“माती मागतेय पेनकिलर” कवितासंग्रहाला ‘नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार’

पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्या वतीने आज “नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार” या प्रतिष्ठित सन्मानाने “माती मागतेय पेनकिलर” हा कवितासंग्रह गौरवण्यात आले. हा पुरस्कार नेरळ येथील नारायण सुर्वे यांच्या नेरळ जि रायगड येथील स्मृतीस्थळावर त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने १५ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या सोहळ्यात वितरित करण्यात आला. कवी सागर जाधव जोपुळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या मनात प्रचंड आनंद, उत्साह आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजीराव सातपुते होते. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “नारायण सुर्वे यांची कविता म्हणजे श्रमिक जगाचे हृदयस्पंदन आहे. त्यांच्या लेखणीतून श्रमाला अर्थ मिळाला, आणि अशा संवेदनशील कवितेच्या परंपरेला काव्यदृष्टीने सशक्त पुढाकार दिला आहे.”
या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांना “नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्विकारताना त्यांनी भावना वेगाने सांगितले की, “सुर्वे हे कवी म्हणून नव्हे तर एक विचारशील युगच होते. त्यांच्या नावाने गौरव मिळणे म्हणजे आयुष्यभराच्या लेखनप्रवासाचं सार्थक आहे.”
कार्यक्रमात डॉ. श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, बाजीराव सातपुते, सुदाम मोरे, पुरुषोत्तम सदाफुले, अंजली कुलकर्णी, मानसी चिटणीस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कवी राजेंद्र वाघ, वंदना इन्नानी, कवी दत्तात्रय खंडाळे, अंजली कुलकर्णी आणि सुनंदा ढोकले यांनाही या प्रसंगी सन्मानित करण्यात आले.
कवी सागर जाधव जोपुळकर यांनी “माती मागतेय पेनकिलर” या काव्यसंग्रहासाठी पुरस्कार स्वीकारताना सांगितले, “हा सन्मान माझ्या लेखणीतून मांडलेल्या मातीच्या, श्रमाच्या आणि शेतकरी जीवनाच्या भावविश्वाचा गौरव आहे. सुर्वे यांच्या कवितांनी ग्रामीण वास्तवाला आवाज दिला; माझी कविता त्या वारशाचा विस्तार करण्याचा छोटासा प्रयत्न आहे.”
या पुरस्कारामुळे नव्या पिढीतील कवींमध्ये समाजाबद्दलची संवेदनशील जाणीव आणि श्रमिक जीवनाकडे पाहणाऱ्या कवितेचा आशय नव्याने केंद्रस्थानी येत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नारायण सुर्वे कला साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे साहित्यवर्तुळातून मनःपूर्वक कौतुक झाले.


