[masterslider id="2"]
विशेष लेख स्थानिक बातम्या

स्त्रीवाद व सत्तापिपासू राजकारणाविषयी अभिव्यक्त होऊन परिवर्तनवादी विचार व वैचारिक चळवळीशी बांधीलकी जोपासणारी कविता: ‘बाई आणि लोकशाही’

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

स्त्रीवाद व सत्तापिपासू राजकारणाविषयी अभिव्यक्त होऊन परिवर्तनवादी विचार व वैचारिक चळवळीशी बांधीलकी जोपासणारी कविता: ‘बाई आणि लोकशाही’

कविवर्य रामदास गिळंदे यांचा ‘बाई आणि लोकशाही’ हा पहिलाच कवितासंग्रह मेधा पब्लिशिंग हाऊस, अमरावती या प्रकाशनातर्फे ०९ ऑगस्ट, २०२१ रोजी प्रकाशित झाला. त्यांचे याआधी ‘विद्यापीठ अभ्यासक्रमातील आदिवासी साहित्य’ हे संपादित पुस्तक देखील प्रकाशित आहे. ‘बाई आणि लोकशाही’ हा त्यांचा कवितासंग्रह फडकी मासिक आणि फडकी परिवारातील मित्रमंडळी यांना समर्पित केला असून या कवितासंग्रहामध्ये एकूण ३५ कवितांचा समावेश आहे. मुखपृष्ठावरील चित्र पुरुषी मनोवृत्तीतून साकारलेल्या राजकीय व्यवस्थेत धूसर झालेल्या आदिवासी स्त्रीवादी विचारसरणीचे प्रतिक म्हणून सुस्पष्ट व अर्थपूर्ण असे उतरले आहे. या कवितासंग्रहाला सुप्रसिद्ध आदिवासी साहित्यिक अभ्यासक व कविवर्य डॉ.संजय लोहकरे यांची अभ्यासपूर्ण दीर्घ प्रस्तावना लाभली आहे. कवितासंग्रहाची भूमिका या प्रस्तावनेमधून अभ्यासायला मिळते, ही महत्वपूर्ण बाब या अनुषंगाने नमूद करावीशी वाटते.
कवी आपल्या कवितांमधून कधी आदिवासी स्त्रियांचा स्रीवाद, आदिवासी स्त्रियांच्या जगण्यातील विरोधाभास, स्त्रियांची दुःख, स्वप्न, आदिवासी संस्कृती आणि शहरी संस्कृती यांच्या जगण्यातील विविधांगी संकल्पना, आदिवासी बाईची लोकशाहीशी केलेली तुलना व साम्यभेद इत्यादी बाबी आढळतात. ‘जख्मा अजूनच खोल होत जाणं’ या कवितेतून आदिवासी स्रिया पुरुषी वर्चस्वाखाली परंपरेने जीवन जगत आल्या आहेत.घर बदलले, पोरं मोठी झाली तरीही आदिवासी स्रीच्या जखमा कधी पूर्णपणे भरल्या नाहीत.शेवटी कवीची आई म्हणते,
जातांना आई
एवढच म्हणाली
तुझ्या शहरात
बाईच्या डोईवरचा हंडा कड्यावर आला
जात्यातलं पीठ गिरणीत गेलं
पण
बाईचं बाईपण सुटलं काय रे? (पृ.क्र.३०-३१)
कवीची कविता व त्यातील आदिवासी बाईच्या वेदना व दु:ख जगातील साऱ्या स्रियांच्या दु:खाशी साम्यता दर्शवितात.जग कितीही सुधारले तरीही स्रियांची वेदना व प्रश्न न सुटणारे आहेत, हे सत्य या कवितेतून प्रतिबिंबित झाले आहे.घर व कुटुंबात अडकलेली स्री पासून ते विविध क्षेत्रात वावरणाऱ्या स्रियांची विविध रूपे चित्रित झाली आहेत.म्हणून कवी म्हणतो,

 

पण आजही आमच्यात

स्वयंपाक घर, वंशवृद्धी, बदन

आणि बिछाना यात मात्र

साम्य आहे.(पृ.क्र.३६)

 

