पर्यावरण रक्षणासाठी लढणारा सच्चा कार्यकर्ता: देवचंद महाले
विकास कोणाला नको आहे? पण तो विकास जर निसर्गाला ओरबाडून केला गेला तर मानवाचेच जीवन काय तर या पृथ्वीवरील संबंध जैवविविधतेचे जीवन उध्वस्त होऊ शकते अशी धोक्याची सूचना देणाऱ्या अनेक पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांपैकी देवचंद महाले हे आदिवासी भागातील एक सच्चे पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते आहेत. ज्यांची दखल घेण्यासारखी आहे. तशा भारतात आजपर्यंत अनेक पर्यावरण चळवळी झाल्या आहेत. बिश्नोई आंदोलन, चिपको आंदोलन, नर्मदा वाचवा आंदोलन, जंगल बचाओ आंदोलन, सुंदरबन वाचवा वगैरे.. 
1970 च्या आसपास ह्या पर्यावरण चळवळी उदयास आल्या. त्या त्या त्या ठिकाणी उदभवलेल्या स्थानिक परिस्थिती नुसार उदयास आल्या.
नाशिक शहर आणि आजूबासजूचा परिसर तसा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय. पण 1990 नंतर याही परिसरात निसर्ग ऱ्हासाचे हळू पावलाने का होईना जे परिणाम दिसू लागले होते ते ओळखण्यात नाशिक परिसरात ज्या मोजक्या व्यक्ती होत्या त्यात एक उल्लेखनीय नाव म्हणजे देवचंद महाले. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव येथील पोलीस पाटील म्हणून ओळख असलेले हे देवचंद महाले कवी, लेखक, पत्रकार सामाजिक व पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते म्हणूनही परिचित आहेत. उपजीविकेसाठी ते पारंपरिक शेती करतात.
पर्यावरण क्षेत्रात गेली तीस वर्ष ते कार्यरत आहेत. त्यांचे स्वतःचे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असून लहानपणापासून निसर्गाच्या सानिध्यात जीवन घालविल्यामुळे निसर्गाशी अनोखे नाते जपण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या अनेक लेख , कविता यातून त्यांनी पर्यावरण रक्षणाचे संदेश दिले आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक गावांना वनांचे महत्व, व वृक्ष लागवड, दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन,लागवड, तसेच दुर्मिळ पक्षी, प्राणी यांच्या बचावासाठी व्याख्याने दिली आहेत. उपक्रम केले आहेत. पर्यावरण चळवळ ही लोक चळवळ व्हावी यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच त्यांनीं पर्यावरण जागृतीसाठी शाळा, महाविद्यालय ,व ग्रामसभा या ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. ब्रह्मगिरी उतखनन थांबविण्यासाठी अंजनेरी, ब्रम्हगिरी बचाव मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. नाशिक, पालघर जिल्हा सीमेवरील बलदेव पाडा, आडगाव येथील, शिवारातील गिधाड बचाव मोहीमेसाठी संघर्ष केलेला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे.
चोरटी, आणि अ-वैध होणारी वृक्षतोड याला ग्रामीण भागात कडवा विरोध केलेला आहे। वणव्या साठी गावं पातळीवर जाऊन प्रबोधन प्राथमिक उपाय योजना यासाठी काम केलेले आहे. वनसंवर्धन बाबत ते कायम जनतेशी हितगुंज साधत असतात. तसेच
पेठ,हरसूल, इगतपुरी,त्रम्बकेश्वर इत्यादी ठिकाणी जल परिषद या चळवळीतून दोनशे पेक्षा जास्त श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. या खेरीज आदिवासी क्षेत्रात
शिक्षण,आरोग्य, अंधश्रद्धा, निर्मूलन कुपोषण, वनेपर्यावरण सहकार, पंचायतराज, कला, क्रीडा, आदिवासी संस्कृती, साहित्य, सामाजिक सलोखा, ग्रंथालय चळवळ, वनहक्क,जल परिषद,इत्यादी क्षेत्रातही त्यांचे कार्य सुरू आहे. महाराष्ट्रातील गड कोट किल्ले यांच्या संवर्धनासाठी अनेक मोहिमा व तेथिल ऐतिहासिक साधनाचे जतन करण्याचं त्यांचं कार्यही उल्लेखनीय आहे.
तसेच शेती, शेतीमातीतील साहित्ये, व वने आणि पर्यावरण या विषयावरील आकाशवाणी, दूरदर्शन या वरून भाषणे आणि मुलाखती आणि मुलाखतीही दिल्या आहेत. याबरोबरच आदिवासी पारंपरिक लोककला, लोकगीते, वाद्य यांचे जतन आणि प्रबोधन प्रसारण इ. कामातही त्यांनी अग्रेसर राहून काम केले आहे. याबरोबरच अनेक वृत्तपत्र, मासिके पाक्षिके यातून विविध विषयांवर गेली तीस वर्ष लिखाण केले आहे. त्यांचं हे कार्य पाहता
शासनाच्या पर्यावरण कृती बल (task for)या समितीचे सदस्यपद त्यांना मिळालं आहे. तसेच
आतापर्यत विविध संस्था, आणि शासनाचे विविध सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. अशा या देवचंद महाले यांचे विचार नव्या पिढीने तरी समजून घेणे काळाची गरज आहे. त्यांची निसर्गाविषयी असलेली तळमळ लक्षात घेणे गरजेचे आहे कारण निसर्गातील प्रत्येक गोष्ट अमूल्य आहे. ती मानवाच्या उपयोगाची आहे. निसर्गाच्या सहवासाशिवाय मानव निरोगी व आंनदी जीवन जगूच शकत नाही. पण गेल्या काही वर्षांपासून मानव निसर्गातील घटकांची अतोनात हानी करू लागला आहे. स्वतः च्या स्वार्थ आणि लोभापायी मानवाने बेसुमार जंगलतोड आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडविण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे ऋतुचक्रही बिघडते आहे. आता पाऊस उन्हाळा किंवा हिवाळ्यातही पडू शकतो तर अर्धा अधिक पावसाळा कोरडा जाऊ शकतो. कुठे महापूर तर कुठे थेंबही नाही अशी परिस्थिती येऊ शकते. पर्यावरण असंतुलनाचे असे विपरीत परिणाम दिसतात पण स्वार्थी सुखाला लचावलेला माणूस काहीच बोध घ्यायला तयार नाही.
