भाग १
“कोरोना वगैरे काही नाही हो…”
“तुम्ही उगाच घाबरता हो…”
“तुमचा देवावर विश्वास नाही का?…”
“जे नशिबात असेल ते घडेल…”
“मरण यायचं तेव्हा येणारचे…”
“ठेविले अनंते तैसेचि राहावे…”
आजचं पोट महत्त्वाचं उद्याचं कोणी पाहालय…”
सारे जग कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन असताना अशी वाक्ये कानावर पडू लागली की, क्षणभर आपले मनही लॉकडाऊन होते आणि बुद्धीही कुंठीत होते…
एकीकडे नीती आयोग सांगतो की, शंभर कोटी भारतीयांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यांपैकी पंधरा टक्के लोकांना संसर्ग होऊन गेला असण्याची शक्यता आहे. कदाचित त्यांची प्रतिकार शक्ती अधिक असावी, म्हणून त्यांच्यात लक्षणे दिसली नाहीत; पण म्हणून कोणीही आपली प्रतिकार शक्ती आजमावून पाहणे संयुक्तिक ठरेल काय?
लॉकडाऊनचे नियम पाळणे, फेसमास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे, सामाजिक अंतराचे नियम पाळणे, असे कितीही प्रबोधन सुरु असले तरी लोकांची मानसिकता त्यासाठी तयार करणे, हे फारच मोठे आव्हान विज्ञान आणि

विद्वानांपुढे आहे, असे म्हंटले तर फार वावगे ठरू नये. तशातच समाज माध्यमांतील तथाकथित वैचारिक व काळजीवाहू संदेशांमुळे तर वैचारिक गोंधळाला आणखीच खतपाणी मिळताना दिसते. त्यात अमुक औषध, तमुक काढा, अमुक पदार्थ टाळावे किंवा खावे अशा अशा विविध उपदेशपर, तर गरम पाणी प्या, वाफ घ्या, व्यायाम करा असे काही काळजीयुक्त संदेश; तसेच काही अफलातून संशोधन दर्शक वैचारिक संदेशही मुक्तपणे फिरताना दिसतात; जसे या व्हायरसचा पी.एच. अमुक असून त्याला घशातच मारण्यासाठी त्यापेक्षा जास्त पी.एच. असलेले पदार्थ घ्यावे म्हणजे प्यावे. तशातच लिंबू रसाचा पी.एच. वीसपेक्षाही जास्त दाखवला असेल तर आपल्याला आपलेच ज्ञान आणि समजूत पुन्हा पडताळून पाहावी की काय असे प्रश्न पडतात. त्यातही कहर असा की अशा संदेशांच्या खरे-खोटेपणाची खातरजमा न करताच ते पुढे मार्गस्थ केले जातात. काही जण त्याकडे कळत नकळत दुर्लक्ष करत असतीलही परंतु काही जण त्यात सांगितलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत नसतील कशावरून?
असे असले तरी या महामारीने काही सकारात्मक व काही नकारात्मक बदल घडवले आहेत. तर काही बदल स्वीकारण्यास भागही पाडले आहे. जगण्याच्या काही जुन्या वाटा मोडीत निघाल्या आणि नव्या वाटा तयार होऊ लागल्या. काही जुने बंध मोडून नवीन वैचारिक बंधांची बांधणी होऊ लागली. पारंपारिक रुळलेल्या वाटांवरून चालणारांना नव्याने निर्माण होणाऱ्या नव्या वाटांबाबत शंका व भीती देखील वाटू लागली. साहजिकच समाजात दोन गट दिसू लागले आहेत: एक म्हणजे जुन्या वाटा मोडीत निघाल्याने हताश होऊन बसलेला आणि दुसरा आधुनिक नव तंत्रज्ञानाचा लीलया वापर करू पाहणारा. म्हणजेच हे आव्हान काहींना अनुकूल वाटू लागले तर काहींना खूप मोठे संकट. यांपैकी काही जण तणावग्रस्त झाले तर काही जण स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागले.
खरेतर बदल स्वीकारले पाहिजेत, अपेक्षित असो वा अनपेक्षित… बदल योग्य असतील ते काळाच्या कसोटीवर टिकतील, अयोग्य असतील ते स्वत:च स्वत:ला बदलून घेतील… असे असले तरी सध्या घडत असलेल्या बदलांचा आढावा घेतल्यास आपल्याला अनेक क्षेत्रात बदल घडताना दिसून येत आहेत. त्यांपैकी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, भौगोलिक, वैज्ञानिक आणि विशेष म्हणजे मानसिक क्षेत्रांत होत असलेल्या बदलांचा आढावा घेतल्यास आपल्याला या बदलांची जीवनव्यापकता नक्कीच लक्षात येईल.
शिक्षण क्षेत्र हे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत असलेले जीवनव्यापी क्षेत्र. या क्षेत्राच्या ठरलेल्या साचात बदल घडू लागले तेव्हा काहींना स्वागतार्ह आव्हान वाटले तर काहींना नकारात्मक संकट. परंतु या क्षेत्राशी सबंधित घटकांची मानसिकता अतिशय वेगात बदलू लागली आणि मुठीत न येणाऱ्या नव्या तंत्रास मिठीत घेण्याची तयारी सुरु झाली. जुने बंध ढिले होऊन अनेक नवीन बंध जुळू लागले. ज्या शब्दांचा संपर्क नव्हता ते शब्द तोंडात लीलया घोळू लागले. जसे ऑनलाईन शिक्षण, ऑफलाईन शिक्षण, झूम मिटिंग, गुगल क्लासरूम, यूट्यूब लिंक, नेटवर्क, डेटा, गुगल शीट, ऑनलाईन चाचणी, इत्यादी.
काही वाक्येही सहज कानांना परिचयाची होऊ लागली, जसे “मिटींगला जॉईन व्हा…”, “स्क्रीनशॉट पाठवा…”, “दिलेली लिंक ओपन करा…”, “दिलेल्या लिंकने जॉईन व्हा…”, “सर, नेटवर्क अनस्टेबल होतेय…” “सर, सारखं बॅक होतय…”, “सर, रिचार्ज संपलाय…”, इत्यादी…
‘विद्यार्थ्यांपासून मोबाईल दूर ठेवावा…,’ ही वैचारिक धारणा बेडकाच्या शेपटासारखी गळून पडली आणि सोबतच अनेक शिक्षकांच्या घराचा कोपरा शुटिंगसाठी स्टुडीओ बनला तर पालकांचे घर, अंगण, शेतांचे बांध, घराची गच्ची, वगैरे ‘वर्गखोल्या’ झाल्या. काही विद्यार्थ्यांना शाळा दुरावल्याचे दु:ख तर काहींना कटकट थांबल्याचा आनंदही झाला.
एकूणच शिक्षण हे वर्गखोलीपुरतेच मर्यादित असते, आणि मूल्यमापनासाठी लेखी परीक्षाच असाव्यात, या धरणा मात्र आज बदलू लागल्या आणि उद्याही त्या बऱ्याच प्रमाणात तशाच बदलत राहतील…
(क्रमश: पुढील भागात…)

