[masterslider id="2"]
कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद मुख्य बातमी लेख विशेष लेख

वास्तवतेचे चित्रण करणारा कवी भावेश बागुल ( काव्य रसग्रहण )

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

वास्तवतेचे चित्रण करणारा..कवी भावेश बागुल

“पोरगे भात लावाय येजो”फेम गितकार,गायक,व माझे जवळचे कवीमित्र भावेश बागुल यांचा जन्म सह्याद्रीच्या दरीखोरीत वसलेल्या आणि निसर्ग सृष्टीसै्ांदर्याचे अमोघ असे वरदान लाभलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात झाला,त्यांचे जन्मगाव चिंचले. तसा हा तालुका गुजरात राज्यातील डांग जिल्ह्याच्या सिमावर्ती भागाला लागून असल्याने या तालुक्यातील बहुतेक आदिवासी बांधवांच्या बोलण्यात ‘डांगी’बोलीचा प्रभाव जाणवतो.
कवी भावेश बागुल यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाल्याने.. अगदी बालपणा पासूनच गरीबीच्या अनेक झळा त्यांना सहन कराव्या लागल्या,त्यांचे प्रा.शिक्षण चिंचले या गावात जि.प च्या शाळेत झाले,तर माध्यमिक शिक्षण सातारा, व ज्यू काॅलेज त्यांच्या चिंचले गावी झाले,तर डिप्लोमा इन फार्मसी मालेगाव आणि बी ए बी एड् नाशिकला पूर्ण केले,बालवया पासूनच कवीने आपल्या बरोबर आपल्या समाज बांधवांची अठराविश्व दारिद्रयाने कशी परवड होते,हे अगदी जवळून अनुभवल्याने आपल्या आंतरिक मनाच्या वेदना त्यांनी “पातरी” या काव्यपुष्पात गुंफल्या आहेत, कवी भावेश बागुल यांचा “पातरी”हा काव्यसंग्रह ९ ऑगस्ट २०१९ ला मेधा पब्लिशिंग हाऊस अमरावती यांच्या कडून प्रकाशित झाला,त्यांच्या “पातरी” काव्यसंग्रहाला “वीर बिरसा मुंडा युवा पुरस्कार ” मिळाला असून यु ट्युबला त्यांची २५ गाणी आहेत,तर “घांगळी” हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
“पातरी” हा काव्यसंग्रह म्हणजे आदिवासींच्या वास्तव जीवनाचे जणू चित्रीकरणच आहे,त्यात एक गर्भित अशी विचारधारा आहे,आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत साहित्याला गर्भित आणि अपरिवर्तनीय सामाजिक भूमिका असते,आणि ही सामाजिक भूमिका कवीने त्यांच्या काव्यसंग्रहात मांडली आहे,त्यांच्या काव्यकृतीत जरी कुठेही अलंकारिक शब्दकळा नसली पण वैचारिकता मात्र ठासून भरलेली आहे,आणि याच वैचारिकतेची आज समाज मनाला नितांत गरज आहे.
‘पातरी’ म्हणजे काय?डांगी बोलीत ‘पातरी’ म्हणजे मोह फुलाच्या दारूचा एक घोट,पळसाच्या पानाचा डोमा(द्रोण) करुन त्यात पितात ती पातरी,आदिवासी समाजात लग्न,जन्म,निसर्गपुजेत “पातरी”ला विशेष असे महत्त्व आहे,
कवी “डांगी” बोलीत म्हणतात..
तुमी तुमनेज गोठी लिखत ग्यास
अन आमाला आंदारमा ठेवी ग्यास
ताहा आमाला आमन्या गोठी लिखुला लागण्यात
अमावस ने रातला मन भूताळीन निंगह..
“ताहा आमाला” या कवितेतून कवी आपली खंत मांडतात आम्हाला अंधारात ठेवून तुम्ही तुमचा इतिहास लिहीत गेले,अन आमचा इतिहास मात्र गाडला गेला,आम्हालाही मना पासून अमचा इतिहास लिहायचा होता,पण प्रत्येकवेळी तुम्ही आमच्या भाबडेपणाचा फायदा उचलून अनामिक चेटकीनीची भिती घालून लेखनी पासून परावृत्त केले,पण आता मात्र आम्ही आमचा सांस्कृतीक वारसा जपणारच..आणि तो लिहून काढणारच..!
