[masterslider id="2"]
लेख विशेष लेख संमिश्र वार्ता

‘आत्मघातकी हल्ल्यातील सूत्रधारांचा शोध घेणारी चित्तथरारक: ‘पुलवामा’

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

आत्मघातकी हल्ल्यातील सूत्रधारांचा शोध घेणारी चित्तथरारक: ‘पुलवामा’

डॉ.चंद्रशेखर भारती यांची ‘पुलवामा’ ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली. लेखक जनक्रांती साहित्य परिषदेचे अध्यक्ष, प्रज्ञाबोधी साहित्य अकादमीचे महासचिव व बहिणाबाई साहित्य परिषदेचे सचिव म्हणून काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत वेळूवन, जाणीव, अपरांत
तसेच प्रज्ञाबोधी अशा ०४ विशेषांकाचे संपादन केले आहे. त्यांनी जातीअंताचा संघर्ष (वैचारिक) , सिंधू संस्कृतीचे वारस (वैचारिक), बिरसा मुंडाचा विद्रोह(चरित्र), संघर्ष (लेखसंग्रह), प्रतिक्रांती (कादंबरी), गोदाकाठच्या कथा (कथासंग्रह), साळवेंचा वाडा (कादंबरी), धम्मरक्षिका (कादंबरी) आणि कुंजवारो (कादंबरी) अशा पुस्तकांचे लेखन केले असून आयुर्वेदाचार्य जीवक, गौतमीपूत्र सातकर्णी
व क्रांती जिंदाबाद (कविता संग्रह) ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. ‘स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाचे आधुनिक भारताच्या विकासात योगदान’ या विषयावरील संशोधन करून त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.वडिलांच्या समाजसेवेचा वारसा जतन करून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजसेवक काळूकाका दोधडे यांच्यासोबत लेखक डॉ. चंद्रशेखर भारती यांनी जवळपास १५ वर्ष सामाजिक कार्य केले आहे. समाजसेवा करीत असताना सामाजिक जाणिवा जोपासत साहित्य लेखनाद्वारे समाजप्रबोधन करण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहेत ही गौरवाची बाब आहे.
लेखक डॉ. चंद्रशेखर भारती यांची दहशतवादावर आधारित ‘पुलवामा’ ही कादंबरी नुकतीच संवेदना प्रकाशनामार्फत प्रकाशित करण्यात आली आहे.या कादंबरीची पृष्ठ संख्या २४० इतकी असून संतोष घोंगडे यांनी रेखाटलेले मुखपृष्ठावरील चित्र अत्यंत वास्तव व बोलके आहे. ही कादंबरी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू काश्मीर मधील पुलवामा २२ व्या तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे अर्थात सीमा सुरक्षा दलाचे ४० जवान शहीद झाले, त्या शहिदांना अर्पण केली आहे. कारण सदर कादंबरी याच विषयावर आधारित आहे ही बाब अधोरेखित करावी लागेल. केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीफ) च्या बावीसव्या तुकडीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची, या हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले होते. या घटनेमागील सुत्रधारांचा शोध घेणं हा कादंबरीचा मुख्य विषय आहे. मोजकी पात्र, आशयसूत्र, विस्तृत कथानक, साजेसे वातावरणनिर्मिती, प्रवाही व ओघवते निवेदन व साधी सोपी भाषाशैली आणि मराठी तसेच क्वचित