बकुळ… ( कथा ) लेखिका प्रतिभा खैरनार
एक आलीशान गाडी लाल मातीचा धुराळा उडवत गावाच्या वेशीतून आत शिरली. गावामधून पडक्या महादेवाच्या मंदिराच्या रस्त्याला गाडी लागली. मंदिराच्या जवळ आल्यावर सुलभाने डायव्हर ला गाडी थांबवण्याचा इशारा केला.
प्रत्येक वेळी महादेवाच्या मंदिराजवळ गाडी थांबते मग तासाभरात गाडी देशमुखांच्या हवेली कडे वळते, हे माहित असूनही गाडी आज जरा पुढे आली ही चूक डायव्हर च्या लक्षात आली. त्याने गाडीतून पटकन उतरून, गाडीचं दार उघडलं. दिमाखातच सुलभा गाडीतून उतरली. डायव्हर ला तिथेच थांबायला सांगून ती मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याऐवजी नेहमीप्रमाणे ती मंदिराच्या पाठिमागे गेली. बकुळीचं झाड तिची वाटच पहात होतं. त्यांच्या प्रेमाची साक्ष होतं हे बकुळ… बकुळाच्या झाडाला सभोवार चौथरा केलेला होता. त्यावर बकुळाच्या फुलांची चादरच अंथरलेली होती. फुलानां लांबसडक वेणीत माळता माळता तिला अश्रूंचा बांध अनावर झाला . गालावरून ओघळणारे अश्रू पाहून तिला विश्वास सोबत याच बकुळेखाली पावसात भिजतानां तिच्या मानेवर ओघळणारा पावसाचा थेंब आठवला त्याने तो अलगद टिपला होता ओठांनी. तो क्षण आठवला अन् भर उन्हात ही तिच्या अंगावर शहारा आला .
कथा संग्रह " बाभूळफुलं " बुक करण्यासाठी क्लिक करा https://imjo.in/FcD3AY
तिच्या मांडीवर डोकं ठेवून विश्वास म्हणायचा “सुलभा तुझे डोळे सागरासारखे आहेत, पापणीची प्रत्येक लाट मला त्यात सामावून घ्यायला पहाते” अन् सुलभा ही लाजेची परिसीमा ओलांडत तिचे ओठ विश्वास च्या कपाळावर टेकवायची . विश्वास च्या आठवणी डोळ्यापुढे थैमान घालू लागल्या.
देशमुखांच्या हवेलीत तो पहिल्यांदा आला तेव्हा त्यांची कावरीबावरी नजर हवेलीचा कानाकोपरा न्याहाळत होती. हवेलीचं ऐश्वर्य डोळ्यात साठवण्याचा निरागस प्रयत्न तो करत होता . सुलभा च्या पैजणांच्या आवाजानं तो भानावर आला. वीज चमकावी तशी सुलभा त्याच्या डोळ्यात भरली. कमनीय बांधा, गुलाब पाकळ्या सारखे ओठ, गालावर गुलमोहराची लाली, गव्ह्याळ्या रंगाची सुलभा जितकी निरागस तितकीच मादक दिसत होती.
“तू कासूचा पोरगा ना” आबा साहेबांनी चिलीम भरता भरता विश्वास कडे तिरप्या नजरेनं पहात विचारलं. “हो आबासाहेब, कालच आलो शहरातून. शिक्षण पूर्ण झालं . शहरात पाहिजे तेवढ्या नोकऱ्या पण दादा बोलले की आपला जन्म फक्त हवेली साठीच” असे म्हणता म्हणता विश्वास आबांच्या पायावर लवता झाला. एखाद्या रोगी व्यक्ती चा स्पर्श व्हावा तसा आबाने झरकन पाय मागे घेतले. शिक्षणामुळे सभ्यतेचे मुखवटे जरी घातले तरी पण स्पृश्य अस्पृश्यते ची वाळवी ही रक्तालाच लागलेली असते.
“सुलभा ये इकडे” हरणीच्या चालीत सुलभा आबांच्या चोपळ्या जवळ आली. “हा विश्वास उद्यापासून आपल्या कडे लिखापडीच काम बघेल, तू त्याला मागचा सगळा हिशोब दाखव”आबासाहेबांचं बोलण अर्धवट ऐकत सुलभाने विश्वास वर एक नजर टाकली. सावळ्या रंगाचा पण नाकेडोळे तरतरीत असा मुलगा हाताची घडी घालून, नजर जमिनीवर खेळवत उभा होता.
दुसऱ्या दिवशी वेळेच्या आधीच विश्वास हवेलीत हजर झाला. सुलभाने त्याच्या साठी हवेलीतच एका कोपऱ्यात टेबल खुर्ची टाकली. ओंजळीत आणलेली बकुळेची फुलं त्याने टेबलावर ठेवली. “मला बकुळीचे फुले फार आवडतात, कुठून आणलेत तुम्ही” सुलभाने फुलांकडे पाहून विचारले.
