[masterslider id="2"]
कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद विशेष लेख

माती गोंदते हिर्वाई : सृजनशील काव्य प्रतिभेचा अविष्कार, पुस्तक परिचय – सोमनाथ पवार

यांनी लिहिलेले ग्राम चैतन्य

पुस्तक परिचय – सोमनाथ पवार
पिंपळगाव बसवंत
८३७९८२० ४९६

माती गोंदते हिर्वाई : सृजनशील काव्य प्रतिभेचा अविष्कार

कवितेचा प्रेरणाश्रोत :ग्रामीण साहित्य प्रवाह

निसर्गाची नवलाई
माती गोंदते हिर्वाई
निसर्गा विषयीचा असणारा आपला सृजनशील भाव कवी विठ्ठल तात्या संधान पहिल्याच कवितेत अधोरेखित करताना दिसतात. देवाने जेव्हा हे विश्व् निर्माण केले, तेव्हाच सजीवांसाठी निसर्गाची निर्मिती केली असावी. निसर्गाने माणसाला खऱ्या अर्थाने मुक्त हस्तपणे भरभरून दिले आहे. ऋतुमानानुसार निसर्गात वेगवेगळे बदल घडतात. प्रत्येक ऋतुत निसर्गाची वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. याचं कवीला नवल वाटतं. निसर्गाच्या या नवलाईचा खरा साक्षीदार हा शेतात राबणारा कष्टकरी शेतकरी असून, शेती मातीशी त्याची नाळ असल्याने हे बदल तो जवळून अनुभवतो. पावसाळ्यात पाऊस पडतो. जमीन भिजते, मातीआड झालेल बियाणे रुजते आणि हिरवी पाती वर डोकावतात.तेव्हा निसर्गाच्या किमयेमुळे दिसणारी हिरवळ, हे जणू रान गोंदून काढल्यागत वाटतं. पाऊस योग्य वेळी योग्य प्रमाणात पडला तर कष्टकऱ्याचे जीवन आनंदी होते. प्राणी मात्रांचे जीवन सुखी होते. सगळीकडे चैतण्याचेच वातावरण दिसते. हे सांगताना कवी लिहितो.
झाडातून पाखरांचे
चाले किलबिल गाणे
मुक्त्तहस्त निसर्गाने
दिले हिर्वाइचे देणे
हे हिर्वाइच दान देण्याचं सामर्थ्य निसर्गातच आहे. केवळ निसर्गाचेच दान पदरात पडून कृषिजीवन आनंदी राहत नाही. कधीकधी शासनव्यवस्था हा घटकही कष्टकऱ्याला परावलंबी बनवतो. नुसत्या वल्गना करून सत्ता मिळवली जाते. आणि सत्तेच्या मोहात कष्टकऱ्यांकडे दुर्लक्ष होते. यावर कवी विठ्ठल तात्या संधान तीव्र शब्दांत प्रहार करताना दिसतात.
सत्ता सुंदरीची भुरळ सर्वांना
सत्तेसाठी गळ्यात गळे
आत्महत्या करण्यासाठी
फास शोधतो नवे गळे
खरं तर कृषीप्रधान देशात ही गोष्ट फार नवी नसून भांडवली व्यवस्थेचे छुपे समर्थन करणारे राज्यकर्तेही शेतकऱ्यांच्या ऱ्हासला कारणीभूत आहे. सत्ता बदलते, सत्ताधीश बदलतात, पण शेतकऱ्यांची व्यथा संपत नाही. मग फरक काय?
सारेच साळसूद माळेचे मणी
दुःख इथले संपत नाही
मरण आता मरून गेले
जिवंतपणी तडफडतो आम्ही

जिवंतपणी मरणयातना भोगायला लावणाऱ्या व्यवस्थेवर कवी कडाडून प्रहार करतो.