ठिकाणी हिंदी अशा दोन्ही भाषेचा मेळ इत्यादी वैशिष्ट्यांचा विचार करता पुलवामा हल्याचा मागोवा घेण्यात व हल्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन गूढ उकलण्यात ही कादंबरी यशस्वी ठरली आहे. सध्याच्या दहशतवाद या ज्वलंत विषयाला अभिव्यक्तीचा विषय बनवून कल्पनेच्या पातळीवर रेखाटलेली कादंबरी वास्तवाच्या पातळीवर उतरावी इतकी प्रभावी ठरली आहे. या कादंबरीत परस्पर हितसंबंधांचं, सामाजिक नियम, संकेत, रीति, धर्मांधता, कर्मठता, हेवेदावे, गुप्त कारवाया, आदित्य टीमचे अचूक नियोजन व कठोर परिश्रम, हेरगिरी, देशद्रोह आदींचे चित्रण यात आले आहे. निरपराध जीव इच्छा नसतांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढले जातात व त्यातून निर्माण झालेली कौटुंबिक अस्थिरता, एकाकीपणा त्यातून वाट्याला आलेले भयाण जगणे यामध्ये जागून सामान्य माणसे किड्या मुंगीसारखं चिरडली जातात. काश्मिरात पुलवामा भागात दहशदवाद्यांकडून झालेल्या स्फोटकांच्या हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. हल्ली अणुबॉम्ब व जैविक युद्धावर भर दिला जात आहे. प्रयोगशाळेत निर्माण केलेल्या भयानक विषानूजन्य जैविक संशोधनामुळे देश एकमेकांचा काटा काढण्याच्या तयारीत आहेत परंतु सामान्य माणसाला याची तिळमात्र शंका पण नसते. यात मानवी जीवन अस्थिर व उध्वस्त करून सोडणं ही वाढती मानसिकता भयावह तितकीच अंगावर काटा आणणारी आहे. पुलवामा येथे दहशतवादी संघटनांद्वारा देशात चालणाऱ्या घातपाताच्या कारवाया, त्यासाठी उभारलेल्या गुप्त प्रयोगशाळा, गुप्तहेर संघटनांचं चाललेले कार्य, निरपराध लोकांना वाचवण्यासाठीची आदित्यच्या टीमने जीवावर उदार होऊन दिलेला निकराचा लढा आणि कादंबरीच्या शेवटी दहशतवादी हल्लेखोरांचा केलेला बिमोड इत्यादी बाबी कथानकाच्या माध्यमातून ओघवत्या व प्रवाही निवेदन शैलीत मांडण्याचा प्रयत्न कादंबरीकाराने केला आहे. आत्मघातकी हल्ल्या होणार असल्याची बातमी कळताच रॉमधील सर्व अधिकाऱ्यांना बोलवले जाते. त्यानुसार आदित्यच्या नेतृत्वाखाली प्रशिक, संजना आणि रफिक यांची टीम हल्लेखोरांच्या शोध मोहिमेला सुरुवात करतात. दरम्यान सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, सायबर गुन्हा तज्ज्ञ डॉ. प्रभाकर बर्वे यांच्या घरावर दोन चिनी दहशतवादी हल्ला करतात. त्यामध्ये सायबर संशोधनाचे काम करणाऱ्या डॉ. बर्वेंच्या दोन सहकारी इंजिनियरची हत्या होते. डॉ. बर्वें व त्यांचा ड्रायव्हर रणधीर चिनी हल्लेखोरांना ठार करतात. डॉ.