व्रतस्थ कृषीशास्त्रज्ञ हरपला
व्यक्तीने जन्म कुठे घ्यावा हे हातात नाही, कदाचित शिक्षण कोणते घ्यावे हे ही हातात नसावे पण हाती आलेले ज्ञान वापर कसा करावा हे मात्र व्यक्तीच्या हातात आहे असे हाती आलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करणारे माझे गुरुवर्य डॉ.जी. टी. नानकर सर होत आज त्यांचे नाशिक येथे वार्धक्याने वयाच्या एक्यांनव्या वर्षी निधन झाले
माझे ते पदव्युत्तर ( M Sc Agronomy ) आचार्य पदवी (Ph D Agronomy) चे गुरू होते. मी त्यांच्या अधिनिस्त आजचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत आचार्य पदवी प्राप्त केली सर , त्यावेळी सहयोगी संचालक संशोधन , राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प ,छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत होते. सर कृषी विद्या शाखेचे एक ख्यातनाम कृषी शास्रज्ञ होते. त्यांनी, त्यांच्या आयुष्यात माझ्या सारख्या अनेक कृषी पदवीधर विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने केले . लोखंडाला परीस स्पर्श झाल्यावर सोन्यात रूपांतर होते आणि मग हे सोने जसे जगाच्या व्यवहाराला कामी येते हे काम फक्त विद्यार्थ्यांना गुरुच करू शकतात तसे मला माझ्या आयुष्याचे सोने करणारे गुरू म्हणजे आदरणीय डॉ नानकरसर होत.
विद्येला चारही बाजूने मान असतो तसे या माझ्या गुरूंना राज्यातील चारही कृषी विद्यापीठात खूप मान होता .त्यांचा राज्यातील चारही कृषिविद्यापीठातील अनेक कृषी शास्रज्ञा सोबत कृषी ज्ञानाची देवाण- घेवाण होती . माझा आणि त्यांचा मागील पस्तीस वर्षांपासूनचा संबंध, पण आज त्यांच्या जाण्याने सांगता झाली याचे दुःख माझ्या जीवनात कधीही भरून न येणारे राहील. मी सतत त्यांच्या संपर्कात होतो. मला माझ्या राहूरी कृषिविद्यापीठात कृषीविद्या विभागाचे काम करत असताना मला ज्या ज्या वेळी शेतीपिक अथवा कृषी शैक्षणिक संबंधित समस्या जाणवेल त्या त्या वेळी मी त्यांचे मार्गदर्शन घेत होतो. आज त्यांच्या जान्याने अनेक जण माझ्यासारखे पोरके झाले आहेत. सन 1986 साली मला आचार्य पदवीच्या वेळी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर एक संशोधन करण्याचे सांगितले होते ते असे होते की,” पूर्वहंगामी ऊस पिकात बटाटा पीक घेणे “हा विषय तसा माझ्यासाठी नवीन होता. पण गुरूबळ पाठीशी असल्यावर काय होणार नाही .याठिकाणी मला ज्ञानेश्वर महाराज्यांच्या ओवी ची आठवण होते. सद्गुरू सानुकूल असल्यावर काय शक्य आहे आणि नेमकी याच प्रयोगाने माझ्या जीवनाला एक धार आली. उसात बटाटा आंतरपीक ही पद्धती त्या काळी सरांच्या मार्गदर्शनाखाली शिफारस करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रात ऊस क्षेत्रात या पीक पद्धतीचा मोठा गवगवा झाला आणि ऊस शेतकरी बांधवांचा मोठा फायदा झाला. हे मी आजच्या प्रसंगी ह्रदयपूर्वक सांगतो की, त्यांच्या पश्चात सांगणे एक विद्यार्थी नात्याने माझे कर्तव्य समजतो .मला या प्रयोगातून शेतकरी आणि कृषी शास्रज्ञ ओळखु लागले .याचे सर्व श्रेय माझ्या गुरूंना जाते मला फार त्यांचा जिव्हाळा होता असे म्हणेने एकांगी होईल कारण त्यांचाही जिव्हाळा माझ्या बाबत विशेष होता. हे मला आजच्या प्रसंगी सांगणे महत्वाचे वाटते.

आज ते गेल्याने परत माझी भेट होणार नाही. हे वास्तव आहे.
शेवटी ज्ञानेश्वर महाराजांच्या सत्याने सांगतो करतो.
” देहाचिया गावा आलिया
जन्म मृत्यूच्या सोहळीया
ना म्हणो नये धनंजया जियापरी “
जन्म घेतला म्हणजे मृत्यू अटळ आहे. पण माणसाने चांगली कार्य केली तर हा मृत्य नसतो तर तो सोहळा असतो .तसा सोहळा आज माझ्या गुरूंचा आज मी पाहत आहे .सत्कर्म करणाऱ्या व्यक्तीचा कधीच विनाश होत नाही याची मला पूर्ण खात्री आहे. ते गेले असले तरी माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या रूपाने तेच दिसत आहे.
डॉ आनंद विठलराव सोळंके , प्रमुख , कृषीविद्या विभाग
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी जि. अहमदनगर.
- शब्दांकण
रामेश्वर ठोंबरे
विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र वनामकृवी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर 

