[masterslider id="2"]
कविता काव्यरसास्वाद लेख हितगुज

आदिवासी जीवनाच्या विफलतावस्थेचे दर्शन घडविणारा ‘रानवाटा’ काव्यसंग्रह

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

कवीला निसर्गाची ओढ असलेली जाणवते.मानवतावादी दृष्टिकोन, संवेदनशील मन रूपक, उपमा, प्रतिमा, प्रतीके यांचा योग्य वापर कवीने केला आहे. मूल्याधिष्ठित सुसंस्कारी आदिवासी संस्कृतीला भकास करू पाहणाऱ्या व्यवस्थेवर कवी ताशेरे ओढतो.

 

कवी काळूदास कनोजे यांचा जन्म १ फेब्रुवारी १९७३ सापतपाली ता.त्र्यंबकेश्वर या आदिवासी निसर्गरम्य परिसरात झाला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. अगदी प्राथमिक शाळेपासूनच सुट्टीच्या दिवशी गुराढोरांना घेऊन रानात जाणाऱ्या कवीला त्यातूनच निसर्गाची ओढ निर्माण झाली. अठराविश्व दारिद्र्य आणि आबाळीमुळे वडिलांची गुरंढोरं सांभाळण्याची इच्छा होती, पण आईच्या आग्रहाखातर पुढील शिक्षणासाठी त्यांना बाहेरगावी जावे लागले. त्यांचे माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊसाहेब हिरे आश्रमशाळा चिंचवड येथील शाळेत झाले. तिथे वस्तीगृहातील राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. हलाखीचे जीवन जगत असतांनाच इयत्ता ८ वी पासूनच वेड्यावाकड्या लेखनाला त्यांनी सुरवात केली.तर महाविद्यालयीन शिक्षण नाशिक शहरातील पंचवटी कॅालेज व एम.ए. के.टी. एच. एम. कॅालेज येथे पूर्ण केले. आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने नाशिकच्या फुले मार्केटमध्ये हमालीचेही काम त्यांनी केले.
सुट्टीत घरी गेल्यावर रात्रंदिवस शेताच्या राखणीसाठी गावापासून दूर शेतातील लहानशा खोपटात आई वडिलांसोबत राहून जीवन त्यांना जगावे लागले. परिस्थिवर मात करीत त्यांनी पुढे बी.एड मुंबई विद्यापीठ येथून पूर्ण केले. सध्या ते सहा शिक्षक म्हणून श्रीमती न. ग. पुरंदरे हायस्कूल, मुलुंड, मुंबई येथे नोकरी करीत आहेत. त्यांचा ‘रानवाटा’ हा पहिला (कविता संग्रह २०१७), ‘सह्याद्रीच्या कुशीत’ हा दुसरा (काव्यसंग्रह २०२३) प्रकाशित झाले असून
आगामी ‘तू गझल माझी’ (गझलसंग्रह) व
‘पाऊलखुणा’ (ललित कथासंग्रह) प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
कवी काळूदास कनोजे यांचा ‘रानवाटा’ हा पहिलाच कवितासंग्रह १६ जून २०१७ रोजी शारदा प्रकाशन, ठाणे यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.या कविता संग्रहाची पृष्ठ संख्या १०४ आहे.कवी काळूदास कनोजे यांचा ‘रानवाटा’ हा कवितासंग्रह त्र्यंबकेश्वर सारख्या आदिवासी निसर्गरम्य परिसरातील आदिवासी जगण्याचे भयान चित्र रेखाटणारा, आदिवासी जगणे मुखर करणारा महत्त्वपूर्ण कविता संग्रह आहे. या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ आदिवासी जीवनाचे व जगण्याचे चित्र अधिक गडद करून जाणारे आहे. काव्यसंग्रहाचे शीर्षक ‘रानवाटा’ असून ज्या भागात आदिवासी माणूस राहतो, त्या जंगलमय वाटेवरून प्रवास करताना अनेक संकटांना सामोरे जात संघर्षमय जीवन जगणाऱ्या आदिवासी बांधवांच्या जीवनाचे भयान वास्तव या काव्यसंग्रहामधून कवी मांडताना दिसतो. हा काव्यसंग्रह सुरुवातीपासूनच वाचक वर्गाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. या कवितासंग्रहाचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे हा काव्यसंग्रह अष्टाक्षरी छंदात असल्यामुळे कवितासंग्रहातील प्रत्येक कवितेला वेगळा आशय, लय व तालबद्धता निर्माण झाली आहे. भौतिक प्रगतीपासून वंचित असलेल्या आदिवासी माणसांच्या खडतर जीवनातील अनेक पेचप्रसंग अत्यंत नाजूक शब्दकळांच्या माध्यमातून तसेच निसर्ग चित्र व प्रतिमांच्याद्वारे कवितेत रेखाटल्या आहेत. कवितासंग्रहातील कवितांमध्ये आदिवासींची रानवाटेवर चालताना होणारी पायपीट, पावलोपावली होणारी फसवणूक, शोषण, अन्याय, अत्याचार तसेच जगण्याचे गुदमरलेपण प्रतीत होताना दिसते. स्वार्थी प्रवृत्तींमुळे आदिवासींचे अस्तित्व नष्ट करू पाहणाऱ्या वृत्तीवर कवी कडाडून टीका करतो. दुःखाची धार असलेली प्रत्येक कविता जरी कारुण्यपूर्ण असली तरी तितकीच प्रसादिक व नादमाधुर्ययुक्त अशी आहे. श्रीमंत शेठ, सावकार यांच्याकडून कर्ज घेऊन वर्षानुवर्ष फेडत जीवन जगणारा आदिवासी कवितेत रेखाटताना कवी म्हणतो,
