[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

प्रश्न सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न प्रबळ मानसिकतेचा प्रश्न शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा . …?

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

नारपारला मंजुरी पण चांदवडच काय?
लोकप्रतिनिधींकडून पाणीदार भूमिकेची अपेक्षा

डॉ आत्माराम कुंभार्डे

प्रश्न सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न प्रबळ मानसिकतेचा प्रश्न शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा .?

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून महाराष्ट्राच्या पटलावर सर्वांना ज्ञात असुन अवर्षण प्रवर्षण म्हणून महाराष्ट्र शासनाच्या दप्तरी नोंद आहे… परंतु दुष्काळ मिटवण्यासाठी लोकप्रनिधी कडून आजपर्यंत हवे तसे प्रयत्न शासन दरबारी झाले नाही. तसेच जनतेतून जन आक्रोश किंवा जन आंदोलने उभी राहिली नाही. पर्यायाने चांदवड तालुक्याच्या कपाळी असलेला दुष्काळाचा कलंक अजून ही मिटलेला नाही. उत्तर पूर्व व दक्षिण पूर्व भागातील १००% (शंभर टक्के) शेतकरी हा निसर्गाच्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्या भरोशावरच बँकांचे कर्ज घेतो आणि शेती करतो, व्यवसाय करतो. आजही तालुक्यातील 70 टक्के पेक्षा जास्त शेतकरी अजूनही कर्जबाजारी आहे. तालुक्यातील शेतकरी सर्वसाधारण जीवन जगत असुन कर्जाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या देखील केल्या आहेत.
या प्रश्नावर अनेकदा जनतेने आमदार खासदार लोकप्रतिनिधी निवडून दिले. त्यांनी त्यांच्या पद्धतीने वेळोवेळी प्रयत्न केले, परंतु यश मात्र आले नाही. आजही एवढ्या पावसाळ्यात 25 ते 30 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तरीही तालुक्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी कोणी पुढे येत नाही तसा प्रबळ प्रयत्न कोणी करत नाही हे दुर्दैव आहे आपले. प्रत्येकालाच आमदार व्हावस वाटतं परंतु या प्रश्नाकडे कोणी गांभीर्याने बघत नाही, याचा अभ्यास करत नाही.

शेती सिंचनाचा व औद्योगीकरणाचा प्रश्न हा तरुणाचा व शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा गंभीर प्रश्न असून तालुक्याचे भविष्य या पाणी प्रश्नावर अवलंबुन आहे. आजही तालुक्यातील जनता आपल्याला पाणी मिळेल या अपेक्षेने जगत आहे यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा दिला पाहिजे, जन आक्रोश, जन आंदोलन केले पाहिजे.
स्व. मा.आ.ना.का. गायकवाड व त्याकाळातील नेते यांनी ८० च्या दशकामध्ये चांदवड तालुक्याचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी पुणे गाव धरणाची निर्मिती केली व पुणेगाव कॅनाल तयार झाला. त्याचा काहीसा फायदा वडनेर गट व तालुक्यातील दक्षिण भागाला होतो. कॅनल द्वारे पूर पाणी देण्याचे नियोजन चांदवड आणि येवला तालुक्याचे असून त्यातही चांदवड तालुक्यातील पाच ते सहा बंधारे पाण्याने भरण्याचे प्रयोजन आहे व येवला तालुक्यात तब्बल २५ ते ३० बंधारे भरण्याचे प्रयोजन आहे, हाही अन्याय आपल्यावरच आहे. आज त्याच पुणे गावमध्ये मांजरपाड्याचे पाणी आले परंतु चांदवड तालुक्याची वाढीव सिंचनाची मर्यादा व धरणांची संख्या मात्र वाढली नाही ही शोकांतिका आहे. खरंतर पाणी वाढल्यामुळे सिंचन क्षेत्रही वाढायला हवं आणि परसुल पासून पुढे तो कॅनॉल हिवरखेडे मार्गे पांझन नदीमध्ये सोडायला हवा जेणेकरून सिंचनाचे क्षेत्र आणि लाभक्षेत्र वाढेल, असे प्रयत्न झालेले दिसत नाही आणि कोणी केला हो नाही.
1985 ला स्वर्गवासी जयचंद कासलीवाल हे आमदार झाले त्यांनी हतीयाड धरण निर्मितीसाठी जन आंदोलन उभे केले त्यावर त्यांना जनतेने तीन वेळेस आमदार केले. परंतु शेती सिंचन पाणी प्रश्न सुटला नाही. एक काम मात्र नाव घेणे केले ते म्हणजे ४४ गाव जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना राबवून पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला.
१९९९ ला शिरिष कोतवाल साहेब आमदार झाले नंतर २००४ ला उत्तम बाबा भालेराव आमदार झाले त्या दोघांनाही पुणे गाव कॅनॉल व रामेश्वर झाडी कालवाचे प्रलंबित असलेलो कामे मार्गी लावण्यामध्ये लक्ष घातले ओझरखेड कॅनलचा ही प्रश्न मार्गी लावला. हतियाड (राजदरवाडी) धरणाची पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न केले. जांबुटके धरणाची उंची वाढवणे किंवा नवीन जांबुटके धरण बांधणे, तसेच खडक ओझर येथे काळढोह बंधारा बांधणे. खोकड तलावाचा गाळ काढणे, असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेत.
नंतरच्या काळामध्ये शासनाचे आणि उच्च न्यायालयाने आदेश दिले की गोदावरी आणि तापी खोरे हे दोन्ही तुटीचे असून या खोऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारे पाणी अडवता येणार नाही, मोठे बंधारे बांधता येणार नाही त्याचाही फटका प्रकल्प मार्गी लावण्यासाठी बसला.

