बालपणातील आठवणीचा मागोवा घेणारा “धुनीवरल्या गोठी”
सह्याद्रीच्या कुशीत, डोंगर कपारीत जीवन जगणाऱ्या, वाडी,वस्ती, ग्रामीण लोकजीवणाचा पट उलगडणारी आदिवासी बोलीभाषेतील एक उत्कृष्ट साहित्य कृती म्हणजे अलीकडेच प्रकाशित झालेलं “धुनीवरल्या गोठी”…. प्रा. गंगा गवळी यांचं हे पुस्तक वाचकांना अलगत आपल्या बालपणातल्या सुखद आठवणीतून फेरफटका मारून आणते.
कोकणा आदिवासी बोलीत लिहिलेल्या या गोष्टी/गोठी नकळत बालपणात घेऊन जातात वास्तव, जीवंतपणा आणि वाचकांना गुंतवून ठेवणाऱ्या शब्दांची ताकत लिखाणात आहे, शेतकरी, कष्टकरी, बलुतेदारी, आणि ऋतूनुसार बदलणारे ग्रामीण लोकजीवन या सर्वांचा मागोवा घेताना लेखिकेचं हळवं मन भूतकाळात डोकावताना म्हणते की,
“कधी कधी मन लहानपणातले गावाखलले आठवणींनी पावसात भिजल्यावाणी चिंबुळण्या भिजतंय. पण गावखलले आठवणींत मन भिजत ताहा मनातन कोठतरी येक सल टोचत रहत्येय….” आणि मग आनंद वाटणाऱ्या आठवणींसोबतच टोचत राहणारी एक सल तोच हुंदका लेखिकेच्या लेखणीतून या गोठी रूपाने वाचकांच्या मनावर शब्दांची मुक्त उधळण करण्यासाठी साकार होतो. मिरगाची घाय या पहिल्याच लेखातून पाऊस पडण्याच्या अगोदरच्या काळात ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, बलुतेदार यांची धावपळ, पावसाच्या स्वागताची तयारी कमालीची रंगवली आणि पावसाने हर्षभरीत झालेल्या निसर्गाचं वर्णन करताना डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटाप्रमाणे तरळुन जातो.
पहिला पाऊस पडून गेल्यावर येणारा मातीचा सुगंध अजूनही नायिकेच्या काळजात ठासून बसला आहे हे सांगताना त्या म्हणतात की, खराच, मिरगाचे पयले पावसात मातील जो सुवास येतोय, त्येची सर जगातले कनचेच महागाईचे अत्तरालाही येणार नाय…..या मातीच्या येणाऱ्या सुवासाने बेभान होऊन दप दप कोंबड्या, पाठीमागून चोर आला, येरे येरे पावसा, तुला देतो पैसा… अशी गाणी आठवणीत चिंब भिजवतात..
तर आखतीची गाणी
“चिचवरला चिचोबा, चिचोबा
का रं चिचा फोलितो, फोलितो
तिकडून आली गवराई
कोरा पदर झेलितो, झेलितो”…
“काळे वावरी,
वली चिकन माती,
तठ माजी गवराय वं,
ती रमत होती…….”
आशा काही लुप्त होणाऱ्या लोक गीतांच्या ओळी ओझरत्या लेखणीतून उतरतात,
अन लागोपाठ मग ‘खळ्यावरली मळणी, ‘सांज’, ‘इहिर’, ‘वनरायची लगीनघाय’, ‘गवराय’, ‘गाव माझा बेस होता’ ‘नदी’, आणि पुस्तकाचं शीर्षक असणाऱ्या ‘धुनीवरल्या गोठी’, एक एक पान पालटत जाताना लेखिका नावाप्रमाणेच गंगेच्या खळाळत्या पाण्यासारखी भासते. कधी स्वछंदी, निरागस, कधी अल्लड, कधी हळवी तर कधी संवेदनशील गावच्या नदीशी जुडलेलं नातं सांगताना , मी डोळे मिटले की खळखळ, खळखळ, आयकाये येते एकच धून,त्ये आवाजाचा,,,खळखळ धूनचा मालच होयचा भास, असा या नदीचा अन माझा कनचा नाता होवा बरा… ? अन मग त्या खळाळत्या पाण्यातला वलय अस्वस्थ मनाचा ठाव घेत-घेत नदीमायची कहाणी शब्दातून वाहत जाते त्या अथांग शब्दांच्या सागराच्या गळाभेटीसाठी…!!