‘बाई आणि लोकशाही’ या कवितेत बाईला बाईपण सिद्ध करण्यासाठी आई बनावे लागते, वंश वाढवावा लागतो त्यासाठी जीवघेण्या वेणा सोसाव्या लागतात आणि सहनशीलतेचा अंत झाल्यावर तीचं सीझर करावे लागते त्याचप्रमाणे लोकशाहीलाही तिचं स्वत्व सिद्ध करावे लागते त्यासाठी ती समता, बंधुता, समानता, एकता रुजविते.या लोकशाहीला मात्र आज वेणा सोसाव्या लागत आहेत.म्हणूनच कवी म्हणतो,
मग
प्रसूती वेणा जीवावर
उठल्यावर
जशी बाईची करतात
सीझर
तशी
लोकशाहीचीही करावी लागेल का ?
सीझर ? (पृ.क्र.३८-३९)

लोकशाही नष्ट करण्यासाठी तिच्या मूळावर उठलेले मारेकरी व लोकशाही धोक्यात असल्याची जाणीव कवी यातून करून देतांना दिसतो.
‘अनधिकृत माहिती’ या कवितेमध्ये अनधिकृत, खोट्या माहितीच्या आधारे विशिष्ट समाजाच्या वाढत्या लोकसंख्येच्या खोट्या आरोपांमुळे समाजाचा विकास खुंटविण्याचे छडयंत्र कसे सुरु आहे? याची भयाण वास्तविकता कवितेतून मांडली आहे.कवी म्हणतो,
दलितांच्या प्रतीकांना
आपलंसं करून त्यांच्याशी
भावाचं नातं जोडलं.
आदिवासींना तर ते
गृहितच धरतात.
त्यांचं अजून शारीरिक
कुपोषणच दूर होत नाही
मग वैचारिक कुपोषण तर दूरच…..(पृ.४७)
सत्ता काबीज करणे त्यानंतर मनमानी कारभार करणे, आपली संस्कृती दुसऱ्यांवर लादणे, त्यासाठी पोसलेली बिनभाड्याची पिलावळ कामाला लावणे, त्यांच्याच माध्यमातून हुकूमशाहीचे बीज रुजविणे ही कामे राजरोसपणे सुरू आहेत. एका बाजूने दलित समाजाला आपलंसं करून, आदिवासींना गृहीत धरून सर्वांचेच राजरोसपणे वैचारिक कुपोषण करणारी राजकीय फळी निर्माण होत असल्याचे देखील चित्र स्पष्ट उभे केले असून हे चित्र बदलण्यासाठी येणाऱ्या काळात आदिवासी समाजाने तत्पर व सावध राहण्याचा इशारा देखील कवी देतो.‘पण आम्हाला युद्ध हवे आहे’ ही कविता पुलवामा हल्ल्याचे वास्तव व त्यामागील छुप्या राजकारणाच्या पार्श्वभूमीचे चित्र रेखाटू पाहते. हल्ली हत्या झाल्यानंतर निषेध केला जातो परंतु ठोस कृती व अंमलबजावणी करणे या बाबी व्हायला पाहिजे तशा होत नाहीत याची खंत कवी व्यक्त करतो.धर्म, राष्ट्रवाद याविषयी तरुणांच्या मनात विष पेरून राजकीय सत्ता प्राप्त करून स्वार्थाची पोळी भाजण्यात राजकीय व्यवस्था मग्न आहे. युद्ध हा लूटपुटूचा खेळ नाही तर यातून हिंसा,द्वेष, शांतता भंग आणि परिणामी विनाश अटळ असल्याचेही कवी सांगायला विसरत नाही. हिंसेच्या दूरगामी परिणामांचे दर्शन कवी घडवतो. शांततेच्या मार्गाने जगणाऱ्या घटकांना देशद्रोही ठरविण्याची वेळ येऊ शकते, असा सावधानतेचाही इशारा कवी देतो. ‘जीर्णोद्धार’ या छोट्या कवितेतून मोठा आशय कवीने व्यक्त केला आहे. जगभरात देवळांची, जाती-जमातीचे, धर्माचे, संस्कृतीचेही जीर्णोद्धार होतात परंतु माणसातल्या माणुसकीचा जिर्णोद्धार होत नसल्याची खंत कवी व्यक्त करतो. ‘अणुरेणू’ या कवितेत कवी म्हणतो,

‘तुम्ही ठोकशाही आल्याचा

जल्लोष करा.