२०१४ ला डॉ. राहुल आहेर आमदार झाले आणि त्यांनी शब्द दिला होता की डोंगराच्या पोटा पोटाने हाय राईज ( high-rise ) कॅनाल निर्माण करतो. नार पार योजेनेतून आणि चांदवड तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवतो.त्यावर लोकांनी भरोसा ठेवला. लोकांना असे वाटले की तालुक्यातील शेवटपर्यंत दरेगाव / कानडगाव पर्यंत पाणी येणार परंतु अद्यापही पाणी आले नाही. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला गेली दहा वर्षापासून केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे हा प्रश्न चुटकी सरशी सुटणं काळाची गरज होती. परंतु आज ही आपली लोक चातकाप्रमाणे आशाळभूत नजरेने पाण्याची वाट बघत आहे..

खरं तर नजीकच्या काळात केंद्र सरकारने व राज्य सरकारने नदी जोड प्रकल्प राबविण्याबावत निर्णय घेतला आहे. पश्चिम नद्या वाहिन्यांचे पाणी पूर्व वाहिन्यांना टाकून ते मराठवाड्याला देण्याचे शासन स्तरावर निर्णय झालेला असून त्यातून काही पाणी आपल्या तालुक्यासाठी आरक्षित करणे गरजेचे आहे व त्याचा तसा DPR तयार करून शासनाकडून मान्यता घेणे अती महत्वाचे आहे. चांदवड तालुक्यात हरितक्रांती होण्यासाठी ही शेवटची संधी आहे. त्यासाठी ४ ते ५ TMC पाणी आवश्यक आहे. आज जर पाणी आरक्षित होऊ शकले नाही व तसा DPR मंजूर झाला

नाही तर भविष्यात कधीही चांदवड तालुक्यातील शेती व औद्योगीकरणाला पाणी मिळणार नाही.

सिन्नर विधानसभा मतदारसंघ हा आपल्यापेक्षाही जास्त दुष्काळी असताना नदी जोड प्रकल्पांतर्गत त्याचा समावेश झाला तसा DPR तयार ही झाला. येणाऱ्या काळामध्ये साडेतेरा हजार कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी शेतीपाणीपुरवठ्याची व औद्योगीकरणाच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होणार आहे आणि भविष्यात सिन्नर तालुका हा हरितक्रांती तालुका म्हणून नावारूपाला येणार.. त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी सत्तेचा वापर करून हे शक्य करून घेतलं मग चांदवड का नाही ?