धुनीवरल्या गोठी या शीर्षक लेखात,
“धुनीवर शेकता शेकता जसा काय सुखाचा चांदना लोका अपलयेत वाटून घियाची, अन मनातलं दुःख ……त्या तं चावळता चावळता एकमेकाखल मन मोकळा करून जसा काय धुनीच्या आगीत जाळून टाकतं”, म्हणजेच शेकोटीभोवती अनेक गोष्टी व्यक्त करता करता शेकोटी जणू एकमेकांच्या वेदनेवर फुंकर घालून एकमेकांची दुःखे हलकी करणारी जागा होती…तशीच आणखी एक जागा म्हणजे गावची विहीर तिथेही गावातील साऱ्या महिलांची भल्या पहाटेपासून गर्दी असायची अन एकमेकांच्या ख्याली खुशाली कळायची अन आज दिवसभर कोण कुठे जाणार ,कोण काय करणार हा लेखिकेच्या बालपणातील प्रसार माध्यमच जणू, असे एकसरस प्रसंग चितारलेले या पुस्तकात मन गढून जाते, आणि हो बालपणातील आठवणीचा नुसता फापट पसारा या पुस्तकात नाही तर लेखिकेच्या सुखद आठवणी सोबत ग्रामीण भागातल्या समस्या, दुःख ,वेदना, आईवडिलांचे प्रेम, अस्मानी सुलतानी संकटे निसर्गाच्या सौंदर्या सोबतच त्याच रौद्र रूप देखील तितक्याच ताकतीने मांडलेलं आहे…एकूणच शेतीमातीत राबण्यापासून तर प्राध्यापक होईपर्यंतचा हा त्यांचा थोडक्यात प्रवास यातून मांडला आहे.जे जगलं भोगलं तेच यातून मांडलं आहे. प्रमाण भाषेचं माध्यम असतानाही ज्या समाजात जगलो,वाढलो त्या बोली नष्ट होऊ नये म्हणून जतन करून ठेवण्याचं धाडस लेखिकेने केलं आहे, आणि आदिवासी बोलीतील ही पहिलीच साहित्य कृती निर्माण केली त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन.
प्रा. गंगा गवळी-पवार यांचं हे वैशाली प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं पहिलंच पुस्तक असून त्या उत्तम कवयित्री,ललित लेखिका, वक्त्या आहेत.त्यांचं लिखाण हे एका वेगळ्या धाटणीचं आहे जे की वास्तवाशी भिडणार काळजाला पाझर फोडणार असं. ज्या समाजात त्या वाढल्या, चिंचा, बोरं, करवनदीच्या जाळीतून, डोंगर कपारीतून, वाहणाऱ्या झरातून, कधी ओसाड माळराणातून, कधी नदीकठावरून आणलेला हा शब्दरूपी रानमेवा आपल्या पुढे मांडताना लेखिकेने हातचं काहीच राखून ठेवलेलं नाही जे आहे ते जशाच्या तसे अपणापुढं मांडलेलं आहे तरी हा अस्सल कोकणी बोलीभाषेतील रानमेवा आपण एकवेळ नक्की चाखावा आपण नक्की तृप्त व्हाल, यासोबतच लेखिकेचे दुसरे ही “लहानपण इचतुय मी” हे पुस्तक प्रकाशित आहे. साहित्य क्षेत्रात नव्याने दाखल झालेल्या ह्या संवेदनशील, हळव्या मनाच्या लेखिकेच्या हातून या पुढेही उत्तमातील उत्तम साहित्याची निर्मिती होवो ह्याच शुभेच्छा………..
▪️धुनीवरल्या गोठी । गंगा गवळी-पवार
▪️वैशाली प्रकाशन, पुणे
▪️किंमत । 250 ₹
© रामदास घोडके
(पैठण, छ. संभाजीनगर)