पाचोराला आमने कानामा
आमना नावा नीही पण
जिंदगीभर आता काम करुला.
यी सांगी सुयारिन दिदि आमनी
आदिवासी पाचोरानी ठाळी वाजवी.
“पाचोरा” म्हणजे पाचवी आजही ग्रामीण आदिवासी वाडी पाड्यात वैद्यकीय सेवांच्या अभावामुळे प्रसुती ही गावातील सुईन(सुयारिन)कडून केली जाते,मुल जन्माला आले,की पाचव्या दिवशी त्या बाळाच्या पाचवीचा कार्यक्रम ठेवला जातो,त्यात कुलदैवताला नैवद्य(बोना आणि पातरी)चा समावेश असतो,कवी आपल्या कवितेतून सांगतात की पाचवीला आमच्या कानात नाव नाही..पण सुयेरिन मात्र कानात हळूच सांगते आता तुला आयुष्यभर मर मर कष्ट करायचे,आणि ती पाचवीचे ताट वाजवते.थोडक्यात कवी आपल्या काव्यातून इथल्या व्यवस्थेलाच जाब विचारतात,वेठबिगारी हेच का आम्हा आदिवासीचे आयुष्य..!
आजही आमालाज हेरताहा
अन सरकार पासून एखाद
यवजना येहला लयुला होवी तं
फिरीहन आमापन
आंगठाणाज दान मागताहा..
कवी आपल्या” दान” कवितेतून आजच्या युगातही अंगठा मागणारे द्रोणाचार्य सगळीकडे आहेत फक्त त्याचे मुखवटे बदलले आहेत,कवी म्हणतात.. गरीब आदिवासींच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवते,पण..ती योजना घरात येई पर्यंत गरीब आदिवासींना अनेक दिव्य पार पाडावी लागतात,त्यासाठी त्याला पैसेही मोजावे लागतात,दान कवितेतून कवीने आपल्या “डांगी” बोलीतून भ्रष्टाचारावर आसूड ओढले आहेत.
काम करी करी आंगमा दुखुला
लागना काय आमना वडला.
आजही मोहवानी एक पातरी पी
शेंगळनी इडी वडी
रातसून बेस हुयताहा.
कवी आपल्या “पातरी” कवितेतून आजही सह्याद्रीच्या कड्याकपारी रानात वास्तव्य करणारा आदिवासी समाज आयुर्वेदालाच जास्त प्राधान्य देतो,कवी म्हणतात ऊन,वारा,पावसात अहोरात्र शेतात कष्ट उपसणारे आमचे वडिलधारे अंग दुखायला लागले की दवाखाण्यात न जाता सायंकाळी मोहाची एक पातरी घेतात,आणि सोबतीला आपट्याच्या पानाची विडी ओढून सकाळी ठणठणीत बरे होऊन पुन्हा कामाला जातात,थोडक्यात कवी आपल्या “पातरी” कवितेतून मानवी जीवनात आयुर्वेद किती महत्त्वाचे आहे,हे जगाला पटवून सांगतात..!
काय सांगू तुमाला
आमने डांगीने गोठी.
रहण्यात जिस्या भूकला
दपी रित्या पोटी.
तर..”मानी डांगी”या कवितेतून कवी आपल्या मायबोली डांगीचा मोठेपणा व्यक्त करतांना तमाम वाचक वर्गाला सांगतात की किती सांगू तुम्हाला माझ्या बोलीतील गोष्टी. पण..अजूनही लपून राहिल्यात भूके वाचून रिकाम्या पोटी. कवी अगदी अंतकरणात पासून आपल्या बोलीतील नवसाहित्यिकांना आव्हान करतात,कीआपल्या बोलीत मै्ाखिक कथा,कविता,गाणे असे लिहिण्या सारखं खुप काही आहे,ते आपण शब्दबध्द केलं पाहीजे,तरच आपली बोली जीवंत राहून समृध्द होईल..!
एकंदरीत कवी भावेश बागुल यांचा “पातरी” हा कवीतासंग्रह वाचतांना आदिवासी समाजाची जीवनशैली,आणि त्यांच्या जगण्यातील अगणित व्यथा आणि वेदनांमुळे काळीजदेठात घर करुन जातो,कवी भावेश बागुल यांच्या पुढील साहित्यकृतीस माझ्या खूप खूप शुभेच्छा..!

कवी काळूदास कनोजे
निसर्ग व आदिवासी संस्कृती अभ्यासक

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या