नाशिक जिल्ह्यातील एकमुखी दत्तात्रय प्रभूंची सर्वात मोठ्या यात्रेस
दत्ताचे शिंगवे येथे शनिवार पासून प्रारंभ

नाशिक जिल्हयातील पूर्व भागातील पहिली यात्रा म्हणजे चांदवड तालुक्यातील श्री क्षेत्र दत्ताचे शिंगवे येथे तिन दिवस चालणारी यात्रा. चांदवड – चाळीसगाव महामार्ग जवळील व मनमाड शहराजवळून जवळच असणाऱ्या एका सुंदर टेकडीवर दत्तात्रय भगवान यांचे स्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे आणि विशेषता महानुभव पंथाचे महत्वाचे स्थान असल्यामुळे दर्शनाची मोठी गर्दी राज्यभरातून होत असते. यंदा यात्रा शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी असल्याने यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दत्त मंदिर ट्रस्टने विशेष नियोजन केलेले आहे. गर्दी नियंत्रणासाठी दर्शन रांगा स्वतंत्र बनवण्यात आलेले आहेत. संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत करण्यात आलेले आहेत. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे.यात्रा नियोजनाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीस चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, दत्त मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सोसायटीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवाला शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 पासून सुरुवात होणार आहे या दिवशी रात्री दत्तमूर्तीस जन्मस्नान , गंधअक्षदा , नविन वस्त्र समर्पण हार, विडावसर, उपहार करण्यात येईल व महाआरती चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या हस्ते होईल. दुसऱ्या दिवशी दि.15 डिसेंबर रोजी रविवारी दुपारी तीन वाजता दत्त पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.यावेळी पालखीचे पूजन आमदार डॉ.राहुल आहेर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल.

तिसरा दिवस म्हणजे गाव जत्रा . सोमवार या दिवशी राज्यभरातून नामांकित पैलवानांचा सहभाग असणाऱ्या कुस्त्यांच्या भव्य दंगलीने यात्रा महोत्सवाची सांगता होईल. यात्रा यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. या यात्रेत नाशिक जिल्ह्याबरोबरच आजूबाजूच्या अनेक ठिकाणी भाविक येत असतात यात्रेत मोठ्या प्रमाणात खेळण्या व मिठाईच्या दुकानांची रेलचेल असते.

