ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने
जैसा पंचमालापु सुगंधु । की
परिमळु आणि सुस्वादु । तैसा भला
जाहला विनोदु । कथेचा इये ।।
कैसी आगळिक दैवाची । जे गंगा
जोडली अमृताची । हो कां जपतेपे
श्रोतयांची । फळा आली ।।
आता इंद्रियजात आघवे । तिही
श्रवणाचे घर रिघावे । मज संवाद सुख
भोगावे .। गीताख्य हे ।।
जसा पंचमस्वर आणि त्यातच
उत्तम सुवास व माधुर्य या तिहींचा अपुर्व ऐक्यभाव झाला असता आनंद
होतो . तसाच प्रकार या गीतारूपी कथा
अमृताचा लाभ होऊन झाला आहे. म्हणजे यात सर्व इंद्रियांना आनंद होईल अशी गोडी आहे.
आज श्रोत्यांच्या दैवाची थोरवी
काय वर्णावी ? की जिच्यामुळे श्रोत्यांची
पुर्वजन्मीची जपतपे फळास आली. किंवा गीता ही अमृत रूप गंगाच त्यांना
प्राप्त झाली .
म्हणून सर्वच्या सर्व इंद्रियांनी
आपापली कामे सोडून आता श्रवणेंद्रियांचे ठिकाणी वास करावा .
आणि मग गीता नामक या श्रीकृष्णार्जुन संवादाचे सुख उपभोगावे
सौ. शैलजा जाधव (पाटील)
चांदवड नासिक