“महादेवाचं दर्शन घेता घेता दिसली , मग आलो घेऊन. तुम्हाला आवडतील तर रोज आणेल ” तिच्या काळ्याभोर डोळ्यात पहात विश्वास हसतच बोलला. सुलभाने जुन्या चोपड्या आणुन टेबलावर ठेवल्या. दोघांचं ही काम चालू झालं. आईसाहेब मध्ये मध्ये त्यांच्यावर नजर टाकत होत्या.
जेव्हा जेव्हा सुलभाला हवेली बाहेर जाण्याची बंधन घातली जायची तेव्हा आईसाहेब सुलभाला म्हणायच्या “सुलभा तारुण्य हे धगधगत्या चुलीवर ठेवलेल्या दुधासारखं असतं ग. केव्हा ऊतू जाईल सांगता येत नाही म्हणून जपावं लागत, ध्यान ठेवावं लागतं” तेव्हा सुलभाला स्त्री असल्याचं विलक्षण दुःख व्हायचं.
विश्वास आता रोजच बकुळीची फुलं घेऊन यायला लागला. त्या फुलांमुळे अन् विश्वास च्या हसत खेळत स्वभावामुळे हवेलीत नवचैतन्य पसरलं होतं. आबासाहेबांचा वचक दरारा होताच पण कधीतरी त्यांची नजर चुकवून हवेलीतल्या माणसांसोबत हवेली ही हसायला लागली होती . सुलभा आणि विश्वासचं नात ही मैत्री आणि प्रेमाच्या उंबरठ्यावर उभं होतं .
आज विश्वास ला यायला वेळच झाला होता. सुलभा वाटच पहात होती. विश्वास दिसताच पुढे आली “आता या बकुळाच्या फुलांची सवय झालीय विश्वास, करमत नाही त्यांच्या शिवाय….बोलत बोलत सुलभाने विश्वासच्या ओंजळीतील फुले घेतली.
“सवय फक्त फुलांची झाली की फुलं आणणाऱ्या माणसाची ही” विश्वास ने तिच्या डोळ्यातली आर्तता ओळखली होती. तेव्हा सुलभाच्या मनावर कैक शहारे आले. सुलभाला ही मनाची अवस्था कळत होती पण ती मान्य करायला तयार नव्हती.
“विश्वास मला बकुळीचं झाड दाखवायला नेणार होतास तू” सुलभाला विश्वास चा सहवास हवाहवासा वाटू लागला म्हणून कारणच शोधत होती ती. पण “आबासाहेब आणि आईसाहेब” विश्वासने भीतीपोटी विचारले. “ते मामा साहेबांकडे गेले आहेत, सायंकाळीच येतील” सुलभा पटकन बोलली. आज किती तरी दिवसांनी सुलभा हवेली बाहेर पडली. सुलभा आणि विश्वासने मंदिरात महादेवाचं दर्शन घेतलं, तसचं मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या बकुळेकडे निघाले. आभाळासारखीच अन् दोघांची मन ही भरून आले होते. पौर्णिमेच्या रात्री लखलखणाऱ्या चांदण्या अंगावर पांघरूण आभाळानं सजावं तसा बकुळ पांधऱ्या शुभ्र फुलांनी सजला होता. पावसाची रिपरिप चालू झाली. पावसाच्या थेंबासोबतच बकुळाची फुलं ही सुलभावर उधळण करत होते. ओल्या साडीत सुलभा अजूनच मोहक दिसु लागली. विश्वासची पापणी ही लवत नव्हती. त्यांची नजर प्रत्येक थेंबासोबत तिच्या देहावर वावरत होती. तिच्या नजरेने त्याच्या नजरेला बांधून ठेवलं. देहानं देहाला एकमेकांत समर्पित केले. भावना उचंबळून आल्या की तिथं शब्दांना थारा नसतो .
तेवढ्यात वेड्या रमी च्या खुळ्या हसण्याच्या आवाजानं दोघे भानावर आले. फाटलेला परकर त्यावर मळकटलेलं पोलकं वेड्या बाभळी सारखे अस्ताव्यस्त केस. तिला पाहून सुलभा घाबरली अन् विश्वास च्या मिठीत शिरली.
“अगं सुलभा ही रमा आहे आपल्या गावातलीच आहे, घाबरू नको तिला, काही करणार नाही ती” विश्वास ने सुलभाला धीर देत सुलभाला हळूवार दूर केलं.
