[masterslider id="2"]
अध्यात्मिक कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद क्रीडा जाहिरात ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने मुख्य बातमी राज्य राष्ट्रीय लेख विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हितगुज हेल्थ

चांदवडी रुपय्या २०२४ पुरस्कार जाहीर

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

डॉ. बाळासाहेब लबडे, काव्यवाणी काव्यमंच आणि रक्षिता नारी आधार बहुउद्देशीय संस्था यांनी केलेल्या कार्याचा सन्मान करण्याचा मानस चांदवडी रुपय्या साहित्य कलारसिक मंडळाने विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर केला आहे. या संस्था आणि व्यक्तींच्या कार्याची प्रेरणा समाजातील इतर घटकांनी घ्यावी, यासाठी या सन्मानाने त्यांच्या कार्याला नवी उर्जा मिळेल.

चांदवडी रुपय्या २०२४ पुरस्कार जाहीर

चांदवडी रुपय्या साहित्य कलारसिक मंडळ दरवर्षी समाजातील कार्यशील घटकांचा सन्मान करत असते. ‘चांदवडी रुपय्या’ मंडळाच्या वतीने दिले जाणारे यंदाचे पुरस्कार सचिव सागर जाधव जोपुळकर व अध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर जाहीर केले आहेत.

डॉ. बाळासाहेब मारूती लभडे

“चांदवडी रुपय्या वाङ्मय पुरस्कार” बाळासाहेब लबडे, गुहागर, जि. रत्नागिरी त्यांच्या ‘चिंबोरे युद्ध’ (कादंबरी) उत्कृष्ट साहित्यकलाकृतीसाठी, “चांदवडी रुपय्या साहित्य प्रेरणा पुरस्कार” काव्यवाणी काव्यमंच (पुणे) यांना महाराष्ट्रातील साहित्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या कार्यासाठी, “चांदवडी रुपय्या सामाजिक प्रेरणा पुरस्कार” रक्षिता नारी आधार बहुउद्देशीय संस्था, चांदवड यांना न्यायालयात जाणे पूर्वी कौटुंबिक वाद विवाद सामंजस्याने सोडविणे तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या उल्लेखनीय उपक्रमांसाठी देण्यात येणार आहेत.

पुरस्कारांचे स्वरूप स्मृतिचिन्ह व गौरवपत्र असे असणार आहे. पुरस्कार निवड समितीत रवींद्र देवरे, डॉ. राजेंद्र मलोसे, शीला पाटील, हर्षल गांगुर्डे, भागवत मांदळे, सविता दरेकर, संदीप गुजराथी, सोमनाथ पगार, जनार्दन देवरे, सुशीला संकलेचा आणि सविता दिवटे यांनी सहभाग घेतला.

या प्रसंगी वंदना गांगुर्डे, वैशाली शिंदे, वाल्मिक सोनवणे, बाळा पाडवी, डॉ. तुषार चांदवडकर, शिवराज पाटील, देव हिरे, अजित अहिरे, रुपाली घमंडी, शैलजा जाधव, शांताराम हांडगे, प्रफुल्ल सोनवणे, अमर ठोंबरे, हेमांगी बर्वे, सुदीप गुजराथी, प्रतिभा खैरनार, रितू जाधव, दिगंबर शेळके आणि रुपाली खैरणार यांनी पुरस्कारार्थीयांचे स्वागत व अभिनंदन केले.

पुरस्कारांचे वितरण दीपावली दरम्यान करण्यात येईल, असे चांदवडी रुपय्या मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब जाधव आणि सचिव सागर जाधव जोपुळकर यांनी जाहीर केले.