बर्वें व रणधीर मारेकऱ्यांना चुकवण्यासाठी गोव्यात मित्राकडे जाऊन लपतात. या दरम्यान आदित्य, समीर, संजना इंदिरा गांधी विमानतळावर जाणाऱ्या कासीम नावाच्या दहशतवाद्याला पकडतात. तो श्रीनगरमधील दहशतवाद्यांना रसद पुरवणाऱ्या खलीलची माहिती देतो. नंतर त्वरित मुंबईकडे जाण्याचे आदेश टीमला येतात. इकडे डॉ. बर्वे यांच्या मुंबईच्या युरेका बंगल्यावरील हल्ल्याच्या बातम्या दाखविल्या जातात व आपल्या हातून मारल्या गेलेल्या चिनी हल्लेखोरांमुळे स्वतःला दोषी मानतात. मुंबई युरेका बंगल्यावरील हल्ल्याची प्राथमिक चौकशी करून आदित्य, संजना, प्रशिक आणि टीमचं श्रीनगर येथील ग्रीनव्हिला बंगल्यात थरारकपणे प्रवेश करतात. हे सर्व प्रसंग लेखक प्रभावीपणे कादंबरीच्या कथानकात मांडतो. यानंतर दहशतवाद्यांच्या कारवायांची मोठी साखळी आदित्यच्या टीमला सापडते. दहशतवाद्यांची ठिकाणे उध्वस्त करणारे प्रसंग वाचकांना खिळवून ठेवतात. रॉच्या टीमचं धाडसाने पाकिस्तानात जाणं, विषाणू तयार करण्याच्या गुप्त जागेत प्रवेश करणं, संजनाचा नातेवाईक असणाऱ्या संजय दुबे या पोलीस अधिकाऱ्याचे दहशतवाद्यांशी संबध असणं, संजनाचा घातपातात अपघात हे सर्व काल्पनिक पण थरारक प्रसंग वास्तवतेच्या पातळीवर उभे राहतील अशा पद्धतीने कादंबरीत रेखाटले आहेत. या कादंबरीत दहशतवाद्यांच्या कारवाया एका बाजूने तसेच आदित्य आणि संजनाच्या नाजूक व अव्यक्त प्रेमाचे भावबंध यांची गुंफण केली असून दहशतवादी कारवायांचा शोध घेता घेता दुसऱ्या बाजूने हळूहळू फुलणारी प्रेम कहाणी रोचकता निर्माण करते. दुसऱ्या बाजूने डॉ.बर्वेंना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी नामांकित वकील असलेल्या ड्रायव्हर रणधीर गायकवाड यांच्या विभक्त पत्नीची कायदेशीर मदत घेतात. या सल्ला मसलतीच्या दरम्यान त्या दोघांनाही पुन्हा विभक्त होऊनही एकत्र येण्याची ओढ निर्माण होते. वरील आदित्य-संजना व रणधीर व त्याची पत्नी यांचे प्रेमविषयक प्रसंग रेखाटत असतांना मूळ विषय आणि दहशतवादी कारवाया यांची तीव्रता कोठेही कमी होत नाही तर कादंबरीच्या पानोपानी दहशवादी कारवायांची प्रखरता आढळून आल्याशिवाय राहात नाही. आदित्य-संजना व रणधीर व त्याची पत्नी यांच्या प्रेमकहाणीमध्ये जास्त अडकून न पडता मूळ विषय अधिक सकसपणे रेखाटण्यात कादंबरीकार यशस्वी ठरला असून दहशतवादाचा बिमोड करणे व दहशतवाद मुक्त देश बनविणे हेच जीवितकार्य मानून कार्य करणारी आदित्य टीम ही कादंबरीतील ‘हिरो’ ठरते. ‘पुलवामा’ कादंबरीत लेखक अनेक भयकारी, रोमांचकारी प्रसंग रेखाटून वाचकाला खिळवून ठेवतो. सध्या देशात व जगात चाललेल्या धार्मिक उच्छाद व दहशतवादासारख्या गंभीर समस्येला कादंबरीचा विषय बनवून त्यांच्या कारवाया, गुप्त काट कारस्थाने लेखक डॉ.चंद्रशेखर भारती यांनी कादंबरीतून उघडकीस आणण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. पुलवामामध्ये झालेला आत्मघातकी दहशतवादी हल्ला देशाच्या अखंडतेवर घाला घालणारा हा भ्याड हल्ला होता. आजच्या घडीला कोणत्याही देशाला प्रत्यक्ष युद्ध अथवा अणूयुद्ध परवडणारे नसून गनिमी काव्याने सायबर हल्ला, जैविक हल्यायासारखे छुपे युद्ध प्रकार सुरु झाले आहेत. हा छुपा दहशतवादाचा भयाण चेहरा उग्र रूप धारण करीत आहे, हे चित्र भयभीत करणारे आहे. दहशतवादी हल्ले होतात तरी कसे? हे हल्ले होऊ नयेत याची गुप्तहेर संघटना कशी खबरदारी घेतात? हे दहशतवादी असतात तरी कोण? त्यांचा सूत्रधार कोण? हे न उमगलेले गूढ व गंभीर प्रश्न सामान्य माणसाला कळत नाहीत.म्हणूनच लेखकाने लेखकाने आपल्या सर्जनशील व संवेदनशीलवृत्तीने या सर्वाचा उलगडा ‘पुलवामा’ ह्या कादंबरीतून स्पष्ट करून दाखविला आहे.