“वेडे तर सगळेच असतात सुलभा, आपण प्रेमात, आबासाहेब अहंपणात, आईसाहेब हवेलीच्या इज्जतीच्या काळजीत, अन् माझे दादा इमानदारीत पण आपण फक्त रमीला वेडं म्हणतोय” विश्वास असा बोलला की तो समुद्राहुन खोल वाटायचा सुलभाला आणि हसायला हसवायला लागला की ओंजळीत घेतलेल्या पाण्यासारखा वाटायचा…
दिवसांमागून दिवस चालले तश्या बकुळीच्या झाडाखाली आबासाहेबांची नजर चुकवून, सुलभा अन् विश्वास च्या भेटी वाढू लागल्या. प्रेमाला अपेक्षांच्या कुबड्या मिळाल्या की ते लाचार होतं…भेटीच्या अपेक्षा ह्या दोन्ही देहाच्याच मागण्या..त्यापुढे मग प्रेम लाचारच..
बकुळीचं झाड ही बांशिग बांधलेल्या नवरी सारखं त्यांची वाट पहायचं.
आता बकुळीचे फुलं टेबलाऐवजी सुलभा च्या केसात दिसायला लागली. आई साहेबांच्या ते लक्षात आलं. दिवे लागणीची वेळ झाली. सुलभा देवघरात आली, दिव्यात तेल घातलं, ज्योत पेटवली, हवेने दिवा विझायला लागला तेव्हढ्यात आई साहेबांनी दोन्ही हातांचा आडोसा त्याला दिला.
“सुलभा प्रत्येक परिस्थितीत स्वतः ला सावरता यायला हवं, या दिव्यासारखं परावलंबी असू नये माणसानं. वेळीच सावध व्हायला शिकावं ” आईसाहेबचा सांगण्याचा मतितार्थ सुलभाला कळला . ती खाली मान घालून देवघरा बाहेर पडली.
आज महादेवाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गावाने सभा भरवली होती. त्यात आबासाहेबांनां आमंत्रित केले होते. गावाकऱ्यांमध्ये सुलभा आणि विश्वास बद्दल कुजबुज चालू झाली होती . सभा संपल्यावर गाडीचा डायव्हर रामाने आबा साहेबांच्या कानावर जरा चाचरत चाचरत ही गोष्ट टाकली. ते ऐकून आबांचा चेहरा लालबुंद झाला. एखाद्या झोपलेल्या वाघाला जाग करावं तसे आबासाहेब चवताळले. त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता शेजारच्या गावातील इनामदारांना फोन लावला. त्यांचा मुलगा समिर यांने सुलभाला हवेलीत बघीतले होते तेव्हाच त्याने आबासाहेबांजवळ सुलभाचा हात मागितला होता. पण आबासाहेब त्याला तेव्हा काही बोलले नव्हते . आज आबासाहेबांनी त्यांना होकार कळवला. आणि तीन दिवसात साध्या पध्दतीने लग्न करून टाकू म्हणून सांगितले, ते ही तयार झाले.
आबासाहेब हवेलीत आले आणि येताच त्यांना विश्वास दिसला. याच मिनिटाला विश्वास चा गळा दाबावा असं वाटलं आबासाहेबांना…
“विश्वास आता तू नाही आला तरी चालेल, काम बऱ्यापैकी आटोपले असेल” आबासाहेब शांतपणे बोलत होते पण त्यांच्या डोळ्यातली आग कमी होत नव्हती.
“अजून आंब्याच्या बागांचा हिशोब बाकी आहे आबासाहेब असे मध्येच काम बंद का करायला लावताय” विश्वास ने आबांना आश्चर्याने विचारले.
“ते आमचं आम्ही बघून घेऊ ” आबा गरजले. तसा विश्वास मागे सरकला आणि मान खाली घालून हवेलीच्या बाहेर पडला. सुलभा आणि आईसाहेब हे सगळं पहात होत्या. विश्वास दिसेनासा होईपर्यंत सुलभा त्याच्या कडे पहात होती. अश्रूनां बांध घालत सुलभा आबासाहेबां समोर उभी होती. प्रश्न विचारण्याची हिम्मत नव्हती पण तरीही तिला उत्तर हवं होतं.
“तुमचं लग्न ठरवलयं आम्ही आणि दोन दिवसात सर्व उरकायचयं, उद्या साखरपुडा आणि परवा लग्न” आबासाहेब सुलभाला भारदस्त आवाजात सांगत होते.
“मला न विचारता” सुलभाने आवंढा गिळत विचारले.
कथा संग्रह " बाभूळफुलं " बुक करण्यासाठी क्लिक करा https://imjo.in/FcD3AY![]()
“ती आपल्या घराण्याची पध्दत नाही, आणि या लग्नात अडचणी आल्या तर विश्वास च्या संपूर्ण कुटुंबाला जीव गमवावा लागेल” धमकी युक्त शब्दांत आबासाहेबांनी सुलभाला लग्नासाठी बोहल्यावर उभं केलं. सुलभाचं लग्न होतय हे विश्वासला कळाल्यावर त्याने बऱ्याच वेळा सुलभाला भेटण्याचा प्रयत्न केला पण हवेलीतल्या नोकरांना आबासाहेबांनी सक्त ताकीद दिली होती. विश्वास येथे दिसायला नको म्हणून…
जीव नसलेल्या मुर्ती सारखी सुलभा मंडपात उभी होती. तिची पाठवणी करतांना आईसाहेबांच्या डोळ्यात आसवांनां पूर आला होता.