आम्ही लोकशाही गेल्याचे

सुतक पाळतो. (पृष्ठ क्र.५८)

 

मानवी हक्कांना, स्वातंत्र्याला मुक्त जगू देणारी लोकशाही नष्ट होऊन हुकूमशाही प्रस्थापित होत आहे, याचे कोणाला दुःख नाही तर त्याचा उत्सव साजरा केला जात आहे. माणुसकीच्या दृष्टीने ही योग्य बाब नाही म्हणूनच कवी लोकशाही गेल्याचे सुतक पाळतो.आदिवासी माणसांना रानमेवा विकून आपले पोट भरण्याइतपत स्वायत्त असलेले अर्थकारण कळते. आजपर्यंत आदिवासी माणसे आपले अस्तित्व हजारो वर्षांपासून टिकून ठेवत आहेत परंतु आज मात्र आपल्या नीती-अनितीला बाजूला सारून खरेदी विक्री, नफा तोट्याची गणिते स्वार्थी माणसे मांडू पाहतात, ही भयानक बाब आहे. कवी म्हणतो,

 

‘आमच्या डोळ्यादेखत

एकेक वस्त्र उतरवलं गेलं तिचं

आणि आज

आम्ही रिसर्च करून जोडू पाहतोय तिच्या वस्त्राचे तुकडे’ (पृष्ठ क्र.६४)

 

आपल्या डोळ्यादेखत आदिवासी संस्कृतीचे विद्रुपीकरण होताना आपण पाहतो आहोत. म्हणूनच आज तिच्या संस्कृतीच्या तुकड्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी संशोधन करावे लागते ही गंभीर तितकीच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. ‘आदिवासी आश्रमशाळातील ती किळसवाणी मुले’ या कवितेत कवी म्हणतो,
‘मरायलाच पाहिजे
आदिवासी आश्रमशाळांतील
ती किळसवाणी मुले.
उद्या तीच शिक्षण
घेऊन मोठी झाली तर
आदिवासी अस्मितेचे भांडवल
करून सरकार विरुद्ध बंड करतील.( पृष्ठ क्र.६५-६६)

