‘खगोलशास्त्राविषयीचे औत्सुक्य व कुतूहल शमविणारा ‘डम्पी’
– डॉ. मधुचंद्र लक्ष्मण भुसारे
‘डम्पी’ हा कथासंग्रहाचे लेखक श्री.चंद्रकात बुध्या घाटाळ हे असून या विज्ञान कथासंग्रहाची प्रथम आवृत्ती २४ जुलै २०२३ डिंपल पब्लिकेशन मुंबई यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आली. कथालेखक श्री. चंद्रकांत घाटाळ यांचे मूळ गाव हे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा हे असून त्यांचे शिक्षण बी.ए., बी.एड पर्यंत झालेले आहे. घाटाळ हे एक उत्तम अंतराळ संशोधक, खगोलअभ्यासक त्याचबरोबर विज्ञानकथा लेखक असून त्यांनी ‘डम्पी’ हा त्यांचा पहिलाच विज्ञानकथा संग्रह असून नुकताच त्याचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे पार पडला.
‘डम्पी’ ह्या कथासंग्रहाची पृष्ठ संख्या १३६ इतकी असून या कथासंग्रहामध्ये ‘डम्पी’, ‘त्यागी राजा सूर्यसेन’, ‘दहा वीरबाला’, ‘रामाची दुनिया’, ‘नेहाची कमाल राधाची धमाल’ आणि ‘सोन्याच्या खाटेची गोष्ट’ अशा एकूण सहा विज्ञान कथांचा समावेश आहे. या विश्वात आपण एकटे नसून आपल्या पेक्षाही परग्रहावर एक अनोखी दुनिया नांदत आहे, याची सदोदित आठवण हा कथासंग्रह करून देतो. या कथासंग्रहातील सर्व विज्ञानकथा काल्पनिक जरी असल्या तरी वाचकांमध्ये विज्ञानविषयक आवड व कुतूहल निर्माण करण्याचे अनमोल कार्य या कथासंग्रहाने केलेले आहे. प्रत्येक कथा ही वाचकाच्या मनात वैज्ञानिक जिज्ञासा उत्पन्न करते व कथेच्या शेवटी त्या जिज्ञासेची सहजपणे उकल करून दाखवण्याचे कसब कथाकाराने उत्तमरीत्या पार पाडलेले आहे. कथाकार श्री.चंद्रकांत घाटाळ हे एका आदिवासी कुटुंबातील खगोलशास्त्राविषयी आवड असलेले होतकरू व तरुण मनाचे विज्ञान लेखक आहेत. त्यांची खगोलशास्त्राविषयीची आवड व दूरदृष्टी त्यांच्या सर्वच कथांतून स्पष्टपणे दिसून येते. सर्व कथांमध्ये बोलीभाषेचा वापर अथवा पात्रांमधील संवादाचा अभाव जरी जाणवत असला तरी देखील प्रवाही व कथनात्मक निवेदनाच्या माध्यमातून लेखकाने कथेचे भावविश्व सहज, साध्या, सोप्या, सरळ भाषेतून वाचकांपुढे खुले केले आहे. अल्प संवाद क्षमता व प्रवाही निवेदनाच्या माध्यमातून विज्ञानकथा रेखाटता येते हे त्यांनी त्यांच्या विज्ञान कथासंग्रहाच्या लेखनातून दाखवून दिले आहे.
