आदिवासींचे वास्तूशास्त्र व त्यातील वनस्पती, प्राणी आणि पशूंचे महत्व
आदिवासी संस्कृतीमध्ये वास्तूचा वनस्पती आणि वृक्ष यांच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध असल्याचे दाखविले आहे. आदिवासी माणूस वृक्ष, वनस्पती, वेली, निसर्ग सर्वांच्या सान्निध्यात राहात असल्याने त्यांच्या मोडक्या तोडक्या का असेना घरातील माणसांचे आरोग्य अतिशय चांगले राहते ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आदिवासी माणसाने निसर्गातील शुद्ध हवा, शुद्ध पर्यावरण, पक्षी, फुलपाखरं आदींशी जवळीक साधली आहे.म्हणूनच आदिवासी माणसांच्या वस्त्या डोंगर, दऱ्या- खोऱ्यात, निसर्गरम्य परिसरात आढळतात. या निसर्गातून प्राणवायू, सुगंध, फुलं-फळं या बरोबर मानवी मन प्रफुल्लित ठेवण्याचं काम त्याच्या घराच्या भोवती असणारी विविध प्रकारची झाडे सातत्याने करीत असतात. प्राचीन काळी ऋषी-मुनींनी केलेली ग्रंथरचना निसर्गनियमाला अनुसरूनच केली आहे. वनस्पती व झाडांपासून मिळणारी शुभ ऊर्जा ही पूर्णपणे नैसर्गिक ऊर्जेचा स्त्रोत आहे. जगातील सर्व आदिवासी निसर्गाच्या सानिध्यात वस्ती करून राहात आहेत. त्याला कोणत्याही प्रकारच्या वास्तूशास्त्राची माहिती नव्हतीच असे म्हणता येणार नाही. कदाचित वास्तूशास्त्राचा पहिला जाणकार आदिवासी माणूसच असावा. कारण आदिवासींना वास्तू शास्त्राचे ज्ञान नसते तर ते इतर जातींच्या समवेत किंवा आजूबाजूला राहिले असते परंतु तसे झालेले दिसत नाही. आदिवासी हे डोंगर, दऱ्या या निसर्गाच्या सानिध्यात वस्ती करून राहिले हे फक्त त्यांना वास्तू शास्त्राची जाण असेल म्हणूनच ते अशा भागात राहिले हे उघड सत्य आहे.आदिवासींची घरे दोन घटकांवर अवलंबून असतात.नैसर्गिक परिस्थिती व त्यातून घर बांधण्याकरिता मिळणारी सामग्री.अन्नोत्पादनाचे स्वरूप लक्षात घेऊन भटक्या लोकांना आपली घरे सहजासहजी हलवता येतील, अशीच तयार करावी लागतात. अपशी लोक बांबू गवत व कातडी यांचा उपयोग करून घुमटाकार घर बनवितात. ईशान्य कॅनडातील मॅकेंझी भागातील इंडियन कातड्याचे तंबू वापरतात. हैदा आदिवासींची घरे सु. ११ मी. रूंद व १४ मी. लांब असतात व छप्पर उंचीला दाराजवळ सुं २ मी. व मध्ये सु. ३ मी. असते. जवळजवळ दहा खांबांवर हे छप्पर उभे असते. भिंती लाकडाच्या असतात. घरांच्या जुळवणीत खिळ्यांचा वापर करण्यात येत नाही. झाडांच्या सालींनी खांब बांधले जातात. महाराष्ट्रातील भिल्लांच्या घरांना कुडाच्या भिंती व गवती छप्पर असते. अरुणाचल प्रदेशातील आदिवासींची घरे बांबूंवर अधांतरी बांधलेली असतात.(संदर्भ-विकासपीडिया) जवळपास सर्वच आदिवासींच्या घर बांधणीत मोठया प्रमाणात साम्य आढळते.
