[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आठवणीतील रानवाटा

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

आठवणीतील रानवाटा

आजही बालपण आठवलं की नजरे समोर येतात त्या रानावनातील असंख्य नागमोडी वळणांच्या आणि काट्याकुट्यांच्या रानवाटा..!त्यांची ती लोभस गुंतागुंत आठवली की आजही मला आजीच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांची आठवण येते.इतक्या त्या एकमेकीत गुंतलेल्या असतात..
अगदी डोंगरदेवाच्या गळ्यातील गळसऱ्या प्रमाणे शोभून दिसाव्यात अशाच काहीशा..पण त्यांची घडणावळ करणारे असतात तरी कोण..? खरे तर रानावनात हुंदडणारी गाई गुरे शेळ्या आणि म्हशीचे कळप आणि त्यांना सांभाळणारे अर्थातच आदिवासी बांधव(गुराखी/बाळदी)यांनीच खऱ्या अर्थाने या गावकुसा बाहेरील दरीखोरीच्या रानात रानवाटांची निर्मिती केली आहे.हे ही तितकेच खरे..रानावनात फिरतांना मनाला भुरळ घालणाऱ्या या निरागस,देखण्या पण तिक्याच निडर रानवाटा पाहून असे वाटते. की या रानवाटांची निर्मिती करणारे निसर्गातील वनचर आणि त्याच्या सानिध्यात वावरणारा आदिवासी बांधव किती हुशार आणि सजग असावेत नाही का? पावसाळ्यातील रानवाटा या दोन्ही बाजूने रानगवताने आणि रंगीबेरंगी रानफुलांनी पहुडलेल्या असतात,तर कधी पुराच्या पाण्यात लुप्त झालेल्या दिसतात,काही रटरटत्या चिखलाने बरबटलेल्या दिसतात..हिवाळ्यातील रानवाटा या पहाटेच्या शुभ्र धुक्याची आणि दवबिंदूंची रजई अलवार पांघरून अगदी गारठल्यागत भासतात..तर उन्हाळ्यातील रानवाटा तापलेल्या धुळमातीच्या फुफाट्याने आपलं अस्तित्व जगाला मान्य करायला भाग पाडतात.जणूकाही या अबोल रानवाटा निसर्गातील जीवसृष्टीला सुख दुःखाची ओळख करुन देतात.तर दुसऱ्या बाजूने संकटातही खंबीरपणे कसं जगावं याचीही जाणिव करुन देतात,अगदी एखाद्या निष्णांत चित्रकाराने सप्पकन ब्रश फिरवावा तशा या नागमोडी वळणाच्या वाटा कधीकधी आपल्यालाही चकवा देतात.
माझ्या मते रानवाटा म्हणजे रानातील एक श्रीमंतीच..नाही का? दोन्ही बाजूने अथांग वाढलेले रानगवत आणि मधूनच अलगद ओघळणारी ती रानवाट अगदी दिमाखात पुढे जाते, इतरवेळी थकणारे पाय या रानवाटां सोबत आनंदाने चालतात,या रानवाटाकडून शिकण्या सारखे बरेच काही आहे,तिन्ही ऋतू झेलत रानावनात पडून राहणाऱ्या या वाटांची कोणा बद्दल कसलीही तक्रार नसते,त्या स्थितप्रज्ञ राहून स्वःतचे अस्तित्व जपतात,डोंगराच्या पायथ्या पासून माथ्याकडे जातांना त्या काहीशा विरळ होतात,पण त्यांच्यामध्ये स्पर्धा किंवा शोध प्रतिशोध अजिबात नसतो,उलट असंख्य वळणं त्यांच्या आयुष्यात आल्याने त्या जास्त कणखर बनल्या.तर त्यातील एखादी वाट पर्वत शिखरावर जाऊन अचानक थांबते…अन स्वःतचा जीव वाचवते.
मला वाटते वेगवान चै्ापदरी रस्त्यांपेक्षाही टीचभर..वीतभर रुंदीच्या पायवाटांवरुन तोल सांभाळत चालतांना एक आगळीवेगळी मजा असते,अगदी आपण एकटे असाल…आणि सोबत या वाटा असतील तर रानातील भटकंती मनाला रिझवते फक्त त्यासाठी आपण रानवेडे असायला हवे.पावलांची साथ … मनाचा उत्साह आणि डोंगरदऱ्यांचे वेड असेल…तर रानवाटांना डोळे मिचकावून सांगावे…येतोय मी पुन्हा निसर्ग डोळे भरून बघायला..!

कवी काळूदास कनोजे
आदिवासी समाजसंस्कृती अभ्यासक

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या