त्यांच्या ‘डम्पी’ या कथासंग्रहातील पहिली ‘डम्पी’ ही कथा अत्यंत सुरस व रहस्यमय अशी आहे. ही कथा ब्रम्हांडात सजीव सृष्टीचे अस्तित्व असू शकते याची जाणीव वाचकाला करून देते. या कथेत संवाद कमी असले तरीही निवेदनाच्या पातळीवर कथा यशस्वी ठरली आहे. ‘त्यागी राजा सूर्यसेन’ कथेमध्ये सूर्यसेन व चंद्रकला यांचा विवाह होतो. नंतर वसुंधरेशीही त्या राजाचा विवाह होतो. सूर्यसेन व चंद्रकला यांना जवळपास पंचवीस मुली व दोन मुले अशी एकूण सत्तावीस मुलं होतात परंतु गर्भदोषामुळे वसुंधरेला मूल होत नाही.नंतर कालके ऋषींनी सांगितलेली विचित्र भविष्यवाणी आणि त्या नंतर वसुंधरेला झालेली बारा मुलं व त्यांच्या भविष्यात येणाऱ्या अडचणीची गाथा म्हणजे ही कथा होय. थोडक्यात या कथेतून बारा राशी व नक्षत्र, ऋतुमान यांचा गणितीय मेळ साधून लेखकाने उत्तम कथा रेखाटली आहे.
‘दहा वीरबाला’ ही कथा अत्यंत रहस्यमय अशी आहे. ती मकर देश व बीटा देश या दोन देशांमध्ये जातीधर्मांवरून घडलेल्या दहशतवादी हल्ल्याची व दुष्परिणामांची साक्ष पटवून देते. या कथेतील बीटा देश मकर देशाला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास देतो व दहशतवादी कृत्य घडवून आणून मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी करतो. नंतर डॉ.करमोडा यांच्या योजनेनुसार दहा मुलींना शत्रूच्या गोटात पाठवून त्यांच्या गुप्त कारवाया उघडकीस आणून हल्ल्याची योजना उधळून लावली जाते. परिणामी शत्रू जागरूक होतो व त्यांच्या गोटात सैनिक म्हणून गेलेल्या मकर देशाच्या तरुणींना रंगेहाथ पकडले जाते त्यानंतर तरुणींना कुंटनखाण्यात ठेवून तेथील सैनिक त्यांच्याशी जी वर्तणूक करतात ती अंगावर काटे आणणारी अशी आहे. नंतर वीरबालांची सुटका कशी होते? याच सर्व नियोजन डॉ.करमोडा कसे करतात ? याच अतिशय रहस्यमय वर्णन वाचताना कमालीच कुतूहल मनात निर्माण होते. कथेतून देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत सूक्ष्मरित्या नियोजन करून दहशतवादाचा बीमोड करणारे डॉ. करमोडा हे या कथेचे दिग्दर्शक ठरतात तर त्या १० वीरबाला कथेच्या नायिका म्हणून रेखाटण्यात कथाकार यशस्वी झाला आहे.
या कथा संग्रहातील एक वैशिष्ट्यपूर्ण विज्ञान कथा म्हणजे ‘राम्याची दुनिया’ ही कथा होय. या कथेत एका छोट्या खेडेगावात शिकणारा रामा. त्याला वर्गात भूगोलाच्या तासाला ग्रहांच्याविषयी कुतूहल निर्माण होते. परंतु त्याचे विषय शिक्षक त्याचे उत्तर देऊ शकत नाही. नंतर रामा एक अदभूत स्वप्न पाहतो. आणि त्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला एक आदर्श वर्गशिक्षक लाभतात . आणि त्या शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाखाली तो आपल्या स्वप्नाचा प्रवास सुरु करतो आणि हा प्रवास इतका अद्भुत असतो की रामा या प्रवासात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचतो. त्याचा हा प्रवास म्हणजे बालवैज्ञानिक असणाऱ्या व बनू पाहणाऱ्या मुलांसाठी खरंच अतिशय प्रेरणादायी आहे. योग्य मार्गदर्शन लाभले तर रामाची दुनिया कशी बदलून जाते.याचे अतिशय हृदयस्पर्शी वर्णन व अतिशय प्रेरणादायी संदेश आपल्याला राम्याची दुनिया या कथेतून मिळतो.