आदिवासी माणसे पूर्वी आपल्या घराच्या भिंती उभारण्यासाठी साटाचा (ज्वारी, बाजरीची कणसे तोडून उरलेल्या वाळलेल्या काड्या) किंवा कारवीचा वापर करायचे. आदिवासी लोक जास्तीत जास्त भिंती उभारण्यासाठी कारवीचाच वापर करतात. ही कारवी वनस्पती सह्याद्रीच्या भागातील आदिवासींना लाभलेले वरदान आहे. कारवी ही उष्णता शोषक वनस्पती असून उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास जाणवू नये म्हणून ती घराला थंडावा देते आदिवासींना असलेल्या वास्तू ज्ञानाच्या आधारावर भिंती बांधण्यासाठी कारवीचा केलेला वापर आजच्या आधुनिक ज्ञानापेक्षा खूप पुढचा होता हे जाणवते. कारवी मातीची धूप रोखते.भूजल स्थर वाढविते.गुरांना चारा म्हणून या कारवीच्या पाल्याचा वापर करतात.ही वनस्पती सतत सात वर्षे वाढत असते व आठव्या वर्षी एकदाच फुलतात. थोडक्यात घराला उन्हापासून संरक्षण मिळावे, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून घराच्या भिंती (कूड) बांधण्यासाठी कारवीचा वापर केला जात होता.
(कारवी वनस्पती व तिची फुले)
स्वयंपाकघरात घरातील धूर बाहेर निघण्यासाठी चुलीच्या वर भिंतीला एक मोठे छिद्र ठेवले जायचे त्याला ‘धोर’ म्हणायचे. घरातील धूर बाहेर निघून जावा व स्वयंपाक घरात हवा खेळती राहावी म्हणून याचा वापर केला जात होता. घराच्या शेजारी नेहमी तुळस लावलेली असायची. श्रद्धेची बाब सोडून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विचार केल्यास तुळस ही वनस्पती हवा शुद्ध ठेवते व प्राणवायू देते. यामुळे हवेतील जीवजंतू मरून जातात व आपणास शुद्ध हवा मिळते, म्हणूनच पूर्वी प्रत्येक आदिवासींच्या अंगणात तुळशीचे झाड असायचे. घरावरील छप्पर बांधण्यासाठी गवत, शिवणीची पाने, पळसाची, सागाची पाने यांचा वापर केला जायचा.पाने व गवत हे उष्णतारोधक असल्याने उन्हापासून बचाव होऊन घरात गारवा टिकून राहतो म्हणून छप्पर बांधण्यासाठी गवत व पानांचा वापर केला जात होता. त्याचप्रमाणे मातीची कौले भाजून ती पाण्यापासून बचाव व्हावा यासाठी वापर केला जायचा. मातीची कौले उष्णता शोषून घेतात व थंडावा देतात. पाणी शोषून घेतात. ओलावा जास्त वेळ टिकवून धरतात ते तंत्र आदिवासी माणसाला हजारो वर्षांपूर्वी माहिती होते म्हणून आदिवासी हाच वास्तुशास्त्राचा जनक होता असे म्हणावे लागेल. घरात धान्य व इतर वस्तू ठेवण्यासाठी बळद असायचे. कणग्या, पाट्या यामध्ये धान्य साठविले जायचे त्यासाठी वेगळी खोली असायची. मोठ्या श्रीमंत असलेल्या आदिवासींच्या घरी बळदाचा वापर केला जायचा. घरात अंघोळीसाठी स्रियांना बाहेर जावे लागणार नाही यासाठी घरातच न्हाणीघर(मोरी) ची व्यवस्था केली जायची. घरात माळा असायचा. या माळ्यावर पडीक वस्तू ठेवल्या जात होत्या. घराच्या भिंती व जमीन स्वच्छ करण्यासाठी गाई, बैल, रेडे यांच्या शेणाचा वापर केला जात होता. त्यामुळे रोगराई पासून संरक्षण व्हायला मदत व्हायची. कारण शेण हे रोगप्रतिबंधक असते ते आदिवासींना माहिती