“सुलभा स्त्री ही नदी सारखीच असते गं, तिने कितीही सुंदर वाटा निवडल्या तरी तिला एक दिवस खाऱ्या सागरातच एकरूप व्हावं लागतं ” सुलभाला आता आई साहेबांच्या बोलण्याचा काडीमात्र फरक पडत नव्हता. तिच्या डोळ्यात एक अश्रू ही नव्हता, समिरने तिला रथात बसवले . वाटेवरच तिला महादेवाच्या मंदिरामागचा बकुळ दिसला . विश्वास तिथे धायमोकलुन रडत होता. तिला हुंदका अनावर झाला. “मला तुला गमवायचं नाही विश्वास, तू माझ्या जवळ जरी नसलास तरी तू सुखरूप राहशील,हेच माझ्या साठी खूप आहे, मला माफ कर” सुलभा मनातल्या मनात विश्वासची माफी मागत होती.
“मी तुला कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही सुलभा” समिरला वाटलं हवेली आबासाहेब आईसाहेबानां सोडण्याचं दुःख होतयं सुलभाला, म्हणून तो तिला जवळ घेत समजावण्याचा प्रयत्न करत होता.
“समिर देहावर जरी तू आज तुझं नाव कुंकवानं लिहिलं असेल तरी मनाच्या भांगात निरंतर विश्वासचंच नाव असेल” सुलभा मनातच विव्हळत होती.
त्यानंतर बऱ्याच वेळा सुलभा माहेरी आली. गावात विश्वास बद्दल चौकशी केली. सुलभा च्या लग्नानंतर विश्वास कोणालाही दिसला नव्हता. विश्वासच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला होता. सुलभा सासरवरून आली की हवेलीत जाण्याआधी बकुळेखाली बसायची. किती तरी आठवणी गोंजारत..
आज किती वर्षे झाली सुलभा च्या लग्नाला पण तरीही बकुळ तसाच उभा होता. फुलं मात्र सुकलेली वाटायची, तो ताजेपणा नव्हता त्यांच्यात. सुलभा बकुळीचा निरोप घेऊन एका हाताने अश्रू पुसत निघायच्या बेतात होती तेव्हढ्यात तिथे वेडी रमी आली, सुलभाने खूप वर्षांनी बघीतलं तिला. पण यावेळी सुलभा घाबरली नाही .
“विश्वास बरोबर बोलायचा बघ, मी प्रेमात वेडी आणि तू…. दाटलेल्या हुंदक्यामुळे सुलभाचे शब्द अडखळले.
रमीने सुलभाचा हात धरला आणि ओढत ओढतच एका मातीच्या ढिगाऱ्याजवळ घेऊन गेली. मातीच्या ढिगाऱ्यावर हात आदळत ती “विश्वास विश्वास” म्हणून ओरडू लागली.
सुलभा ला थोडा वेळ काही कळालं नाही. पण रमा व्याकुळतेने सुलभा ला विश्वास बद्दल काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. “काय म्हणतेय रमा तू , विश्वास या मातीखाली ” सुलभा घाबरी होत रमाला विचारू लागली.
आणि रमाला वाचा फुटली “विश्वास ला आबासाहेबांच्या गड्यांनी मारून टाकलं अन् इथे गाडलं” रमा रडून रडून सांगू लागली. हे ऐकून सुलभाला धक्का बसला. तिचा बराच वेळ रमा वर विश्वास बसेना. पण रमाने तिच्या फाटक्या पिशवीतून विश्वास च घड्याळ काढलं, जे मंदिराच्या मागे विश्वास ला मारतांना त्यांच्या हातातून पडलं होतं. ते पाहून सुलभा ने हंबरडा फोडला . मातीचा ढिगारा अश्रूंनी ओलाचिंब झाला, मातीच्या ढिगाऱ्यावरच रडता रडता सुलभा च्या हुंदक्यांचा आवाज एकदम बंद झाला. सगळीकडे निरव शांतता पसरली.
“ऐ ऊठ ना सुलभा सुलभा” रमा सुलभाला हलवुन उठवत होती… पण सुलभा देह सोडून केव्हाच निघाली होती विश्वास च्या भेटीला….मनाच्या ओंजळीत बकुळेची फुलं घेऊन….
प्रतिभा खैरनार



बकुळ पुस्तक
बकुळ पुस्तक मागणी