या कवितेत कवीने आदिवासी आश्रमशाळेतील भ्रष्ट कारभाराचे किळसवाणे चित्र रेखाटले आहे. आदिवासी आश्रमशाळामध्ये शिकणाऱ्या आदिवासींच्या मुलांमधून शिकलेली पिढी तयार होऊन त्यांच्यात अस्मिता निर्माण झाल्यास आपणाविरुद्ध ती बंड करून उठतील.‘अँबोरिजनल’ या कवितेत आदिवासी क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलेले योगदान महत्वपूर्ण असून त्याची इतिहासात कधीही नोंद झाली नाही. परंतु पाना-पानांमधून तथाकथित क्रांतिकारकांच्या इतिहासाची पाने रंगवलेली दिसतात. आदिवासींची निष्ठा, स्वातंत्र्य, भक्ती, संघर्ष, इतिहास हा पाशवी व्यवस्थेने चिरडून टाकला परंतु ही व्यवस्था आदिवासी माणसांना कधीही गुलाम बनवू शकली नाही. म्हणून कवी म्हणतो,
हिरावून घेतला गेला
जागतिक अदिमांना
मिळणारा मूलभूत अधिकार
अन
नाकारलं गेलं त्यांचं
अँबोरिजनलपण ( पृ.क्र.७३)
आदिवासींची संस्कृती, त्यांचे अस्तित्व व आदिवासीपण नाकारण्याचा प्रयत्न इथल्या भ्रष्ट, निर्लज्ज संस्कृतीने केले आहे. आदिवासी संस्कृती आणि जनजीवनावर आधारित आयोजित निरर्थक व फालतू काथ्याकोट करणाऱ्या चर्चासत्रांवर कवीने ताशेरे ओढले आहेत.
थोडक्यात, कवी प्रस्थापित व्यवस्थेविरोधात तसेच राजकीय व्यवस्थेविरोधात परखडपणे भाष्य करतो व निर्माण होऊ पाहणाऱ्या हुकूमशाहीला आव्हान करतो. कवी रामदास गिलंदे यांच्या कविता नवपरिवर्तनवादी विचारसरणी घेऊन लिहिणाऱ्या कवींच्या भूमिकांशी साम्य दर्शवितात. स्त्रीवाद व राजकारण या दोन बाबी केंद्रस्थानी ठेवून अत्यंत निर्भीडपणे अभिव्यक्त होतात. धार्मिक कट्टरवाद, राष्ट्रवाद, भ्रष्ट राजकारण याच्यावर ताशेरे ओढतात. प्रस्थापित व्यवस्थेने कलावंत, विचारवंत, शहीद जवानांचे कुटुंब यांच्याशी चालवलेला भावनिक खेळ चव्हाट्यावर आणला आहे. कवी रामदास गिळंदे यांची कविता सामाजिक, राजकीय तसेच राष्ट्रीय प्रश्नांना देखील हात घालून सामाजिक भूमिका घेऊन अभिव्यक्त व्हायला मागेपुढे पाहत नाही. म्हणून ती खऱ्या अर्थाने सामाजिक व वैचारिक चळवळीशी बांधीलकीचे नाते असल्याचे असल्याचे स्पष्ट करते. कवी रामदास गिळंदे सामाजिक, राजकीय, देश व जागतिक स्तरावर घडणाऱ्या अनेक घटनांशी समरस होतात व संवेदनशील मनाने ते त्याकडे बघतात. त्यातील प्रश्न, समस्या जाणून घेतल्यावर कवीचे मन दुखी होते. परंतु तरीही तो त्या प्रश्नांना भिडून विकृत मनोवृत्ती विरोधात विचार व्यक्त करून बंड पुकारतो. कोणत्याही साहित्यिक किंवा कवीच्या मनात ठोस भूमिका असल्याशिवाय त्याच्या हातून परिवर्तनवादी विचारांची निर्भीडपणे अविष्कृत होऊ पाहणारी साहित्यकृती निर्माण होत नाही. कवी आदिवासी स्त्रियांचे समाज व्यवस्थेतील स्थान, पुरुषांच्या नजरेतील स्त्रीवाद, त्यांची श्रम प्रतिष्ठा, स्वातंत्र्य इत्यादी बाबी कलात्मकतेने मांडतो. आदिवासी स्त्री, तिच्या बाबतचा स्त्रीवाद आणि लोकशाही याविषयीचा विचार मांडू पाहणारे कवी रामदास गिळंदे हे पहिलेच कवी असावे. आदिवासी संस्कृती, शिक्षण, आदिवासींचा दडपलेला इतिहास यांचेही दर्शन कवीने निर्भीडपणे घडविले आहे. कवितेतील कवीच्या महालदेशी बोलीभाषेतील शब्द कवीच्या अभिव्यक्तीला संपन्न व समृद्ध केले आहे. उत्तम वैचारिक जाण, समाजभान, सामाजिक बांधिलकी, सूक्ष्म निरीक्षण शक्ती या बाबी कवीच्या व्यक्तिमत्त्वात झळकतात. त्यातून त्यांच्यामध्ये उत्तम वैचारिक कलाकृती निर्माण करण्याची क्षमता असल्याचे सहजपणे जाणवते. लोकशाहीला नष्ट करू पाहणाऱ्या हुकूमशाहीला निर्भीडपणे भिडू पाहणाऱ्या कवीचा खरोखरच अभिमान वाटतो. पुरुषी मानसिकतेतून अधोरेखित केलेला स्त्रीवाद आणि हुकूमशाहीची लोकशाहीला लागलेली कीड आणि त्या विरोधात कवीने पुकारलेले बंड ‘बाई आणि लोकशाही’ या कविता संग्रहात प्रतिबिंबित करण्यात व अभिव्यक्त होण्यात कवी यशस्वी झाला आहे, यात शंका नाही. वाचक वर्ग या काव्यसंग्रहाचे वाचन करून प्रगल्भ जाणवेतून उमललेल्या विचारांचे स्वागत करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद!

*©डॉ.मधुचंद्र लक्ष्मण भुसारे सहाय्यक प्राध्यापक,चोपडा*

पुस्तकाचे नाव-बाई आणि लोकशाही (काव्य संग्रह)
प्रकाशन-मेधा पब्लिशिंग हाऊस, अमरावती
प्रथमावृत्ती-०९ ऑगस्ट, २०२१
पृष्ठ संख्या- १०२
किंमत-१३०/-

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या