शेतकऱ्याच्या जीवनातील पावसाचे महत्व

चार महिन्याचा सुकाळ संपवून पुन्हा आठ महिने त्याच्या भेटीसाठी आसूसलेली काळी आई पाऊस पडल्यावर बहरते, तिच्या सृजनशीलतेला पाऊस जगतो. तिला आनंद होतो. तेव्हा कवी म्हणतो,
पडे पाऊस शिवारी
ढेकळांची झाली माती
साऱ्या शिवारात पाणी
माती झाली न्हाती धुती
खरं तर वयात आलेल्या मुलीचं रूपक कवीने येथे नेमकेपणाने वापरले आहे. माती न्हाती धुती झाली या शब्दातच मातीची आणि पावसाची एकमेकांविषयीचीं ओढ स्पष्ट होते. कवी पुढे लिहितो
पावसात न्हाली माती
आला मातीला सुगंध
भिजताना पावसात
झाली माणसं बेधुंद
माती आणि पावसाचा मिलनाचा सुगंध मनाला आनंद देऊन जातो. कवी ना. धो. महानोर, नभाने भुईला पाण्याचे दान दिल्याचे पाहून हरवून जातात.तो प्रत्यय या काही ओळी वाचताना येतो.
काळ्या मातीमध्ये दिसे
हिर्वा जोंधळा शोभून
माय बाप सुखावती
मोती टपोरे पाहून
पावसावाचून मातीचा श्वास कोरडा होतो.पिक करपून जाते, तसं माणसाचं मनही करपून जातं,पण तोच श्वास जर ओला असेल म्हणजेच शेती पूरक पाऊस असेल तर आबादानी होते. हेच कवीला सांगायचे आहे.
३)कष्टमय जीवनाचे चित्रण करणारी अस्सल ग्रामीण कविता
ग्रामीण जीवनाची प्रत्यक्ष अनुभूती घेणारा साहित्यिकच ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण शब्दबद्ध करू शकतो.कारण ग्रामीण साहित्य ग्रामीण जाणीवेतून लिहिले जाते.त्यात उगीच ओढताण नसते.स्वातंत्र्योत्तर काळानंतर बऱ्याच साहित्यिकांनी ग्रामीण जीवन साहित्यातून पुढे आणले.कवी विठ्ठल तात्या संधान यांचीही कविता याच जाणीवेतून आल्याचे स्पष्ट जाणवते.१९६० नंतर मराठी साहित्यात जे अनेक प्रवाह निर्माण झाले.त्यात ग्रामीण साहित्य हा एक महत्त्वाचा प्रवाह मानला जातो.ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात संख्यात्मक व गुणात्मक दृष्ट्या मोलाची भर घातल्याचे दिसते.मराठी साहित्याला समृद्ध करण्याचे कार्य ग्रामीण साहित्याने केले आहे.त्यात, आनंद यादव यांच्या हिरवे जग या कवीता संग्रहातील कविता,ना.धो.महानोरांच्या कविता,या अस्सल ग्रामीण कवींचा प्रभाव या संग्रहातील कविता वाचताना जाणवतो.
डोंगर माथ्यावर ढगांच्या घागरी
पाणी भरून घेऊन आल्या
ढग भरल्या पाण्याच्या घागरी
गाव शिवावर विसावू लागल्या
या ओळी वाचताना महनोरांच्या कवितेची आठवण होते.तसेच
अलीकडे कवी इंद्रजीत भालेरावांच्या परंपरेतील आपला जीवनानुभव मांडणारी कविता म्हणून कवी विठ्ठल तात्या संधान यांच्या कवितेकडे बघता येईल.

परावलंबित्वामुळे स्वप्नांची माती

शेतकऱ्यांचं जीवन हे खऱ्या अर्थाने परावलंबी आहे.कष्ट करणे त्याच्या हातात असले तरी पाऊसपाणी, बाजारभाव, रोगराई यामुळे तो देशोधडीला लागतो.परिस्थितीसी दोन हात करत कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांना सामोरे जात तो जगाला पोसण्यासाठी आपलं स्वप्न मातीत पेरतो.आणि उगवून येणाऱ्या हिरव्या स्वप्नांची वाट बघतो.कित्येक वेळेस त्याचे स्वप्न धुळीस मिळते. तरी त्याने पेरायचे कधीच थांबवले नाही.
कुणबी स्वप्न मातीत पेरतो
स्वप्न उध्वस्त होतात
कधी दुष्काळी अन् अवकाळीने
तरी तो पेरतच राहातो
त्याचे हे वर्तमानातील स्वप्न भुतकाळात कितीतरी वेळेस विरलेली असतात.तरी त्यातच त्याचं जगणं सुरू असतं.ते कधीही थांबत नाही.हे सांगताना कवी म्हणतो.
वर्तमानातील स्वप्न
भुतकाळात विरतं
शेतीचा ध्यास अन्
मातीचा वास घेऊन
जगणं पुढे सरकत जातं
त्याची ही धडपड पडझडीच्या काळातही परंपरा टिकविण्यासाठी चालूच राहते.

