.. बालपणीच्या प्रवासातील जुन्या रम्य आठवणी… नाशिक शहराविषयी उत्सुकता
केवढा उत्साह होता पोराच्या डोळ्यांत … नाशकासारख्या मोठ्या शहरात जायचंय म्हटल्यावर स्वारी लगेच तयार. एखाद्या परदेशगमनाला जाण्याएवढा आनंद झाला होता त्याला. आजवर नाशकाचं केवळ नाव ऐकलेलं वडलांच्या तोंडून, कधी घरी आलेल्या बुजुर्गांच्या तोंडी इतकंच काय ते. आज पोरगंही जाणार म्हटल्यावर आईनं लगबगीनं भल्या सकाळी दिली तयारी करुन. सोबत दोनेक नागलीच्या भाकरी. मुक्कामाची तालुक्याहून सुटणारी पहिली गाडी पकडून दोघेही निघाले. गाडीतून पळतांना दिसणारी झाडं त्याला पहिल्यांदा दिसली तेव्हा पोरानं त्याला भंडावून सोडलं. झाडं पळतात का? का पळतात ? मग आपण झाडाजवळ गेलो तर का नाही पळत? असे एक ना अनेक प्रश्न त्याने त्याच्या केसांतून हात फिरवत सहज सोडवले. सावळघाटातील मागे पडणारी वळणावळणाची डांबरी वाट त्याला शेतात पाहिलेल्या धामणीसारखी सळसळती भासली. गावापासून तीसपस्तीस किलोमीटरवरलं उमराळं आलं तेव्हा तो म्हटला पोराला … इथं पाचवी ते सातवीपर्यंत शिकलो मी. तव्हा शाळंत यायचं तर एवढं पायी चालाया लागायचं. ( महिन्या दोन महिन्यातून एखादी फेरी गावाकडं तीसुद्धा पायी, आज ही पायपीट अंगावर काटे आणते).
उमराळं सुटलं नि रासेगावापलीकडले बारासाकळ्याचे डोंगर दिसले दूरूनच, जणु एकमेकांच्या गळ्यात गळे घालून कुजबुजणारी भावंडंच. त्यांनाच लागून असलेला रामसेज. एखाद्या बापासारखा त्या भावंडांवर लक्ष ठेऊन असणारा. त्यानं त्याला आठवत असलेली रामशेज किल्ल्याची गोष्ट सांगितली. महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा किल्ला तिन्ही बाजूंनी पोरानं डोळ्यात भारुन घेतला ( अर्थात आजवर केवळ त्याच्याच तोंडून किल्ले नि स्वराज्याच्या कथा ऐकलेल्या, त्यातीलच हा एक किल्ला नि सोबतच आलेल्या गारव्याच्या झुळकीनं पोरगं शहारलं एकदम.
आता अर्ध्या तासात येईल नाशिक बरं का… ऐकून मात्र तेही सावरुन बसलं खिडकीशी. मग गाडी पेठफाटा पंचवटीतून रविवार कारंजामार्गे सीबीएसला विसावली.
पोरगं नाशकातून फिरवतांना अनायसेच एका लाकडी खेळण्याकडे पोराचं लक्ष गेलं, लांबसडक दांड्यावर आपल्या चालीत म्होरं पंख फडफडवणारा कोंबडा. अन् त्याचा बालहट्ट काही त्याला मोडवता आला नाही . घेण्यासाठी ठरवलेल्या काही गोष्टींना मुरड घालून त्यानं ते कोंबड्याचं लाकडी खेळणं मुलासाठी घेतलंच.
मग नंतर मात्र पोराचं त्या शहरी झगमगाटाकडे मुळीच लक्ष गेलं नाही . त्यानंही आवर्जून पांडे मिठाईवाल्याकडचं श्रीखंड, रविवार कारंज्याच्या कोपऱ्यावरला प्रसिद्ध अननसाचा आईस्किम ज्यूस पोराला घेऊन दिला. अन् बांधून घेतली बुधा हलवायाच्या दुकानातली जिलेबी. शेतीसाठीच्या काही लोखंडी वस्तू भद्रकाली जवळून खरेदी केल्या. पोराचं लक्ष मात्र त्या कोंबड्याच्याच खेळण्याकडं. दिवसभर पोरगं त्याच्याबरोबर फिरलं अन सांच्याला मुक्कामाची एसटी पकडून दोघंही गावी निघाले. सामान ठेवण्याच्या जागेत वरती ते खेळणं ठेवून दिवसभराच्या थकव्यानं पोरगं त्याच्या मांडीवर गपगुमान विसावलं .
गाडीनं हळूहळू वेग पकडला अन गावाकडच्या गारव्यात तोही भान हरपला . उतरण्याचं ठिकाण आल्यावर झोपलेलं पोरगं घेऊन तो तसाच उतरला. .. रस्त्यापासून दूर डोंगरांत दिड दोन मैलावर गाव होतं . संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान गावात पोचल्यावर झोपल्या पोराला न ऊठवताच त्यानं जेवण उरकलं …
अन् तेवढ्यातच त्याला आठवलं … पोराचं खेळणं गाडीतच राहिलं होतं . . रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही. पोराच्या मात्र झाला प्रकार गावीही नव्हता. घरच्यांची मात्र ही तारांबळ.
सकाळी सहाला निघणारी मुक्कामी गाडी तालुक्याच्या ठिकाणाहून जाणार तर नाहीना ह्या धास्तीनं तो पहाटेच ऊठून मधल्या पायवाटेनं दिडतास पायपीट करत तालुक्याला पोचला . ड्रायव्हर नुकताच चुळ भरत होता . कंडक्टरने पहाताच सांगितले … काळजी करू नका बाबा, तुमची वस्तू आम्ही सांभाळून ठेवलीय. काल सांच्याला गाडीत चढताना पाह्यलं होतं हे कोंबडं पोराच्या हातात.
एवढे ऐकताच त्याला हायसे वाटले . दोघांचेही आभार मानून तो आल्यापावलीच निघाला . पोरगं अजून झोपेतच होतं. जणु काही झालेच नाही अशा रितीने सा-यांची सकाळ सुरु झाली. तो अजुनही धापा टाकत एका कोप-यात बसून होता.
शिरस्त्याप्रमाणं पोरगं ऊठलं अन् खेळण्याची चौकशी केली . हातात खेळणं मिळताच स्वारी खुशीनं चौखूर ऊधळू लागली … अन् त्याचा चेहरा पुन्हा तजेला झाला. सारं विसरून तोही पोराकडं कौतुकानं पाहू लागला…….
… तो बाप होता ..!!!
पुढे कित्येक वर्षांनी समजायच्या वयात पोराला हे कळले. आज सुरकुतल्या चेह-याने बाप सांच्याला खाटेवर कंदीलाच्या मिणमिणत्या दिव्याजवळ बसतो (आजही कधी १२/१२ तास लोडशेडींगमुळं रात्री ब-याचदा अंधारात असतात) तेव्हा पोराला तेच समाधान त्याच्या चेह-यावर ऊजळलेलं अजुनही दिसतंय ….. जे त्या दिवशी सकाळी दिसलं होतं ….!!!
©अरुण गवळी
मु. बोरवठ ता.पेठ (नाशिक)
कवी व शिक्षक
..८६५५६१६०३८.