नांदगाव मतदारसंघ ही आपल्यापेक्षा जास्त दुष्काळी असूनही त्या ठिकाणी हजारो एकरामध्ये एमआयडीसी मंजूर झाली. त्याही जनतेच भविष्य आज ना उद्या उजळणार. मग आपल्या चांदवड-देवळा मतदार संघाचे भविष्य कधी बदलणार

खालील गोष्टींवर जर अभ्यास केला पाठपुरावा केला तर चांदवड तालुक्याला शंभर टक्के पाणी मिळू शकते आणि चांदवड मतदारसंघातही हरित क्रांती होऊ शकते. औद्योगिक वसाहत निर्माण होऊन तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो व तुमचं आमचं भविष्य ही बदलू शकतं.

शासन स्तरावरून पश्चिम वाहिन्यांचे पाणी हे पूर्ववाहिन्यांकडे वळवण्याचा अभ्यास सुरू असून अनेक वळण योजना यामध्ये प्रस्तावित आहे. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील दमण गंगा परिसरातील पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेकडे वळवण्याचा अभ्यास सुरू असून ते एकदरे पासून वाघाड धरणात पडणारे (दमण गंगा-एकदरे-गोदावरी नदी जोड प्रकल्प) व नार-पार गोदावरी लिफ्ट योजना क्र.३ व ४ पाणी हे मराठवाड्यासाठी दिले जात आहे. याद्वारे पुणेगाव व करंजवण धरणात येणारे एकुण ७३.४ MCUM पाण्यातुन चांदवड मतदार संघास पाणी आरक्षित करुन देणे शक्य आहे. ते तपासण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी अभ्यास समिती गठीत करणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे राष्ट्रीय जल विकास प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या अभ्यासानुसार पश्चिम नदी खोऱ्यातील पाणी पूर्वेकडे वळविण्याचे धोरण निश्चित झालेले असून पश्चिम नदी खोऱ्यातील पाणी वळण योजनेद्वारे गिरणा नदी खोऱ्यात वळविण्याचे नियोजन आहे. यासाठी एकूण तीन लिंक मध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. त्यातील एका लिंकचे पाणी मांजरपाडा-२ च्या संम मधून बोगद्याद्वारे चणकापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्याचे नियोजन आहे. (अंदाजे १० टी एम सी) सदरचा प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर झालेला असून मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात आहे. या योजनेतून मतदार संघाला आज पाणी अरक्षित झाले नाही व पाणी देण्याचे नियोजन झाले नाही, तर भविष्यात मतदार संघाला पाणी मिळणार नाही आणि तालुका सदैव दुष्काळी म्हणूनच राहील.

तसेच चांदवड तालुक्यात हतियाड (राजदेरवाडी) या लघुपाटबंधारे तलावाचे काम व्हावे, अशी चांदवड तालुक्यातील जनतेची मागील 15 ते 20 वर्षांपासुनची सातत्याची मागणी आहे. या लघुपाटबंधारे तलावास जलविज्ञान वनियोजन प्रकल्प, नाशिककडून 2.21 M.Cum पाणी उपलब्धता प्रमाणपत्र तापी पटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांना दि. 16/07/2012 रोजी जारी केलेले आहे. तसेच हतियाड (राजदेरवाडी) या प्रकल्पाचे तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अतंर्गत असलेल्या उर्ध्व गोदावरी प्रकल्प विभाग, नाशिक या विभागाने सर्वेक्षण केलेले आहे. मात्र प्रकल्प उभारणी करण्यासाठी कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

वरील सगळे प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. मंत्रालय स्तरावर अनेक बैठका घेऊन दबाव तयार करणे, जन आक्रोश, जन आंदोलन उपोषण असे अनेक पर्याय वापरावे लागतील.