 काव्यवाणी काव्यमंच – नवोदितांसाठी प्रेरणेचे व्यासपीठ    ६ ऑगस्ट २०२२ रोजी पुण्यात काव्यवाणी काव्यमंचाची स्थापना करून साहित्यप्रेमींच्या चळवळीला नवा जोर मिळाला. वाणी ताकवणे आणि उपाध्यक्ष चैतन्य काळे यांच्या नेतृत्वाखाली या मंचाने नवोदित कवींना एकत्र आणले आणि खराडी येथे पहिली काव्यमैफिल रंगवून एक नव्या प्रवासाची सुरुवात झाली. या मंचाचा उद्देश केवळ कवी संमेलने आयोजित करणे नसून शालेय विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करणे, शिवार काव्यमैफिल राबवून ग्रामीण साहित्याला चालना देणे आणि अनाथ आश्रमात सामाजिक उपक्रम राबवणे यावर भर आहे. राज्यस्तरीय “काव्यवाणी युवा कवी” स्पर्धा हा या मंचाचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या मंचाने अनेक जिल्ह्यांत साहित्य संमेलने घेत नवोदित कवींना व्यासपीठ दिले आहे. त्यांची साहित्यिक चळवळ केवळ मंचावर मर्यादित राहिली नाही तर लोकोपयोगी उपक्रमही राबवले गेले, ज्यामुळे त्यांच्या कार्याचे समाजात मोठे कौतुक होते.

डॉ. बाळासाहेब मारूती लबडे – साहित्यिक परंपरेचे अध्वर्यू :     रत्नागिरीतील गुहागर या शांत किनारपट्टीवरून येणारे, पण त्यांच्या लेखणीने मराठी साहित्यविश्वावर गारूड घालणारे डॉ. बाळासाहेब लबडे हे नाव आज सर्वत्र ओळखले जाते. महाविद्यालयीन सेवेत २६ वर्षांपासून कार्यरत राहून, सांस्कृतिक विभागप्रमुख म्हणून २५ वर्षांहून अधिक काळ सेवा देत, त्यांनी शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. कादंबरी, कविता आणि समीक्षेच्या माध्यमातून त्यांनी प्रगल्भ आणि विचारशील साहित्यनिर्मिती केली आहे. त्यांच्या ‘चिंबोरे युद्ध,’ ‘महाद्वार,’ आणि ‘ब्लाटेंटिया’ यांसारख्या साहित्यकृतींनी राज्यभरात लोकप्रियता मिळवली. लभडेंच्या साहित्याला मिळालेले पुरस्कार हे त्यांच्या साहित्यिक मूल्याची साक्ष देतात. कुसुमाग्रज काव्यपुरस्कार, राजे शहाजी साहित्य गौरव पुरस्कार, पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार हे केवळ काही ठळक पुरस्कार आहेत. डॉ. लबडे यांची कादंबरी ‘पिपिलिका मुक्तिधाम’ ही सामाजिक सत्याच्या शोधावर आधारित असून, तिला राजाराम गायकवाड उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार आणि अण्णाभाऊ साठे कादंबरी पुरस्कार मिळाला आहे. मराठी साहित्याच्या माध्यमातून त्यांनी एक नवी दृष्टी दिली आहे. त्यांची साहित्यनिर्मिती प्रगल्भ विचारांचे आणि सामाजिक जाणिवांचे उत्तम प्रतिबिंब आहे.

रक्षिता नारी आधार बहुउद्देशीय संस्था – स्त्रीसक्षमीकरणाची नवी दिशा :    रक्षिता नारी आधार बहुउद्देशीय संस्था, चांदवड ही संस्था महिलांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत आणि कौटुंबिक वाद सामंजस्याने सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत आहे. ही संस्था Pre-Litigation उपक्रमांतर्गत वाद न्यायालयात जाण्याआधी सोडवून अनेक घरांमध्ये शांतता प्रस्थापित करते. संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तालुकास्तरीय स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. विचारमंथनासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देत, महिला सक्षमीकरणाला नवा आयाम मिळवून देण्यात रक्षिता नारी संस्थेचा मोठा वाटा आहे. संस्थेने अनाथाश्रम, सामाजिक संस्थांमध्ये उपक्रम राबवून आपुलकीची छाप पाडली आहे. निःपक्ष संस्थेच्या रूपात या संस्थेने लोकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण केली आहे. विविध कलात्मक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ही संस्था चांदवड परिसरातील एक प्रेरणादायी शक्ती ठरली आहे.

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या