हल्ल्यामागील सूत्रधारांना शोधण्याची कामगिरी, रॉ प्रमुख अनिलकुमार चाणाक्ष आणि धडाडीचे अधिकारी आदित्य आणि संजना यांच्या टीमवर सोपवतात. दहशतवादाचा शोध घेतांना त्यांना पाकिस्तान आणि चीन राबवू पाहत असलेल्या “सायबर थंडर”चा सुगावा लागतो. नंतर अनिश आणि आदित्य हे दहशतवादी कासिमला जीवंत पकडतात. त्याच्याकडून पुलवामा हल्ल्याचे धागेदोरे मिळतात आणि दहशवादी कारवायांची साखळी उघड होते. दहशतवाद्याकडून मिळालेल्या दस्ताऐवजात लिहिलेल्या सांकेतिक कोडचा अर्थ उलगडतो आणि ऑपरेशन सुरु होतं. पाकव्याप्त काश्मीरमधील जैविक प्रयोगशाळा व दहशतवादाची ठिकाणे यांचा शोध घेऊन ते उद्धवस्त करतात. कथानकाच्या शेवटी देशाचे शत्रू, देशद्रोही यांचा खात्मा करतात. दहशतवादाची हल्लेखारांचा सुरु झालेला शोध ते त्यांचा बिमोड करेपर्यंतचा प्रवास अनेक गूढ रहस्यांचा उलगडा करतो. शेवटी त्याचवेळी देशाच्या वीर, लढाऊ सैनिकांचे भावनिक व कौटुंबिक पातळीवरील जीवन यांचे अत्यंत मनोहारी चित्रण लेखकाने घडविले आहे.
एकूणच या कादंबरीचा विचार करता लेखकाला भौगोलिक, प्रादेशिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वातावरणाची उत्तम जाण व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे भान असल्याचे लक्षात येते.. दहशतवाद्यांची कोडींग-डिकोडींग पद्धतीचे चित्रण कादंबरीत येते. दहशतवाद्यांच्या सांकेतिक भाषेचा आदित्य व त्याच्या समूहाने अर्थ उलगडून त्याचा लावलेला छडा, गोपनीयता पाळून घटनेची केलेली रहस्यमय उकल व याद्वारे रॉ अधिकारी यांनी यशस्वीपणे पार पडलेले मिशन या सर्वच घटना, प्रसंग उत्कंठावर्धक ठरल्या आहेत, या सर्वांची रोमहर्षक, चित्तथरारक प्रसंगांची लक्षवेधक कहाणी ‘पुलवामा’ या कादंबरीत रेखाटलेली दिसते. दहशतवादी व आदित्य टीम यांच्यात झालेल्या चकमकीचे प्रसंग चित्रपट कथेसारख्या नजरेसमोरून पुढे सरकत जातात. प्रत्यक्ष ही कादंबरी वाचनातूनच वाचकाला याची प्रचिती अनुभवास येईल यात शंका नाही. देशात अनेक जाती, धर्म, आणि पंथांचे लोक आनंदाने राहतात. त्याच्यावरील संकटे दूर करून त्याच्या रक्षणासाठी भारतीय सैन्य सदैव तत्पर प्राणपणाने लढण्यास सक्षम आहे, याची जाणीव कादंबरीच्या शेवटी होते. ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल यात शंका नाही.डॉ.चंद्रशेखर भारती यांच्या पुढील लेखन कार्यास खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो.

 

© डॉ.मधुचंद्र भुसारे
कादंबरी : पुलवामा
लेखक : डॉ. चंद्रशेखर भारती
पृष्ठ संख्या : २४०
मूल्य : ₹३५०/-
प्रकाशक : संवेदना प्रकाशन, पुणे

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या