सन 2014 मध्ये मी विधानसभेची निवडणूक लढवली भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देतो म्हणून माझा पक्षप्रवेश मतदारसंघात केला, मी तशी तयारीही केली परंतु वेळेवर माझ्या ऐवजी वेगळा उमेदवार दिला व मला अपक्ष उमेदवारी करावी लागली. मला वाटलं मी आमदार झाल्यानंतर हे प्रश्न सोडू शकेल चांदवड तालुक्यातील मतदार राजाने मला भरभरून मते दिली, मात्र त्यावेळेस सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुक लढवित असल्याने व पक्षीय तिकीट नसल्या कारणाने मला त्या ठिकाणी पराभवाला सामोरे जावं लागलं. आणि वरील प्रश्न सोडवता आले नाही.

मी राजकारणात आल्यापासून या गोष्टींचा अभ्यास करतो आहे. चांदवड तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी झटतो आहे. अनेक शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या अनेक अधिकाऱ्यांसमोर बैठका ही केल्या. माझा राजकारणामध्ये येण्याचा उद्देशच चांदवड-देवळा मतदार संघाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा या ठिकाणी एमआयडीसी निर्माण व्हावी, पुणेगाव कॅनॉल चा प्रश्न असेल, ओझरखेड कॅनॉलचा प्रश्न असेल, चणकापुर ते रामेश्वर, रामेश्वर ते झाडी एरंडगाव कालव्याचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न तातडीने सुटावे आणि शेतकऱ्यांचे कल्याण व्हावं हीच माझी व माझ्या वडीलांची इच्छा आहे. मात्र प्रयत्नांना यश येण्यासाठी योग्य त्या संधीची आवश्यकता असते. ती संधी जनतेने एकदा मला द्यावी, हीच अपेक्षा आहे. मला आशा आहे की माझ्या या तळमळीचा मतदार संघातील जनता गांभीर्याने विचार करेल आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.

मला खात्री आहे की एकदा मला संधी मिळाली तर हे सर्व प्रश्न मी सोडू शकतो, असा शब्द यानिमीत्ताने मी देत

आहे.

चांदवड-देवळा मतदारसंघातील पाणी प्रश्नाकडे राजकारण म्हणून न बघता व राजकीय फायदा करून घेण्यापुरता मर्यादीत न ठेवता, अंतकरणापासून, प्रबळ इच्छाशक्तीने मतदार संघातील पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिल्याप्रमाणे पश्चिम नद्या वाहिन्यांचे पाणी पूर्व नदी वाहिन्यांमध्ये टाकून (नार-पार प्रकल्प योजना) संपूर्ण मराठवाड्याला पाणी दिले जाणार आहे. त्यातून आपल्या मतदारसंघाचे 5 TMC पाणी आरक्षित झाले पाहिजे व तसा DPR तयार करून प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समिती व महाराष्ट्र शासन यांचेकडून मंजूर करून घेतला पाहिजे. तरच भविष्यात सिंचनासाठी व औद्योगीकरणासाठी पाणी उपलब्ध होईल आणि चांदवड मतदार संघात हरितक्रांती होवून चांदवड तालुक्याचा कायमस्वरूपीचा दुष्काळाचा कलंक नाहीसा होईल. मी यासाठी स्वतः आजपर्यंत मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब (माजी मंत्री जलसंपदा व नदी जोड प्रकल्प) माननीय विधानसभा उपसभापती श्री. नरहरी झिरवाळ साहेब व माननीय मंत्री श्री. गिरीशजी महाजन साहेब (मा. जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा) मा. खा. हरिश्चंद्र चव्हाण, मा खा. (माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री) डॉ. भारतीताई पवार, उपविभागीय अधिकारी जलसंधारण विभाग नाशिक, मुख्य कार्यकारी अभियंता जलसंधारण विभाग या सर्वांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन पाणी आरक्षण करणे व DPR प्रस्ताव मंजूर करणे ही मागणी वेळोवेळी केलेली आहे.

डॉ. आत्माराम पोपटराव कुंभार्डे मो. 9422257010

मा. सदस्य, जिल्हा परिषद, नाशिक मा. सभापती, कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड

मा. गटनेता, जिल्हा परिषद, नाशिक (भाजपा)

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या