होते म्हणूनच त्याचा वापर स्वच्छतेसाठी करीत होता असे दिसते. घराचा तोल जाऊ नये व घर अखंड राहावे म्हणून सरळ, लांब सागाच्या लाकडाची धारोन म्हणून उभारणी केली जात होती. हा धारोन टिकाऊ व टणक असतो तो साऱ्या घराचा डोलारा सांभाळतो. सागचे लाकूड टिकाऊ व नक्षीकाम करण्याजोगे असल्याने त्याचा वापर घर बांधणीसाठी केला जात होता. घरात नागपंचमी (सापली पंचमी) च्या दिवशी शेणाने सारवलेल्या कुडावर म्हणजे भिंतीवर पचवी रेखाटली जाते. यावेळी चुना व शेण यांचा संयोग होतो. अनेक संशोधक यांनी केलेल्या संशोधनातून सिध्द झाले आहे की, चूना जवळपास 70 आजार ठिक करु शकतो. यामधील अँटीबायोटिक, अँटीफंगल आणि अँटीइंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करते. चून्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेटसारखे तत्त्व असतात. हे बॉडीला हेल्दी ठेवण्यात मदत करते.त्याचप्रमाणे गायीच्या शेणाचा लेप अनेक त्वचारोगांवरही उपयुक्त आहे. तसेच गायीच्या शेणाच्या गोवऱ्या जाळून त्याचा धूर केल्याने डासांचा नायनाट होतो. गायीचे दुध, दही आणि तूप आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असून, यांचे औषधी गुणही सर्वश्रुत आहेत. गायीच्या दुधाने बनविले गेलेले तूप आहारासोबत अनेक घरगुती उपचारांसाठी देखील वापरले जाते. अशा शेण व चुन्याच्या संपर्काने घरातील रोगजंतू नष्ट होतात म्हणूनच आदिवासी माणूस पंचमीला नाग पंचमी भिंतीवर काढण्यासाठी चुन्याचा वापर करीत असे. घरातील ज्येष्ठ माणसे, बाया माणसे यांच्या बटव्यात झाडाच्या साली, आंबे हळद, मुरड शेंग तसेच अनेक औषधी वनस्पती असायच्या हा घरगुती प्रथमोपचाराचा महत्वपूर्ण भाग आदिवासी जाणून होते. घरात बि-बियाणे टिकवून ठेवण्यासाठी पूर्वी फ्रीझर किंवा साठवणुकीची साधने नव्हती म्हणून सागाच्या पानाच्या लांब नळीच्या आकाराचे साधन बनविले जात होते त्यात ते बी-बियाणे भरून वर्षभर सुरक्षितरित्या टिकवून ठेवले जावे यासाठी पोषक वातावरण घरात ठेवून त्याजागी ते ठेवले जायचे.प्रत्येक आदिवासींची वास्तूशास्त्र निराळी आहे. कर्जत तालुक्यातील ठाकूर या आदिवासी लोकांची वस्ती विशेषत: डोंगरमाथ्यावर रहाते. ठाकूरवाड्या इतरांपासून दूर व उंच ठिकाणी व एकमेकांपासून दूर असतात. ठाकूरांच्या घरबांधणीचीदेखील खास व अनोखी पद्धत आहे. ते काळोख पडल्यावर, ध्रूवतारा आकाशात दिसू लागल्यावर घराचा पाया खणतात. सूर्योदयाच्यावेळी पहिला खांब उभारतात आणि दुसऱ्या दिवशी पहाटे शुक्रतारा उगवतो तेव्हा घराचे काम पूर्ण करतात. त्याचबरोबर काही ठराविक नक्षत्रात झाडे तसेच औषधी वनस्पतींची लागवड आपल्या घराभोवती करतात व अशा रितीने भारतीय संस्कृतीत वास्तू, वनस्पती आणि वृक्ष यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. अशाप्रकारे बांधलेले घर संकटातून निभावते अशी त्यांची श्रद्धा आहे. म्हणून ही लोक आपल्यास निरोगी आढळतात व त्याचे रहस्य या झाडांमध्ये व वनस्पतींमध्ये दडलेले आहे.
वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधताना
यत्र तत्र वृक्षा, बिल्व वृक्ष, बिल्व डाळिंब, केशरा
पनसरे नारिकेल लश्य शुभ कुर्वन्ति नित्यश:। या ओळींनुसार आदिवासींच्या घराजवळ बेल, डाळिंब,फणस ही नेहमी शुभफल देणारी झाडे लावलेली दिसतात. बेलाच्या पानातील सुगंधामुळे आसमंत स्वच्छ होते. फणस, डाळिंबाची फळे आरोग्यदायी असतात.
घराची दिशा पूर्व असावी कारण पूर्व दिशा सूर्याची व आरोग्यदायी दिशा समजला जाते. या दिशेने भरपूर सूर्यप्रकाश व कोवळी किरणे येत असतात. ही किरणे प्रकृतीसाठी व आरोग्यासाठी लाभदायक असतात. त्याचबरोबर ही कोवळी किरणे घरात प्रवेश करून जिवाणू व विषाणूंचा नाश करतात. त्यामुळे नैसगिर्क स्त्रोत यायला अडथळा होईल. त्यामुळे या दिशेला छोटी झुडूपवजा झाडे लावावी. उदा. बेल. घरापासून थोडा लांब वडाचे झाड हे चांगले. यामुळे बायो, जियो मॅग्नेटिक एनर्जी या झाडापासून मिळते.
काही आदिवासी पश्चिम दिशेला घराचे दार ठेवत नाही कारण पश्चिम दिशा ही दिशा वरुणाची म्हणजे पावसाची समजली जाते. या दिशेला पाऊस नेहमी तिरपा पडतो. तसेच वाऱ्याचा वेगही जास्त असतो. त्यामुळे कचरा, धूलिकण, परागकण या दिशेने घरात जास्त येतात. यामुळे या दिशेला झाडे लावताना ती उंच, दाट लांब आणि मोठ्या पानांची असावी. त्यामुळे कचरा, धूलिकण, परागकण व प्रदूषिकांची तीव्रता कमी होईल. घरापासून थोडे लांब पिंपळाचे झाड लावावे व वास्तुच्या कम्पाऊंडमध्ये पहाडी गुलाब, पळस, कडुलिंब, आवळा लावावे. उत्तर दिशा – ही दिशा कुबेराची समजली जाते. या दिशेला प्लक्ष (पाखर) या झाडाची योजना करावी. त्याचबरोबर निर्गुडी, पिवळा चाफा, अर्जुन सादडा इ. झाडे शुभ आहेत. आपल्या देशात वृक्ष आणि वनस्पतींबद्दल जी माहिती संग्रहीत आहे तेवढी कुठेच नसेल. पूर्वीच्या लोकांनी झाडे तोडू नयेत म्हणून वृक्ष व वनस्पतींना देव व आराध्य दैवत समजले होते त्यात चुकीचे काही नाही असे वाटते.सर्वस्वाचा त्याग करून अखंड साधना आणि चिंतनाद्वारे ज्ञानाच्या शोधासाठी निघालेल्या बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले ते पिंपळाच्या वृक्षाखाली व या वृक्षाला बोधीवृक्ष म्हटले गेले. असे झाड बहुतेक आदिवासींच्या घराशेजारी, शेतावर लावलेले असते. (संदर्भ लेख-वास्तु वृक्षांची दिशा-डॉ. तुषार यशवंत सावडावकर)
संत तुकाराम महाराज वृक्षांविषयी म्हणतात की, ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे, वनचरे’ वृक्षांना आपले सखेसोयरे म्हटले आहे इतके महत्व वृक्षांना त्याकाळी देखील होते ही महत्वपूर्ण बाब म्हणावी लागेल.
