आहुर्ली परिसरात वाघाचा मुक्त संचार
नागरीकांमध्ये घबराट
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी
(नवनाथ गायकर यांजकडुन)
– आहुर्ली परिसरात अलीकडे निर्धास्त पणे वाघ, बिबटया आदी हिंस्र श्वापदाचां मुक्त संचार सुरु आहे. या श्वापदाकडुन नागरीकाच्यां जीवास धोका असतानांही वन विभाग मात्र बळी जाई पर्यंत कार्यवाही करायचीच नाही अशा भुमिकेतुन बाहेर यायला तयार नाही. तर दुसरीकडे नागरीक मात्र जीव मुठीत धरुन वावरत आहे.
आहुर्ली गावालगतच्या कर्होळे येथे नुकताच या वाघाने भारत खातळे या मळयात राहणार्या शेतकर्याच्या वस्तीत घुसुन गाईच्या वासरावर जीवघेणा हल्ला केला होता.सदरील शेतकरी कुटुंबाने तातडीने धाव घेत आरडाओरड करत या वाघाला पळवुन लावल्याने सुदैवाने वासरु बचावले आहे.
दरम्यान शेतकर्याच्यां पशुधनाची हानीचा प्रकार दररोज सुरु आहे. यामुळे शेतकरी भीतीग्रस्तही झाला आहे तर आर्थिकद्रुष्टीने हानीही सोसत आहे.
संध्याकाळी पाच नंतर रात्रभर या वाघाचा परिसरात मुक्त संचार सुरु होतो.यामुळे आहुर्ली सह परिसरात संध्याकाळ नंतर नागरिक चक्क दरवाजे खिडक्या लावुन घरात बसणे पसंत करत आहेत.

बळी गेल्यावर कारवाई करणार का ?
आहुर्ली परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरु असुन नागरिक घाबरलेले आहेत.संध्याकाळ नंतर अक्षरशः जीव मुठीत धरुन वावरावे लागते.
वन विभाग जागे कधी होणार ? बळी गेल्यावर कारवाई करणार का?
–पांडुरंग पा.खातळे
माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते
दरम्यान वाघाच्या दहशतीने शेतकरी वर्ग मोठया प्रमाणावर संत्रस्त झाला आहे.शेती पंपासाठीचा वीज पुरवठा नेमका रात्रीच होत असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी जीव मुठीत धरुन काम करावेच लागते.
दरम्यान अलीकडच्या काळात वाघ, बिबटयादी श्वापदाच्यां हल्ल्यात मानवी बळीची संख्या चिंताजनक पद्धतीने वाढत आहे तर दुसरीकडे वन विभाग या श्वापदानां नियंत्रीत करण्याऐवजी गंमत पहात ढिम्म असल्याचे संतापजनक चित्र दिसून येते आहे.