‘नेहाची कमाल राधाची धमाल’ या कथेमध्ये मोटो रिसर्च सेंटरमध्ये काम करणारी नेहा परग्रहावरच्या जीवांचे गुणधर्म अभ्यासण्यासाठी दुसऱ्या ग्रहावर एक वर्षभर जाते. तो ग्रह म्हणजे पृथ्वी होय. नेहा राधा नावाच्या दहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या शरीरात प्रवेश करते. आणि तिच्याकडे असलेल्या कृत्रिम व नैसर्गिक शक्तींचा वापर करुन राधाला अतिशय हुशार व स्मार्ट बनवते. त्यातच कोरोना सारखा महाभयंकर रोग येऊन लॉकडाऊन होते. शेवटी राधाच्या शरीरात प्रवेश करणारी नेहा शासनाला आपल्याकडे या आजारावरील लसीचा फॉर्मूला असल्याचे कळवते. तिने सांगितलेल्या फॉर्मुल्यानुसार लस तयार केले जाते. त्यानंतर देशातील सर्वांचा हळूहळू आजार बरा होऊन परिस्थिती सुधारते. राधाचा सत्कार होतो. तिची पारितोषिकासाठी निवड केली जाते. राधाच्या शरीरात नेहाने प्रवेश करून मानवजातीच्या कल्याणासाठी केलेले कार्य अवर्णनीय असेच आहे. त्यानंतर ती राधाचे शरीर सोडून तब्बल एक वर्षाने बाहेर येते व विश्वाच्या निर्मिती तसेच अंताचे कोडे सोडवण्यासाठी अंतराळात जाते. या रहस्यमय अंतराळ कथेच्या शेवटी विश्वनिर्मितीच्या कोड्याचे उत्तर उलगडून दाखवण्यात कथाकार यशस्वी ठरला आहे. या कथासंग्रहातील शेवटची कथा ती म्हणजे ‘सोन्याच्या खाटेची गोष्ट’ या कथेत एक आजोबा आपल्या नातवांना एक गोष्ट सांगत असतो. या कथेची तृतीय पुरुषी निवेदन पद्धती यशस्वी ठरली आहे. लेखकाने अत्यंत साध्या, सोप्या भाषेतून कथेचे मर्म उलगडून दाखवले आहे. उत्तर दिशेला ठुबान नावाचा राहणारा पराक्रमी राजा व त्याचा ध्रुव नावाचा पराक्रमी पुत्र. तो ध्रुव शिकारीला जातो व त्याला तिथे रोहिणी नावाची एक अहंकारी व सुंदर राजकुमारी भेटते. ती ध्रुवाजवळ लग्नाचा प्रस्ताव मांडते परंतु तिचा लग्नाचा प्रस्ताव ध्रुव धुडकावून लावतो. या कारणामुळेच रोहिणी दुखावली जाते आणि ती त्याला शाप देते की, ‘उत्तर पूर्व दिशेला एक मोठे अस्वल आहे. त्या अस्वलाची एक खाट आहे.त्या खाटेला चार पावक्या आहेत. ते सोन्याचे आहेत. त्या खाटीचे रक्षण एक ऋषभ नावाचा क्रूर बैल करतो आणि त्या खाटेची सोन्याची पावके चोरीला गेले तरच तुझा विवाह होईल. नाहीतर तू कायमचा अविवाहित राहशील’, या विचित्र शापामुळे राजा चिंताग्रस्त असतो. इतक्यात तिथं तिघं येतात आणि ते खाट चोरण्याचे आव्हान स्वीकारतात. या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे या कथेत आंधळा पाहतो, बहिरा ऐकतो तर मुका बोलतो. . हे मजेदार रहस्य आहे. ते रहस्याचं गुपीत तुम्हांला पुस्तक वाचूनच समजेल.
अर्थातच लहान मुलांचे कुतूहल वैज्ञानिक दृष्टिकोनातून उलगडून दाखवण्याचे कौशल्यपूर्ण काम लेखकाने आजोबा या पात्राच्याद्वारे केलेले दिसते.