आदिवासींच्या घराला सागाचे वासे छप्पराला लावलेले असतात त्यामुळे भक्कम छप्पर हे बरीच वर्षे टिकून राहते. घराच्या समोर अंगण असायचे किंवा मांडव असायच्या. त्यावर जांभळीच्या डहाळी, पळसाच्या व उंबराच्या फांद्या, ज्वारीची, बाजरीची साटे टाकली जायची. त्यामुळे घरात थंडावा टिकून असतो. त्यामुळे उष्णतेची तीव्रता कमी होऊन गारवा मिळतो हे आजच्या आधुनिक काळातील फॅन किंवा एसी पेक्षा फार मोठी क्रांती होती असे म्हणावे लागेल. आज आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात लोक फेंगशुई वर जास्त विश्वास ठेवतात.फेंग व शुई याचा अर्थ हवा आणि पाणी असा होतो.फेंगशुई हे वास्तू शास्त्र चीनचे आहे.फेंगशुईमध्ये बांबूच्या झाडाला जास्त महत्व दिले आहे. आदिवासी भागातील घरांसमोर किंवा वाड्यात अजूनही बाबूंची झाडे दिसतात.त्याचा सकारात्मक प्रभाव दिसतो व मानसिक ताण दूर होतो, असे फेंगशुई सांगते.परंतु त्याआधी आदिवासी माणसे या झाडाचे महत्व जाणून असावेत म्हणून तर आदिवासींच्या घराशेजारी अजूनही बांबूचे झाड आढळते.फेंगशुई मध्ये गाईचे दूध पितानाची वासराची असलेल्या प्रतिमेला महत्व दिले आहे. परंतु आदिवासी भागात तर प्रत्येकाच्या घरीच जीवंत गाय व वासरू यांचे पालनपोषण करतांना दिसतो. तसेच फेंगशुई मध्ये हात हलविणारी मांजराची प्रतिमा ठेवल्याने घरात सुख समृद्धी, शांती प्राप्त होते. धनवृद्धी होऊन संकटापासून रक्षण होते असे वर्णन आढळते परंतु आदिवासी भागात तर बऱ्याच घरांमध्ये जीवंत मांजर पाळलेली दिसते त्याला प्रतिमेची गरज नाही.यावरून आदिवासींची वास्तू शास्त्रातील जाण फेंगशुई पेक्षा पुढची होती हे सहजपणे दिसून येते.आदिवासी हेच वास्तुशास्त्राचे जनक असल्याचे जाणवते.आदिवासी माणसांच्या घरात पाणी पिण्यासाठी पूर्वी तांब्याचा हंडा असायचा. त्यामुळे त्याचे आरोग्य उत्तम राहायचे. शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर फेकले जात होते. कॅल्शियमची कमतरता भरून निघायची. जेवण्यासाठी मातीचे काचले वापरत असत. उन्हाळ्यात मातीचे मडके, रांजण पाणी भरून ठेवण्यासाठी वापरली जात होती. मातीने बनविलेल्या भांड्यात पाणी किंवा जेवण घेतल्याने मातीतून शरीराला लोह मिळते.मडक्यातीलकिंवा रांजणातील नैसर्गिकरित्या थंड झालेले पाणी पिणे फ्रिजपेक्षा कितीतरी पटीने आरोग्यासाठी हितकारक असे होते. म्हणूनच या छोट्या मोठ्या गोष्टी आरोग्यासाठी उत्तमच असलेल्या दिसतात. अशा प्रकारे आदिवासींच्या घरात असलेल्या अनेक गोष्टींचा तसेच वनस्पती, पशु, प्राणी यांचा वास्तुशी असलेला संबंध आदिवासी हजारो वर्षांपासून जाणून होता.आदिवासींना जन्मतः निसर्गाच्या सानिध्यात राहून माहिती असलेले हे वास्तुशास्त्र एक अगाध ज्ञानाची प्रचिती देते. अशा अनेक वास्तुशास्त्राच्या गोष्टी आदिवासींना माहिती होत्या यावर आजच्या संशोधकांनी प्रकाश टाकून शोधून काढल्या पाहिजेत तरच आदिवासींचे मूळ संस्कृतीचे स्वरूप व त्याला माहिती असलेले ज्ञान उजेडात येईल यात शंका नाही.
©डॉ. मधुचंद्र लक्ष्मण भुसारे
कोटंबी,पेठ जि. नाशिक
9834332772