जंगल आणि त्यातली जैवविविधता हा तर निसर्गाचा एक अमूल्य ठेवाच आहे. माणसाच्या उत्तम आरोग्यासाठी खरं तर तो एक दवाखानाच आहे. परंतु हा दवाखाना हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याची खूप मोठी किंमत माणसाच्या पुढील पिढ्याना भोगावी लागणार आहे. जेंव्हा कोरोना काळ होता तेंव्हा कोरोनाच्या धास्तीत आखं जग होतं. कोरोना टेस्ट करतांना शरीरातील ऑक्सिजनची लेवल तपासली जात होती. ती जर 75 च्या खाली गेली तर धोक्याचे लक्षण आहे असं समजलं जात होतं. शरीरातल्या तांबड्या पेशीतील ऑक्सिजन लेवल कमी असली तर केवळ कोरोनाच नाही तर इतर अनेक आजारांना शरीर बळी पडू शकते. याची माहिती तेंव्हा मिळाली होती. म्हणजे ऑक्सिजन किती महत्वाचा आहे हे तेंव्हा कळलं होतं. पण माणूस मात्र निसर्गातील ऑक्सिजन तयार करणारे कारखाने म्हणजे जंगले उध्वस्त करू लागला आहे. आपल्याकडे जंगलांच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी फॉरेस्ट खाते असूनही जंगलांचे रक्षण होण्याऐवजी त्यांचे भक्षण होते आहे. दरवर्षी शासनातर्फे वृक्षलागवडीसाठी कोटींचा खर्च दाखविला जातो. कागदावर वृक्षलागवड दाखविली जाते. जंगलांना वणवे लावले जातात ही अतिशय चीड आणणारी बाब आहे. याविरुद्ध आवाज उठविला पाहिजे. लोकं राजकारण्यांच्या नादी लागून देव, धर्म, जातपात असल्या फालतू प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलने करतात पण प्रदूषण, पर्यावरण रक्षण या प्रश्नांपायी आवाज उठवत नाहीत ही गांभिर्याची बाब आहे. पर्यावरण रक्षण किती महत्वाचे आहे हे ग्रेटा थनबर्ग सारख्या शाळकरी मुलीला कळते. ती शिक्षण सोडून आपल्या पिढीला आरोग्यदायी निरोगी निरामय वातावरण मिळायला पाहिजे त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावे म्हणून आंदोलन करते. नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्टयात नांदगाव कोहळी भागात कित्येक वर्षांपासून वृक्षांची ठेकेदारांमार्फत तूट होत होती. वाघेरा घाटात आगी लागत होत्या हे सगळ्यांना दिसत असूनही निसर्गप्रेमी एकटा देवचंद महाले याविरुद्ध आवाज उठवत होता. फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या सहकार्याने वृक्षतोड करत असलेल्या ठेकेदाराच्या धमक्यांना व त्याने देऊ केलेल्या आमिषाला बळी न पडता देवचंद महाले यांनी त्याविरुद्ध मोहीम चालवली होती. ते सातत्याने विविध वृत्तपत्रातून लेख लिहत होते आणि लिहत आहेत. पर्यावरणप्रेमी मित्रांसोबत निसर्गावर होणाऱ्या आघातांवर चर्चा घडवून आणत आहेत. त्यांच्यासोबत उभे राहण्याची गरज आहे. निसर्ग वाचविण्यासाठी तिथली जैवविविधता टिकविण्यासाठी आता प्रयत्न सुरूच झाले पाहिजेत अन्यथा वेळ निघून गेल्यावर काळ माफ करणार नाही. लोक उठ सूट केवळ आंबा, काजू यांसारख्या फळझाडांचीच लागवड करून त्यांचीच काळजी घेत आहेत. ही फळझाडे तर महत्वाची आहेतच पण रानात असलेली प्रत्येक वनस्पती मानवाच्या दृष्टीने तितकीच महत्वाची आहे. तिच्यावर कुऱ्हाड चालविण्यापूर्वी , जंगलांना आगी लावण्यापूर्वी हजारवेळा विचार करावा. काही वनस्पती नैसर्गिकरित्याच उगवतात त्या कृत्रिम पद्धतीने आपण उगवू शकत नाही वाढवू शकत नाही अशा वनस्पती म्हणजे जंगलातल्या दवाखाण्यातली मोफत औषधेच आहेत. मोफत मिळतात म्हणून त्यांची किंमत कळत नाही इतकेच. त्यामुळे देवचंद महाले यांसारख्या सच्च्या पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांची फळी भी राहणे ही काळाची गरज आहे.
तुकाराम चौधरी

