्या लोकांनाही जंगलांची गरज लवकरच वाटेल. म्हणूनच लेखकानेही लिहिले आहे की, “लोकांना शहराबाहेर रिसॉर्टची गरज पडू लागलीय. शहरातील प्रचंड लोकसंख्येने निर्माण झालेली गुंतागुंत, पसरणारे आजार, दिवसेंदिवस अधिक विषारी होत जाणारे अन्न, प्रदूषित पाणी, हवा हे पाहिले की माणसाला सर्व सोडून अस्तित्व टिकविण्यासाठी पुन्हा शुद्ध हवा, पाणी,अन्न याच आदिम गरजांसाठी सर्व शक्ती पणाला लावावी लागेल कि काय, अशी शंका वाटते.” लेखकाची ही शंकारास्त आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी आतापसूनच पावले उचललेली बरी.
आदिवासी शेतकऱ्यांचे दुःख, व्यथा, यातना लेखकाने विविध प्रसंगातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यभर केवळ पोट भरण्यासाठी संघर्ष करत असलेल्या लोकांना चौरस आहार तो काय मिळणार? लेखकही यातून गेला असल्याने लेखक लिहितो, ” पाचवी सहावीत शिकत असताना चौरस आहार समजविण्यासाठी चौरस आहाराच्या थाळीचे चित्र दिलेले असायचे. ही चौरस आहाराची थाळी आम्ही कोणीही पाहिलेली नव्हती. असे जेवण कोणती लोकं खात असतील?असा प्रश्न माझ्या बालमनाला पडायचा.” घरातलं धान्य संपल्यानंतर भाताच्या कोंड्याच्या भाकरी खाऊन दिवस काढायचे. कधी रानातील कडू कंद, नेवाळे, कौला नावाचे गवत असं काहीबाही खाऊन जगलेली आदिवासी जमात लेखक यातून दाखवून देण्याचा प्रयत्न करतात.
आजपर्यंत आदिवासी समाजावर खूप साऱ्या लोकांनी लिहिलेलं आहे. पण आदिवासी माणसाच्या स्वभाव गाभ्याचा, त्याच्या गुण वैशिष्ट्यांच्या अंतरंगाचा तळ दाखविण्याचे काम पहिल्यांदा हिरामण झिरवाळ यांनी वेगळ्या शैलीने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. चुलीवरच्या माळीवरचे लेखक एक उदाहरण देतो. ही माळी म्हणजे बांबूची जाळी किंवा ताटी बनवून पावसाळ्यात चुलीच्या वर टांगवली जाते. पावसाळ्यात काही सुकवायचे असेल तरी त्याचा उपयोग होतो किंवा कांदे खराब होऊ नयेत म्हणून त्या माळीवर ठेवतात. हे कांदे धूर लागून काळे होतात पण आतून मात्र चांगले राहतात. याचा संदर्भ जगण्याशी जोडतांना लेखक म्हणतो, ” माझ्या माणसांचे जगणेही त्या कांद्यासारखेच. परिस्थितीच्या धुराने वरून काळे झालेले मात्र, आतून पांढरेशुभ्र निरागस!
जगण्याच्या लहानसहान गोष्टींसाठी काय काय करायचे. पण कुणाचीही तक्रार नाही. वाट्याला आलेले जगणे विनातक्रार जगत राहायचे. कोणतीही मोठी अवास्तव स्वप्ने नाहीत. त्यामुळे दुःखी होण्याचा प्रश्नही नाही. हे आदिवासी माणसाचे स्वभावगुण लेखकाने आठवणींचे अनुभव सांगताना सहजच उलगडून दाखविले आहेत.
अशा या भोळ्याभाबड्या आदिवासी समाजाची दुरवस्था शिक्षणामुळे तर झालीच आहे पण आपल्या अल्पसंतुष्ट आणि प्रचंड बुजऱ्या स्वभावामुळे प्रश्न विचारण्याची क्षमताच समाज गमावून बसला आहे. हा देश ही व्यवस्था आपले काही देणे लागते. इथल्या संपत्तीवर आपलाही तितकाच समान अधिकार आहे याची जाणीव नसलेल्या समाजाबद्दल खंतही लेखक व्यक्त करतो.
एकंदरीत या आत्मचरित्रपर पुस्तकात एकूण तेरा प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणात आपले अनुभव कथन करतांना लेखकाने स्वतः च्या जीवनाबरोबर सामाजिक जीवनशैलीचाही पट उलगडून सांगता येतील असे तपशील वर्णन केले आहे. यामध्ये काही अस्सल आदिवासी कोकणा बोलीतील शब्द आले आहेत. काही शेतीशी संबंधित शब्द आले आहेत. काही ठिकाणी कोकणा आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थिती गतीचे ओझरते दर्शन होते,तर काही ठिकाणी या समाजातील अंधश्रद्धातसेच आदिवासी विचारधारा यांच्या बाबतीतही तपशील येतात.
पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणात लेखक लिहितो की मी जर तहसिलदार झालो नसतो किंवा मी राज्य सेवेची परीक्षा दिली नसती तर मी काय केले असते?
अर्थात इथे लेखकाला आपल्या चांगल्या जगण्यासाठी पर्याय असू शकतात हे सुचवायचे आहे. या जगात मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे की तो कोणतेतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवतो. त्या दिशेने आपली सारी कर्मे करत राहतो. पण एखाद्यावेळी ध्येय गाठता आले नाही तर? स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत बोलायचे तर बरीच मुले खूप प्रयत्न करूनही अपयशी होतात. शेवटी निराशा येते. मग कुठल्यातरी नशेच्या,आत्महत्येच्या वा वेगळ्या हीन मार्गांचा वापर करतात. खरे तर जीवन जगणे म्हणजे आनंद मिळविणे. मग आपल्याला ध्येय गाठता आले नाही म्हणून आनंदाने जगताच येणार नाही काय? जीवन जगण्याचे अनेक पर्याय खुले असू शकतात हे सुचविण्यासाठी लेखक वर उल्लेखित प्रश्नाच्या अनुषंगाने असे म्हणतो की मी शिक्षक होतो तर अधिक चांगला शिक्षक झालो असतो. तेंव्हा दुराग्रहाने एखाद्या स्वप्नाला चिकटून राहणे कितपत योग्य आहे? आपल्या स्वप्नांचा पुनर्विचार करून नव्या वाटा स्वीकारण्याची लवचिकताही ठेवली पाहिजे असा बोधपर संदेश स्वतः च्या आत्मचरित्राच्या निमित्ताने लेखकाने दिला आहे. तो यथार्थ आहे.
प्रत्येकाने एकदा अवश्य वाचावे असे ह्या दशकातील एक उत्कृष्ट पुस्तक. मी हिरामण झिरवाळ यांना साहित्याच्या कथा, कादंबरी, कविता यांसारख्या इतर प्रकारांतूनही अभिव्यक्त होण्यासाठी शुभेच्छा देतो.

