चांदवड तालुका : पाणीप्रश्नी लाक्षणिक उपोषण
चांदवड तालुक्याच्या पाणीप्रश्नाबाबत पाणीप्रश्न संघर्ष समिती व शेतकऱ्यांच्या वतीने सोमवारी (दि.७) शासकीय विश्रामगृह चौफुली येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

यावेळी आ.डॉ.राहुल आहेर,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर, तालुकाप्रमुख विलास भवर, प्रहारचे गणेश निंबाळकर, सभापती संजय जाधव, भिमराव जेजुरे, अँड. पोपटराव पवार, रिपाईंचे महावीर संकलेचा, समाधान जामदार, अँड दिनकरराव ठाकरे, भूषण कासलीवाल, संपतराव वक्ते, विकास भुजाडे, आबा गांगुर्डे,पराग पाष्टे,वकील संघाचे सदस्य यांनी उपोषणास पाठींबा दिला. तसेच तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी येऊन निवेदन स्वीकारले, व भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याची हमी दिली, पाणीसंघर्ष समितीचे अध्यक्ष अँड. भरत ठाकरे, सचिव शरद पवार यांनी आपल्या मागण्या यावेळी उपस्थित समोर मांडल्या .अक्षय माकुने, विजय कुंभार्डे, रिजवान घासी, तुकाराम सोनवणे, विजय जाधव, शंभुराजे खैरे, कैलास कोतवाल, अशोक ठाकरे, जगन यशवंते व संघर्ष समिती कार्यकर्त्यांनी हे उपोषण केले आहे. निवृत्ती घुले , पंकज दखणे, नामदेव पवार, राजेंद्र ठाकरे, सागर निकम, वाल्मीक वानखेडे, दिपक हांडगे, प्रभाकर ठाकरे, पुंडलिक गुंजाळ, गोरख रकीबे, बाळासाहेब गाढे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऐतिहासिक अहिल्यादेवी खोकडतलाव कालीन दरवर्षी भरण्याकामी पाटचारी सिमेंट पाईपव्दारे भरण्याचे नियोजन करण्यात यावे, पाटचाऱ्या काढून रायपुर व परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी काढावा आदी मागण्यासाठी व चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील तापी खोऱ्यातील ३५ गावांना नार-पार गिरणा प्रकल्पातून शेती सिंचनासाठी व पिण्याचे पाण्याचे नियोजन व्हावे, चांदवड तालुक्यातील पूर्व भागाला जल संजीवनीसाठी १५ ते २० वर्षापासून रखडलेला राजदेरवाडी प्रकल्प (हतियाड) मान्यतेसह निधि प्राप्त करुन मिळावा, पार गोदावरी प्रकल्यात चांदवड तालुक्यास उन्नेय (हायराईज) कालव्याव्दारे ३ ते ४ टीएमसी पाणी आरिक्षत करावे, आदि मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया
१) आ. डॉ. राहुल आहेर – चांदवड तालुका संघर्ष समितीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण येथे पुकारले आहे. या उपोषणाला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा तर आहेच. पण तालुक्याचा आमदार म्हणून मी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. पाणी संघर्ष समितीच्या निमित्ताने एक बिगर राजकीय समिती तयार झालेली आहे. सरकार दरबारी लवकरात लवकर कशी मंजुरी मिळेल यासाठी समिती प्रयत्न करते आहे.मुख्यमंत्री , दोन्ही उपमुख्यमंत्री व जलसंपदा विभागाचे सचिव यांची येणाऱ्या आठवड्यात भेट घेऊन नार पार गिरणेच्या धरतीवर पार गोदावरी प्रकल्प चालू आहे . त्यातून वाढीव पाणी कसे आणता येईल . त्याचप्रमाणे हतीयाड धरणाची जी प्रलंबित मागणी आहे त्यासाठी आग्रहाची भूमिका आपण घेणार आहोत. असे आमदार डॉ राहुल आहेर यांनी यावेळी उपोषणकर्त्यांच्या भेटी प्रसंगी सांगितले.
२) माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल – चांदवड तालुक्यातील जनतेची अशी भावना निर्माण झाली आहे की आम्हाला कोठे तरी नाकारले जात आहे. चांदवड तालुक्यातील पाच पाणी परवानग्या व देवळा तालुक्यातील दोन पाणी परवानग्या असतानाही त्यावर काम झाले नाही ही खेदाची बाब आहे. चांदवड तालुक्यातील तापी खोऱ्यातील गावांसाठी पाणी आरक्षित झाले पाहिजे. असे यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी सांगितले.
३) माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ आत्माराम कुंभार्डे – नार पार गिराणा प्रकल्पामध्ये ज्याप्रमाणे देवळा व खानदेशचा पाण्याचा प्रश्न मिटला. त्याप्रमाणे चांदवडचाही प्रश्न मिटने गरजेचे आहे. पार गोदावरीचा प्रश्न मिटणे गरजेचे होते. भविष्यात चांदवडला या प्रकल्पातून चार ते पाच टी.म.सी पाणी मिळणे गरजेचे आहे. 2012 मध्ये पाणी परवानगी असतानाही हाथियाड धरण दहा वर्षात झाले नाही,हे दुर्दैव आहे. या मागण्या पूर्ण करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ आत्माराम कुंभार्डे यांनी यावेळी केली.