लढायला बळ देणारी कविता

कवी विठ्ठल तात्या संधान हे हाडाचे शेतकरी असून शेतकऱ्यांना उद्भवणारे प्रश्न त्यांना माहीत आहे.कारण जन्मापासून त्यांची नाळ शेतीमातीशी जोडली आहे.त्यातच शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या संघटनेशी त्यांचा संबंध आल्याने त्यांनी संघटनेचा लढा जवळून पाहिला.त्यामुळे व्यवस्थेशी दोन हात करण्याचं बळ त्यांना तिथूनच मिळालं. शेतकऱ्यां प्रती असलेल्या शरद जोशी यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या शब्दा शब्दात जाणवतो.त्यामुळे हार न मानता लढत राहणे, आणि दुःखाला धरून न बसता, त्यातून नवा मार्ग शोधून आपली नवी वाट आपणच शोधून यशाचे शिखर गाठायचे असते.हे कवी ठामपणे सांगतो.
दुःख दोराला बांधून
पादाक्रांत करायची असतात
यशाची शिखरं
डोंगरदऱ्या कडेकपारी पार करताना
अंगावर घ्यायचे असतात
प्रचंड वेगाने वाहणारे वारे
वाऱ्याच्या वेगाने येणारे संकटेही माणसाने झेलली पाहिजे.असेच यातून कवीला सांगायचे आहे.
हे आव्हान असते
माणसातील पराक्रमी पुरुषाला
धैर्य आणि सामर्थ्याला
हे धैर्य आणि सामर्थ्यचं बळ जर माणसाजवळ असेल तर तो संकटांना न जुमानता आपली वाट चालत राहतो.या वेळी कुसुमाग्रजांच्या ओळी आठवतात.
अन् वज्राच्या छातीवरती
घ्या झेलून प्रहार

सामाजिकतेचे भान जपणारी कविता

कवीने जे भोगलं जे पाहिलं ते निःसंकोचपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.हे करत असताना कवीने व्यवस्थेला तर जाब विचारलाच आहे,त्याच बरोबर आपल्या माणसांनाही खडे बोल सुनावले आहे.माणसाचीच भीती माणसाला आहे असं कवी म्हणतो.
टाळ्या वाजवून दिवे पेटवून
दुःख इथले संपत नाही
भीती माणसाचीच माणसाला
भय इथले संपत नाही
यापुढे जाऊन कवी असं म्हणतो
अस्तित्व हरवलेली माणसं
सोम्या गोम्यापुढे लोटांगण घालतात
स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं
इतकी कशी लाचार होतात
माणसाने स्वतः चा स्वार्थ जर बाजूला ठेवला ,तर त्याला कुणापुढेच लाचार होण्याची गरज नाही.हे सामाजिकतेचे भान माणसाजवळ असलं पाहिजे.खरे आणि खोटे चेहरे ओळखता आले पाहिजे.सतत दुसऱ्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे.
चेहऱ्या वरचे मुखवटे
फाडायचे आहे
समाजाला गृहीत धरणारे
मातीत गाडायचे आहे
अशा प्रकारे कवीने अनेक सामाजिक विषयांवर कठोर शब्दांत टीका केली आहे.