डोई सावकारी देनं
धनी वेठीच्या कामात,
देनं फेडता फेडता
आली सरत हयात’
या ओळींद्वारे आदिवासींचे परंपरेने चाललेले शोषण व कर्ज फेडण्यातच संपूर्ण आयुष्य मातीमोल कसे होते हे भयान वास्तव कवितेत येते. आदिवासी भागात शुद्ध पाणी पाणी प्यायला न मिळणे ही आजही भेडसावणारी ज्वलंत समस्या आहे. यावर भाष्य करताना कवी म्हणतात,
‘दरी, खोरी हिंडीते
पाणी कातळी धुंडीते,
घेई घागर भरुनी
उभा डोंगर चढिते’
पाण्यासाठी दरी, डोंगर चढून एक-एक थेंबासाठी प्रचंड संघर्ष करीत जगणारे आदिवासींचे भयानक वास्तव कवितेत कवी मांडतो. कवितेत आलेले विस्थापित, धरणग्रस्त आदिवासींचे प्रश्न काळजाला छिद्रे पाडून जातात.
विस्थापित त्या नजरा
बुडल्या धरणाच्या पाण्यात,
सर्वस्व आपलं शोधीत
फसल्या सरकारी गाळात’
विस्थापित, धरणग्रस्त आदिवासींचे प्रश्न कसे दुर्लक्षित राहतात व निराधार आदिवासी रानोवनी अत्यंत हलाखीचे जीवन जगतो या प्रश्नाकडे कवी लक्ष वेधून घेतो. आदिवासी भागातील ‘रोजगार हमी’ हा आदिवासी माणसांच्या जगण्याचा आधार आहे परंतु या रोजगार हमीचे वास्तव कवी चित्रीत करतो.
मस्टर घेई मुकादम
खोटी हजेरी तो ठोकी,
मिलो तांदूळ बाजरी
काळ्या बाजारात विकी
भुकेल्या आदिवासींच्या वाट्याला अन्नाचा एकही घास येऊ नये, हे वास्तव डोळ्यात पाणी आणून जाते. आदिवासी शेतकऱ्यांची अवस्था देशभरातील शेतकऱ्यांसारखीच आहे. कर्जफेड न झाल्याने आत्महत्या करण्याकडे वळणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना तसेच भारतातील संबंध शेतकऱ्यांमध्ये कवी कवितेतून आशावाद निर्माण करू पाहतो.
घेऊ नको बळीराजा
उगीच अशी फाशी,
नाहीतर जग राहील
अन्नावाचून उपाशी’
जगभरातील पोशिंद्या शेतकऱ्याला हा महत्त्वपूर्ण संदेश कवी आपल्या कवितेतून देतो. कवीचा मानवतावादी दृष्टिकोन व संवेदनशील मनाचे दर्शन यातून प्रकर्षाने घडते. कवितासंग्रहातील सर्वच कवितांमधून अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, शोषण व त्याला बळी पडलेल्या आदिवासींच्या दुःखाचे दर्शन कवी घडवितो. कवीला निसर्गाची ओढ असलेली जाणवते.मानवतावादी दृष्टिकोन, संवेदनशील मन रूपक, उपमा, प्रतिमा, प्रतीके यांचा योग्य वापर कवीने केला आहे. मूल्याधिष्ठित सुसंस्कारी आदिवासी संस्कृतीला भकास करू पाहणाऱ्या व्यवस्थेवर कवी ताशेरे ओढतो. नैसर्गिक आपत्ती, मानवी जुलूम, जबरदस्ती यांचेही जागोजागी चित्रण केलेले आढळते. कविता संग्रहातील सर्वच कवितांना लोकगीतांचा बाज निर्माण झालेला जाणवतो त्यामुळेच नादमाधुर्य, प्रासादिकता व गेयता हे काव्यगुण सहाजिकच त्यांच्या काव्यात आढळतात. एकूणच हा कवितासंग्रह आदिवासी जगण्याचे, संघर्षाचे भयान व वास्तवचित्र रेखाटतोच परंतु जगण्याच्या विफलतावस्थेचे चित्रण करण्यात हा काव्यसंग्रह यशस्वी ठरला आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून जगण्याच्या वाटा शोधणारा व संघर्षमय जीवन जगणारा आदिवासी माणूस रेखाटण्यात ‘रानवाटा’ कवितासंग्रह यशस्वी झाला असून कवितासंग्रहाचे शीर्षकही त्या दृष्टीने समर्पक ठरते. सदर ‘रानवाटा’ काव्यसंग्रह वाचकांच्या निश्चितच पसंतीस उतरेल यात शंका नाही.

डॉ.मधुचंद्र लक्ष्मण भुसारे
(कवी, साहित्यिक व आदिवासी लोकसाहित्य अभ्यासक)
संपर्क: ९८३४३३२७७२

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या