‘डम्पी’ या कथासंग्रहामधील सर्व कथेतील पात्रे बोलकी व कर्तृत्ववान असून ते डोळ्यासमोर जीवंत प्रसंग, घटना उभ्या करतात. वाचक कथा वाचताना स्वतःला हरवून बसतो व कथेत रममान होतो. पात्रांच्या भूमिकेत वाचकाला गुंतवून टाकण्याची कला लेखकाला अचूक साधली आहे. या सर्व कथांमध्ये ‘राम्याची दुनिया’ ही कथा एका लहान मुलाच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरविण्याचे चित्रण करते. रामाचा चित्तथरारक असा खोडकर मुलापासून ते बालशास्त्रज्ञ होईपर्यंतचा प्रवास वाचकाला खिळवून ठेवतो.’डम्पी’ ही कथा देखील अंतराळातील ग्रह व त्यावरील जीवसृष्टीमध्ये गुंतवून ठेवते. दहा वीरबाला ही कथा पुरुषांइतक्याच स्त्रीया देखील अत्यंत धाडसी कृत्य करू शकतात, याची साक्ष पटवून देतात. थोडक्यात, सर्वच कथा आपला हेतू साध्य करताना आढळतात. ग्रामीण भागात राहूनही विज्ञानाची कास धरून त्या भागातील मुलांना खगोलशास्त्रीय ज्ञान मिळाले पाहिजे तसेच त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन जनजागृती झाली पाहिजे हे या लेखकाच्या कार्याचे हुबेहूब प्रतिबिंब कथेत उमटलेले दिसते. लेखक नुसत्या या विज्ञानकथांमधून विज्ञान जागृती करीत नाही तर ते आपल्या कार्याच्याद्वारे प्रत्यक्षात उतरवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे, ही अत्यंत गौरवाची बाब आहे. त्यांच्या कथा साध्या, सोप्या, सरळ भाषाशैली व निवेदन पद्धतीमुळे वाचनीय ठरलेल्या आहेत. रहस्यमय, चित्तथरारक अशा घटना प्रसंगांच्या पेरणीमुळे वाचकाची दृष्टी कुठेही विचलित न होता शेवटपर्यंत खिळून राहते आणि हे कौशल्य लेखकाने अचूकपणे साधलेले दिसते. थोडक्यात, शालेय विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा व अंतराळ तसेच त्यांना खगोलशास्त्रीय ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने लेखक चंद्रकांत घाटाळ यांनी लिहिलेला ‘डम्पी’ हा कथासंग्रह यशस्वी ठरला आहे. ‘डम्पी’ या कथेतून परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या दृष्टीने तयार केलेले यान सर्व शास्त्रज्ञांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवते. त्याचबरोबर तीनही ग्रहांवर मानवी वस्ती व संस्कृती उभी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते म्हणूनच कदाचित लेखकाने या संग्रहाला दिलेले ‘डम्पी’ या एका विशिष्ट अंतराळ वस्तूचे नाव समर्पक ठरले आहे.कथेतील गूढता व रहस्यमयता कथेच्या शेवटी उलगडून दाखविल्यामुळे कथेतील पात्र, घटना व प्रसंग लक्षवेधी ठरल्या आहेत.मुखपृष्ठावर रेखाटलेले चित्र अत्यंत बोलके आहे. विज्ञानकथा लेखक चंद्रकांत घाटाळ यांना त्यांच्या पुढील लेखन कार्यास खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या हातून येणारी पुढील विज्ञान विषयक साहित्यकृती अधिक सकस व दर्जेदार स्वरूपात उतरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
डॉ. मधुचंद्र लक्ष्मण भुसारे
सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा जि. जळगांव
(कवी तसेच आदिवासी लोकसाहित्य व संस्कृती अभ्यासक)
मोबाईल क्र. ९८३४३३२७७२