आई वडीलांविषयीचा कृतज्ञपुर्वक आदरभाव


आतापर्यंत मराठी साहित्यात अनेक कवींची आपल्या आई वडीलांविषयी एक स्वतंत्र परंपरा दिसते.त्यात आई विषयी लिहिणारे कवी यशवंत असतील.किंवा वडीलांची व्यथा काव्यातून प्रकट करणारे इंद्रजीत भालेराव असतील.त्यातून मातृपितृ भाव दिसून येतो.या काव्यसंग्रहातही हा प्रेमभाव असल्याचे दिसते.
आई असते नारळासारखी
वरून कवटी सारखी कठीण
आतून खोबऱ्या सारखी
मृदु मुलायम
यातून आईचं वरवरचं रागावणं दिसत असलं तरी त्यामागचा तिचा खरा उद्देश प्रेम हाच आहे असं कवी म्हणतो.बापाविषयी लिहिताना कवी म्हणतो.
बाप माझा साधा भोळा
गुराढोरांचा त्याला लळा
चालत असतो बैलापाठी
वेदनांच्या सोडत गाठी
साध्या भोळ्या बापाचं आपल्या मुलाबाळां इतकंच प्रेम गुराढोरांवर आहे. बैलामागे त्याचं चालणं याचा अर्थ, त्याचं संसार चालवणं आणि तो चालवत असताना त्याला येणाऱ्या अडचणी ह्या वेदना असून त्याला त्या सोडविण्यासाठी सतत सामना करावा लागतो. शेवटी कवी आई वडीलांविषयी म्हणतो
आईचं खाऊ घालणं
बापाचं खांद्यावर उचलून घेणं
खाताना आईची खोली कळत नाही
खांद्यावर उचलून घेतलेल्या
बापाची उंची कळत नाही
म्हणून थोडी आई
म्हणून थोडा बाप
गहिवरून येते दोघांसाठी
रोज थोडं मन
आई वडीलांविषयीची कृतज्ञता यातून व्यक्त होते.

समारोप

कवी विठ्ठल तात्या संधान यांच्या या संग्रहातील सर्वच कविता वाचकाला खिळवून ठेवतात.आणि अंतर्मुख ही करतात.या संग्रहाच्या शीर्षका प्रमाणेच आपल्या अनुभवाने आणि शब्दसामर्थ्याने जीवनात मातीवर गोंदलेल्या हिरव्या गोंदणाप्रमाणे इतरांच्या ही जीवनात विचारांचं गोंदण गोंदण्याच काम या संग्रहाच्या निमित्ताने केलं आहे.चित्रकार विष्णू थोरे यांचं आशयघन मुखपृष्ठ प्रथम दर्शनी वाचकाला आकर्षित करतं.कादवा शिवार प्रकाशनचे प्रकाशक, ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांची अस्सल प्रस्तावना या संग्रहास लाभली असून, संवेदनशील साहित्यिक विवेक उगलमुगले, कवी रविंद्र मालुंजकर, आणि कवी राजेंद्र उगले यांनी सुंदर अशी पाठराखण केली आहे.कादवा शिवार प्रकाशनने कवी विठ्ठल तात्या संधान यांच्या सुंदर काव्यरूपी जीवनानुभवांना पुस्तकरूपाने प्रकाशात आणले आहे.या सर्वांनी एका सृजनास खतपाणी घालून विकसित करण्यास हातभार लावला आहे.त्यामुळे काळ्या आईच्या कुशीतून आणि अनुभवाच्या मुशीतून बहरलेलं हे सृजनशील झाड नक्कीच इतरांची सावली बनून आहे.आणि राहील. यात शंकाच नाही.शेवटी एवढेच म्हणावसं वाटतं, तात्या तुमच्या जवळ विचारांची बैठक आहे, अनुभवांचं सामर्थ्य आहे.हातात शारदा आहे. अंतःकरणात प्रतिभा आहे.मन संवेदनशील आहे.तुमच्या हातून असेच उत्तम, कसदार लेखन अविरत सुरू राहो. तुमच्या लेखनीतून नक्कीच दमदार काव्य झरू शकेल असा विश्वास वाटतो. आपल्या काव्य लेखनास शुभेच्छा.

पुस्तकाचे नाव : माती गोंदते हिर्वाई
साहित्य प्रकार :काव्य
कवीचे नाव :विठ्ठल संधान
प्रकाशक :कादवा शिवार प्रकाशन
प्रकाशन वर्षे : जुलै 2023
पृष्ठ संख्या :96
किंमत:१३०/रुपये
एकूण कविता :52

पुस्तक परिचय – सोमनाथ पवार
पिंपळगाव बसवंत
८३७९८२० ४९६

 

लेखकाबद्दल

ग्राम चैतन्य

एक टिप्पणी द्या